लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि १० मार्च शनिवार दि. ९/३/२०२४ रोजी वशेणी, तालुका उरण येथे जागतिक महिला दिनाचे (८मार्च) औचित्य साधून ऑलकार्गो टर्मिनल्स लिमिटेड व ग्राम पंचायत वशेणी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला भगिनींचा मार्गदर्शन मेळावा, व्याख्यान व नेत्रचिकीत्सा शिबीर संपन्न झाले. ह्या मेळाव्यास महिलांची उपस्थिती उत्स्फुर्तपणे व खूप मोठ्या प्रमाणावर होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच अनामिका हितेंद्र म्हात्रे यांनी केले. तर कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून ऑलकार्गोच्या निहारिका पटनायक मॅडम उपस्थित होत्या. ह्यावेळी स्त्रियांच्या आरोग्य विषयक समस्या ह्या विषयावर स्त्रीरोग व प्रसुती तज्ज्ञ डाॅ. मैथीली गाडगीळ यांनी मार्गदर्शन करताना मासिक पाळी व कर्करोग ह्या विषयावर सखोल माहिती सांगितली.ॲड. प्रतिभा पाटील यांनी कौटुंबिक वाद व महिला ग्राहक तक्रार ह्या विषयी मौल्यवान व्याख्यान दिले. तद्नंतर डाॅ. निकीता भोसले यांनी डोळ्यांच्या विविध समस्या ह्या विषयावर महत्वपूर्ण माहिती दिली. शेवटी उपस्थित सर्व महिला भगिनिंना एक फुलझाड व खाऊ पाॅकेट देण्यात आले.
ह्या कार्यक्रमासाठी ऑलकार्गो टर्मिनल तर्फे कविता अंतिम पाटील आणि त्यांच्या सहकारी कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ह्या वेळी वशेणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच कु. ज्योत्स्ना पाटील, ग्रा. पं. सदस्य गणेश म्हात्रे, जयंत म्हात्रे, संग्राम पाटील, सुनिल ठाकूर, शेवंती पाटील, प्रजा गावंड आदी मान्यवर उपस्थित होत्या. शेवटी सरपंच अनामिका म्हात्रे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.