By : Devanand Sakharkar
चंद्रपूर : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी 4 जून 2024 रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, एम.आय.डी.सी. परिसर, पडोली येथे होणार आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाच्या सुचनांबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी उमेदवार व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना अवगत केले. तसेच मतमोजणी केंद्रात उमेदवार, त्यांचे निवडणूक प्रतिनिधी आणि मतमोजणी प्रतिनिधी यांनाच प्रवेश राहणार असून याव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही, असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.
मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात माहिती देण्यासाठी नियोजन सभागृह येथे राजकीय पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांच्यासह काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटीक) पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
4 जून रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष सकाळी 7 वाजता सुरक्षा कक्ष उघडण्यात येईल. तसेच मतमोजणी केंद्रात उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना सकाळी 7 वाजता प्रवेश देण्यात येणार आहे. जिल्हा कोषागार कार्यालयात असलेल्या टपाली मतपत्रिका सकाळी पोलिस बंदोबस्तात कोषागार कार्यालयातून मतमोजणी केंद्राकडे पोहचविण्यात येणार आहे. सकाळी 8 वाजता टपाली मतपत्रिका व सर्व्हिस मतदारांच्या मतपत्रिकांच्या मोजणीला सुरुवात होईल. तर प्रत्यक्ष ईव्हीएम मतमोजणी प्रक्रिया सकाळी 8.30 वाजता सुरू होणार आहे. सुरक्षा कक्ष ते मतमोजणी कक्षादरम्यान मतदान यंत्र व पाकिट क्रमांक 1 यांच्या वाहतुकीबाबत व त्याचे चित्रीकरण, मतमोजणी केंद्रात प्रदर्शित करण्यात येणार असून संपूर्ण परिसर सीसीटीव्ही नियंत्रणाखाली राहणार आहे.
*अशा राहणार विधानसभानिहाय मतमोजणीच्या फे-या :* 70- राजुरा विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण 24 फे-या, 71 – चंद्रपूर मतदारसंघात 28 फे-या, 72- बल्लारपूर करीता 26 फे-या, 75- वरोरा करीता 25 फे-या, 76 -वणीकरीता 25 फे-या आणि 80 – आर्णि विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण 27 फे-या राहणार आहेत.
*मतमोजणी प्रतिनिधी नियुक्ती व आवश्यक कागदपत्रे :* मतमोजणी प्रतिनिधीचे वय 18 वर्षे पूर्ण असावे. तसेच सदर प्रतिनिधी लोकसभा मतदारसंघातील मतदार असावा. 31 मे 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रतिनिधींची नियुक्तीची मुदत आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघाकरीता 14 टेबलसाठी (प्रति उमेदवार) 14 प्रतिनिधी, टपाली मतमोजणीकरीता 9 प्रतिनिधी आणि सर्व्हिस मतपत्रिकाकरीता 1 प्रतिनिधी. मतमोजणी प्रतिनिधींजवळ ओळखपत्र, मतमोजणी प्रतिनिधी नियुक्तीबाबत पत्राची प्रत आणि घोषणापत्र असणे आवश्यक आहे.
*मतमोजणी केंद्रात परवानगी असलेले साहित्य :* मतमोजणी केंद्रात पेन / पेन्सील, पांढरा कागद / नोटपॅड आणि 17 – सी ची दुय्यम प्रत असणे आवश्यक आहे. तसेच मतमोजणी केंद्रात मोबाईल किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तु नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.