By : राजेंद्र मर्दाने
वरोरा : शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या चोरीच्या घटनांनी सर्वसामान्य जनता जेरीस आली असताना चोरट्यांनी दिवाणी न्यायाधीश डी. आर. पठाण यांच्या भाड्याच्या घरात चोरी करून कहर केला आहे. परिणामतः शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांसमोर चोरट्यांना वेळेत जेरबंद करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, वरोरा न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर ) हे ओम शांती नगर, देशपांडे पेट्रोल पंपाच्या मागे प्रतीक चंद्रकांत पुसदेकर यांच्या घरी भाड्याने राहतात. न्यायालयाला ८ जूनपर्यंत सुट्टी असल्याने न्यायाधीश स्वगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घर फोडून सोने – चांदीच्या दागिन्यांसह ६२ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. सदर चोरीची घटना २३ मे च्या रात्री ११.५९ ते २४ में २०२४ च्या पहाटे सकाळी ७.०० वाजताच्या दरम्यान घडली. घरमालक प्रतीक चंद्रकांत पुसदेकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर वरोरा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरमालक स्वतः खाली राहत असल्याने काही दिवसांपूर्वी बिनधास्तपणे घराला कुलूप लावून न्यायाधीश पठाण सहपरिवार स्वगावी गेले . २३ मे रोजी सकाळी उकाड्यानंतर सायंकाळ पासून वारा- पाण्याचा जोर दिसल्याने रात्री उशिरापर्यंत घरमालककडील मंडळी जागीच होती. नंतर रात्रौ बाराच्या सुमारास झोपी गेले. यावेळी अज्ञात चोरट्यांनी न्यायधीशाच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व घरातील सोन्या चांदीचे व रोख रक्कम मिळून ६२ हजार रुपये लांबविले. सकाळी घरमालक झोपेतून उठल्यानंतर त्यांना हा प्रकार दिसला. घरामध्ये जाऊन पाहिले असता सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. त्यानंतर त्यांनी प्रथम न्यायाधीश पठाण यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क करून घटनेची माहिती दिली. तद्नंतर पोलीस स्टेशनशी संपर्क साधून पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. गुन्हा दाखल होतात वरोरा पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.
****
गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरीच्या घटनेत मोठी वाढ होतांना दिसत आहे. काबाडकष्ट करून प्रसंगी पोटाला चिमटे काढून जमा केलेली रक्कम व किमती ऐवज चोरटे लंपास करत असल्याने नागरिक चिंताग्रस्त आहेत. सर्वसामान्यांना चोरट्यांनी नाकी नऊ आणले असताना न्यायधीशाच्या घरी चोरी करून कहरच केला नसून पोलिसांना खुले आव्हानच दिले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तोडपाणी करण्यासाठी रेती घाटावर निगराणी ठेवण्यापेक्षा सामान्य जनतेच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.