By : Devanand Sakharkar
चंद्रपूर : ‘जंगल से जीवन के मंगल तक’ आणि ‘वन से धन तक’ या संकल्पनेवरच वनविभाग काम करीत आहे. वनांची सेवा आणि पर्यावरणाचे संरक्षण हे ईश्वरीय कार्य आहे. त्यामुळे या भवनातून वन संवर्धन आणि वनांची सुरक्षेचे काम होईल, असा विश्वास राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.*
नवीन वनभवन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा वनबलप्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) शोमिता विश्वास, महिम गुप्ता, ताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपवनरंक्षक कुशाग्र पाठक, जितेश मल्होत्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, विभागीय वनअधिकारी प्रशांत खाडे आदी उपस्थित होते.
चंद्रपूर – नागपूर रस्त्यावर जवळपास 8153 चौ. मी. वर नवीन वनभवन उभे राहत आहे, असे सांगून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, येथे कार्यरत असलेले सात विविध कार्यालये एकाच छताखाली आता येणार आहे. वन संवर्धन आणि वनांची सुरक्षा या भवनातून होईल. राज्यात सर्वात जास्त वनक्षेत्र असलेले चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे प्रगतीच्या विविध क्षेत्रात अधोरेखांकित झाले आहेत. आपल्या राज्याचा वनविभाग हा उत्तम व्हावा, यासाठी आपण सर्वजण संकल्प करू या, असे आवाहन त्यांनी केले.
वनविभागाचा सूवर्णकाळ : सध्या वनविभागाचा सूवर्णकाळ सुरू आहे. इतर विभागांनी हेवा करावा, असे काम वनविभागात होत आहे. यासाठी वरिष्ठ अधिका-यांसह गावस्तरावर काम करणारे अधिकारी आणि कर्मचा-यांचे चांगले सहकार्य मिळत आहे. वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी हे अतिशय बुध्दीमान आणि संयमी अधिकारी आहेत. तर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबलप्रमुख शैलेश टेंभुर्णीकर आणि महिप गुप्ता हे कल्पक अधिकारी आहेत, असे गौरवोद्गार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.
असे राहील नवीन वनभवन : चंद्रपूर – नागपूर रस्त्यावर सिव्हील लाईन येथे 60 कोटी 92 लक्ष रुपये खर्च करून नवीन वनभवन साकारण्यात येणार आहे. यात तळमजल्यावर (2229.74 चौ.मी.) मुख्य वनसंरक्षक कार्यालय, पहिल्या माळ्यावर (1507.82 चौ.मी.) उपवनसंरक्षक, मध्यचांदा विभाग कार्यालय, दुस-या माळ्यावर (1497.05 चौ.मी.) विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर वनविभाग कार्यालय, तिस-या माळ्यावर (1497.05 चौ.मी.) विभागीय वन अधिकारी, चवथ्या माळ्यावर (1421.63 चौ.मी.) विभागीय वन अधिकारी, मुल्यमापन विभाग आणि संशोधन विभाग राहणार आहे. याशिवाय वाहनचालक आणि सुरक्षा रक्षक कक्ष, संरक्षण भिंतीचे बांधकाम, सिमेंट काँक्रिट अंतर्गत रस्ते बांधकाम, सिमेंट नाली बांधकाम, वाहनतळ, वाहनशेड, पेव्हींग ब्लॉक, फर्निचर, रेनवॉटर हार्वेस्टिंग, जलपुनर्भरण व पाणी साठवण टाकी, बागबगीचा व लॅन्डस्केप, म्युलर, पेंटींग व स्क्लप्चर, पाणी पुरवठा व मलनि:सारण आदी कामे करण्यात येणार आहे.