By : Rajendra Mardane
चंद्रपूर : मध्य रेल्वेने १२ मार्च २०२४ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस – बल्लारशाह जंक्शन (01127) तसेच बल्लारशाह ते लोकमान्य टिळक टर्मिनस (01128 ) दरम्यान ‘ स्पेशल सुपर फास्ट ‘ ऐवजी नवीन ‘ सुपर फास्ट ‘ साप्ताहिक ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘ स्पेशल ‘ च्या नावाने रेल्वे प्रवाशांना बसणारा आर्थिक भुर्दंड कमी होणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे वरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाने स्वागत केले आहे.
मध्य रेल्वे विभागाकडून लोकमान्य टिळक टर्मिनस – बल्लारशाह जंक्शन व बल्लारशाह जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान मागील जवळपास २० महिन्यांपासून 01127/28 साप्ताहिक स्पेशल फेअर सुपर फास्ट एक्सप्रेस चालविण्यात येत होती. ‘ स्पेशल सुपर फास्ट ‘ नाव दिल्याने प्रवाशांना सदर प्रवासादरम्यान अतिरिक्त भाडे मोजावे लागत होते. परिणामतः त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. याची दखल घेत मध्य रेल्वेने प्रवाशांना बसणारा आर्थिक भुर्दंड कमी करण्यासाठी ‘ स्पेशल ‘ अर्थात गाडी क्रमांकातील ‘ 0 ‘ वगळून लोकमान्य टिळक टर्मिनस – बल्लारशाह जंक्शन दरम्यान नवीन ‘ साप्ताहिक सुपर फास्ट ट्रेन ‘ चालविण्याचा निर्णय घेतला. लोकमान्य टिळक टर्मिनस – बल्लारशाह एक्सप्रेस (22109) लोकमान्य टिळक टर्मिनसवरून दिनांक १२/०३/२०२४ पासून २१.४५ वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी १२.१० वाजता बल्लारशाह जंक्शनला पोहचेल. बल्लारशाह – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (22110) दिनांक १३/०३/२०२४ ला १३.४० वाजता बल्लारशाह जंक्शनवरुन सुटेल आणि दुसर्या दिवशी ०५.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहचेल. सदर ट्रेनचे स्टॉपेज लोकमान्य टिळक टर्मिनस नंतर ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, धामणगांव, पुलगांव, वर्धा, हिंगणघाट, वरोरा, चंद्रपूर आणि बल्लारशाह असणार असल्याचे कळते. गाडीची संरचना ए- ३ टायर स्लीपर, एक दिव्यांगसाठी द्वितीय श्रेणी सामान रेक, तीन नॉन एसी चेअर कार, दोन वातानुकूलित २- टियर स्लीपर , आठ द्वितीय श्रेणी स्लीपर आणि ६ एसी ३- टियर स्लीपर अशी राहणार आहे.
मध्य रेल्वेने पूर्वी चालत असलेली ‘ स्पेशल फेअर सुपर फास्ट ‘ ही गाडी बंद करून त्याऐवजी ‘ सुपरफास्ट ‘ गाडी सुरू केल्याने प्रवाशांना याचा फार मोठा फायदा होणार आहे. ‘ स्पेशल ‘ शब्द लागल्याने पूर्वी प्रवाशांना अतिरिक्त पैसे मोजावे लागत होते. एकंदरीत प्रवाशांची आर्थिक लूट होत होती. आता तीच गाडी नव्याने सुरू केल्याने प्रवासा दरम्यान प्रवाशांची आर्थिक बचत होणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे वरोरा- भद्रावती- चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाने स्वागत केले आहे. १३ मार्च रोजी प्रवासी मंडळाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते वरोरा रेल्वे स्टेशनवर नवीन गाडीचे स्वागत करणार आहेत.
*बाक्स* –
मध्य रेल्वे विभागाकडून यापूर्वी मुंबई वरून 22127 – ‘आनंदवन एक्सप्रेस ‘ व 11083 – ‘ ताडोबा एक्सप्रेस ‘ या दोन साप्ताहिक ट्रेन अनुक्रमे सोमवार व शुक्रवार या दिवशी चालविण्यात येत होत्या. कोरोना संकट काळात ह्या ट्रेन बंद करण्यात आल्या. त्या पुन्हा सुरू करण्यात आल्या नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यातून मुंबई – पुणे साठी दररोज धावणारी कोणतीही ट्रेन नसल्याने प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी सामाजिक संघटना, प्रवासी संघाकडून वेळोवेळी निवेदनाद्वारे मागणीही करण्यात आली. त्यामुळे मध्यंतरी बंद ट्रेन ऐवजी बल्लारशाह जंक्शनसाठी ‘ लोकमान्य टिळक टर्मिनस ‘ ही एकमेव साप्ताहिक ट्रेन ‘ स्पेशल ट्रेन ‘ म्हणून सुरू करण्यात आली. यामुळे प्रवाशांना सुविधा झाली मात्र त्यासाठी त्यांना ज्यादा पैसेही मोजावे लागत असे. आता ‘ स्पेशल ‘ शब्द वगळण्यात आल्याने प्रवाशांना थोडा दिलासा मिळणार आहे. बल्लारशाह जंक्शन वरुन मुंबईसाठी दररोज धावणारी ट्रेन जेव्हा सुरु होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने जिल्हावासीयांना दिलासा मिळेल, असे नागरिकांचे मत आहे. यासाठी मध्य रेल्वे विभागाने या समस्येकडे आवर्जून लक्ष देण्याची गरज असल्याचे मत वरोरा- भद्रावती- चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मर्दाने यांनी व्यक्त केले आहे.