By : Shankar Tadas
चंद्रपूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एकछत्र योजनेअंतर्गत बाबूपेठ येथील महादेव मंदिर या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन दुरुस्ती कामाकरीता 1 कोटी 58 लक्ष 59 हजार 498 रुपये इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
बाबूपेठ येथील महादेव मंदिर हे चंद्रपूर शहराच्या पूर्वेस सुमारे 5 कि.मी.अंतरावर स्थित आहे. या मंदिराचे बांधकाम गोंड राजाच्या काळात करण्यात आले. गोंड राजा बिरशहा यांची राणी हिराई यांचे दिवाण बापूजी वैद्य यांनी या मंदिराचे बांधकाम केले. मंदिरामध्ये शिवलिंग असून इतर इंद्र, वरूण, गणपती, अग्नी, नाग आदी देवतांची शिल्पे आहेत.
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बाबूपेठ येथील महादेव मंदिराच्या जतन आणि दुरुस्तीचे काम तात्काळ होण्यासंदर्भात कार्यवाही करण्याची सूचना संबंधित यंत्रणेला केली होती. सदर बाबी विचारात घेऊन रासायनिक प्रक्रियेद्वारे मंदिराचे बांधकाम स्वच्छ करणे, ग्राऊटिंग करणे, पॉइंटिंग करणे, लोखंडी ग्रील बसविणे, शोभिवंत झाडे लावणे, सूचना फलक, माहिती फलक, दिशादर्शक फलक आदी कामे यामध्ये समाविष्ट आहेत.
महादेव मंदिराच्या जतन दुरुस्तीच्या कामासाठी 1 कोटी 58 लक्ष 59 हजार 498 इतक्या रकमेची प्रशासकीय मान्यता मिळाल्याबद्दल मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून ना. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.