लोकदर्शन 👉 राहुल खरात
पुणे : फुले, शाहू, आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन, पुणे च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे दि. 27 फेब्रुवारी, 2024 रोजी म्हणजेच मराठी भाषा गौरव दिनी सायंकाळी 6 वा धायरी, पुणे येथील निसर्ग मल्टीपर्पज हॉलमध्ये उच्चशिक्षित सत्यशोधक घनश्याम देवरे (साहाय्यक प्राध्यापक, पुणे) व सत्यशोधिका करिश्मा टापरे(सिनिअर ग्राफिक डिझायनर,पुणे) यांचा ४८ वा आंतरजातीय मोफत सत्यशोधक विवाह सोहळा प्रबोधन करीत संपन्न झाला.
या वधू-वरांची रजिस्टर नोंदणी करून विवाहप्रसंगी *संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक व सत्याशोधिका आशा ढोक* यांच्या शुभहस्ते वधू-वरांना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र व थोर समाज सुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा भेट देण्यात आली. वधू-वरांच्या पालकांना व मामा-मामींना देखील राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे प्रमुख पाहुणे सौ.रेखा आखाडे,नूतन शिवरकर, महेश बनकर ,शिल्पकार कांबळे यांचे हस्ते सन्मानपत्र दिले गेले.
यावेळी अक्षता म्हणून तांदुळाऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर केला तर विधिकर्ते म्हणून नेहमी प्रमाणे महात्मा फुले यांचे वेशभूषेत ढोक यांनी कार्य पार पाडले आणि महात्मा फुले रचीत मंगलाष्टकेचे गायन प्रा.अमित राणे यांनी केले.महापुरुषांचे ग्रंथ व ज्योती म्हणजेच *ज्ञानज्योतीभोवती सप्तपदी घेऊन वर – वधू यांनी सोबतीने सात वचने घेत दीप प्रज्वलित केले त्याच प्रमाणे शपथ पत्राचे वाचनदेखील केले .*
*या विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा. छगनरावजी भुजबळ साहेब यांनी आवर्जून शुभ संदेश व शुभेच्छा दिल्या त्या पत्राचे वाचन भाग्यश्री मानकर हिने केले.*
याप्रसंगी सत्यशोधक ढोक म्हणाले की वधू करिश्मा व वर मराठी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक घनश्याम देवरे यांनी *हुंडा, मुहूर्त, अंधश्रद्धा, कर्मकांड,* इत्यादी अनिष्ट प्रथांना मूठमाती देत मराठी भाषा गौरव दिनी दोघांनीही आपल्या पालकांची व नातेवाईकांची संमती घेऊन नाहक आर्थिक उधळपट्टी न करता महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी प्रबोधन करीत आपल्या साक्षीने हा विवाह केला .तो आदर्श सर्वांनी घ्यावा असे देखील ढोक म्हणाले.
या सोहळ्याचे सूत्रसंचालन सौ.भाग्यश्री व कुंदन मानकर यांनी केले तर आभार श्रीमती.मंगला देवरे आणि मंगला टापरे यांनी मानले तर मोलाचे सहकार्य परभणीचे प्रा .गणेश घणसावंत ,क्षितिज ढोक केले आणि देवरे टापरे परिवारातर्फे सर्वांना महात्मा फुले ग्रंथ,फुल झाडे आणि सत्यशोधक विवाह विधीचे पुस्तके वाटप केले यामुळे विवाहाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली काही तरुणांनी आम्ही याच पद्धतीने लग्न करणार असे जाहीर देखील केले.