By : Rajendra Mardane
चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील विलोडा येथील शेतकरी संदीप सुभाष घाटे यांच्या गाईने शनिवार, दि.२ मार्च रोजी सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास दोन डोके असलेल्या दुर्मिळ वासराला जन्म दिला. नवजात वासराला दोन मान, दोन तोंड, चार डोळे आणि चार कान व बाकी अवयव सर्वसाधारण होते. दुर्दैवाने या दुर्मिळ वासराने जन्मानंतर काही मिनिटांतच प्राण सोडले. गाई मात्र सुस्थितीत आहे.
संदीप घाटे हे भद्रावती तालुक्यातील कृषिनिष्ठ शेतकरी आहेत. त्यांच्याकडे ५ एकर शेती असून त्यांनी शेतीला दुग्धव्यवसायाची जोड दिली आहे. आज त्यांच्याकडे ४ गायी,१५ म्हशींसह वासरू, वगार, कालवड मिळून जवळपास ४० गायी – म्हशी आहेत. दररोज३०- ३५ कि. मी अंतर कापून वरोरा- भद्रावती तालुक्यात ते दुध विक्रीचा व्यवसाय करीत आहेत.
विलोडा रहिवासी संदीप घाटे यांची जर्सी जातीची पाळीव गाय आज शनिवारी प्रसूत झाली. वासराला जन्म देत असताना मालकाने पाहिले असता त्यांना वाटले की, गाय जुळ्या वासरांना जन्म देत आहे. परंतु नंतर त्यांच्या लक्षात आले की, गाय दोन डोके असलेल्या एकाच वासराला जन्म देत आहे. वासरू प्रथमदर्शनी पाहून त्यांनाही आश्चर्य वाटले. ही बातमी आजूबाजूच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली व सर्वांनी या वासराला पाहण्यासाठी एकच गर्दी केली.
गायीच्या मालकाने सांगितले की, या पाळीव गायीचं वय १० वर्षे असून हे दुर्मिळ वासरू त्यांच्या गाईचे पाचवे वासरू आहे .या आधी जन्मलेली चारही वासरू पूर्णपणे सुरक्षित होती. गाई वासरू देणार आहे, याची जाणीव असल्याने त्यादृष्टीने देखभालही सुरू होती परंतु ८ व्या महिन्यांतच गाई प्रसूत झाली. दोन डोक्याचे वासरू हा दुर्मिळ प्रकार असला तरी यापूर्वीही अशा प्रकारच्या वासरांना गाईंनी जन्म दिलेला आहे. तसेच वेळेपूर्वी (२८३ दिवसांपूर्वी ) प्रसूती होण्याची ही प्रथम घटना नाही. परंतु गाईने कोणत्याही तज्ज्ञांच्या मदतीशिवाय दोन डोक्याचे वासरू जन्माला आल्याने वासरू जास्त वेळ जगू शकले नाही. मात्र गाई सुस्थितीत असल्याची माहिती आहे. दोन डोक्याचे वासरू जन्माला येण्याची जिल्ह्यातील ही कदाचित पहिलीच घटना आहे.