मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात निर्बंध लागू

By : Shankar Tadas

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू असून 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (1974 चे 2 ) मधील नियम 144 अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निर्बंध लागू केले आहेत. सदर प्रतिबंधात्मक निर्बंध 17 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजतापासून 19 एप्रिल 2024 रोजी मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पार पडेपर्यंत लागू असणार आहेत.

या कालावधीत बेकायदेशीर जमाव जमविण्यास व सार्वजनिक प्रचार सभा आयोजनास बंदी राहणार असून मतदारांना पुरविण्यात आलेल्या अनौपचारिक ओळखचिठ्या साध्या पांढऱ्या कागदावर असणे आवश्यक आहे तसेच त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव मुद्रीत करण्यावर बंदी असणार आहे. मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात निवडणूक कर्तव्यावरील वाहन वगळता इतर सर्व वाहनांस बंदी राहणार आहे. मतदान केंद्रात मतदार, उमेदवार व त्यांचे निवडणूक / मतदान प्रतिनिधी यांच्या व्यतिरिक्त फक्त निवडणूक आयोगाकडून वैध प्राधिकारपत्र मिळविलेल्या व्यक्तींनाच प्रवेश राहणार आहे. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस मतदान केंद्रात प्रवेशावर बंदी असेल.

मतदारांना लाच देणे, मतदारांवर गैरवाजवी दडपण, मतदारांना धाकदपटशा दाखविणे, तोतयेगिरी करणे तसेच मतदान केंद्राच्या 100 मिटर परीसरात प्रचार करण्यास बंदी राहणार आहे. मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर ने-आण करण्याच्या प्रथेस पायबंद घालण्यासाठी टॅक्सी, खाजगी कार, ट्रक, ऑटोरिक्शा, मिनी बस, स्टेशन व्हॅन, स्कुटर, मोटार सायकल इत्यादी सर्व प्रकारच्या वाहनांवर बंदी राहणार आहे. मतदानाच्या दिवशी ओळख चिठ्ठया वाटपाच्या ठिकाणी किंवा मतदान केंद्राचे परीसरात भित्तीपत्रके, ध्वज, चिन्हे आणि इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करण्यास बंदी असणार आहे.

ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटल्यामुळे सरकारी सुरक्षा पुरविण्यात आली असेल, अशी कोणतीही व्यक्ती त्याच्या सुरक्षा कर्मचा-यासह मतदान केंद्राच्या 100 मीटर परीसरात प्रवेश करणार नाही. तसेच अशी व्यक्ती मतदार असली तरी निव्वळ मतदान करण्याकरीता सुरक्षा कर्मचा-यासह मतदार केंद्र परिसरात ये-जा करण्यावर निर्बंध राहील, तथापी विशेष सुरक्षा व्यवस्था प्रदान केलेल्या व्यक्तीच्या विशेष सुरक्षा पथकास (Close Protection Team) शस्त्रांसह मतदान केंद्राचे केवळ दारापर्यंत संरक्षित व्यक्तीसोबत जाता येईल. व एका वैयक्तिक सुरक्षा अधिका-यास शस्त्राचे प्रदर्शन न करता तसेच मतदान प्रक्रियेत कोणताही प्रकारे अडथळा न करता संरक्षित व्यक्तीस ( Protectee ) मतदान केंद्रात सोबत करता येईल.

ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटल्यामुळे सरकारी सुरक्षा पुरविण्यात आलेली असेल किंवा त्या व्यक्तिकडे खाजगी सुरक्षा रक्षक आहेत अशा कोणत्याही व्यक्तिस निवडणूक प्रतिनिधी वा मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यास बंदी राहील. मतदान केंद्रात मतदानाचे दिवशी मोबाईल / स्मार्ट फोन / वायरलेस सेट इत्यादी नेण्यास प्रतिबंध राहील. मतदान केंद्राध्यक्ष / आचारसंहिता / कायदा व सुव्यवस्था पथक प्रमुख / निवडणुकीच्या कर्तव्यावरील सुरक्षा कर्मचारी यांना उक्त प्रतिबंध लागू राहणार नाही.

*निर्बंधाच्या कालावधीत या बाबींवर बंदी नाही :* 13-चंद्रपूर लोकसभा मतदार संघात निवडणूक प्रचार दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6 पासून बंद होत असला तरी, घरोघरी प्रचारावर निर्बंधाच्या कालावधीत प्रतिबंध असणार नाही परंतू 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध असेल. दवाखान्याच्या गाड्या, ॲम्बुलन्स, दुधगाडया, पाण्याचे टँकर्स, विदयुत विभाग / पोलिस / निवडणूक कर्मचारी यांच्या वाहनावर बंदी राहणार नाही. विहीत मार्गाने जाणा-या बस गाडयावर बंदी राहणार नाही. टॅक्सी इत्यादी वाहने बस स्टेशन / रेल्वे स्टेशन / हॉस्पीटल कडे जाणारी वाहने यावर बंदी राहणार नाही. दिव्यांग / आजारी व्यक्तिस मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जाणे-येणे करीता आजारी / दिव्यांग व्यक्तींच्या वैयक्तिक वाहनास बंदी असणार नाही.

 

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *