By रविकुमार बंडीवार
लालगुडा शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त चिमुकल्यांचे छोटे प्रयोग..
नांदा फाटा: कोरपना तालुका अंतर्गत गडचांदूर केंद्रातील लालगुडा जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा झाला.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपली जिज्ञासा जागृत ठेवून प्रत्येक गोष्टीत वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत ठेवावा, असे शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश बोबडे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून सांगितले. तसेच शाळेचे प्रयोगशील शिक्षक गोविंद पेदेवाड यांनी थोर शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही रमण यांच्या विषयी माहिती देऊन “विज्ञानाची कास धरा आणि देशाची प्रगती करा “असा विद्यार्थ्यांना संदेश दिला. त्यांनी हवेचा दाब ,हवेला वजन असते, ज्वलनास ऑक्सिजनची आवश्यकता असते, पाणी शुद्धीकरण अशा छोट्या छोट्या प्रयोगातून विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट केल्या.
यावेळी शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी देखील विविध वैज्ञानिक प्रयोग सादर केले. पाण्याचा पृष्ठीय ताण, पाण्याची घनता तपासणे, जलचक्र, सूर्यमाला, फुफुसाचे आकुंचन -प्रसरण , इत्यादी.
यावेळी विद्यार्थ्यांची प्रश्नमंजुषा घेण्यात आली व सर्व बाल वैज्ञानिकांनी सादर केलेल्या प्रयोगाचे खूप खूप कौतुक करण्यात आले.