तरुणाईने मुस्कटदाबीला संविधानिक मार्गाने उत्तर दिले पाहिजे : डॉ.किशोर कवठे

by : Avinash Poinkar

गडचिरोली :

देशापुढे धार्मिक झुंडशाही, राजकीय हुकुमशाही, औद्योगिक बेबंदशाही, अविवेकी सामाजिकता अशी आव्हाने उभी ठाकली आहेत. देशात पटापट होणारे राजकीय घटस्फोट, वाढती एकल धर्मांधता यामुळे भूमिका निर्माण होण्याच्या वयात, तरुणाईत संभ्रम आणि नकारात्मकता वाढीला लागली आहे. मात्र याचे फारसे प्रतिबिंब समकालीन साहित्यात उमटताना दिसत नाही. आदिवासीबहुल भागातील नवलेखकांनी स्वतःच्या जाणीवा शब्दबद्ध करणे महत्वाचे असून विद्यापीठानेही त्यास प्रोत्साहनाची गरज आहे. तरुणाईच्या होणा-या मुस्कटदाबीला संविधानिक मार्गानेच आजच्या समकालात उत्तरे दिली पाहिजे, असे प्रतिपादन युवा साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक डॉ.किशोर कवठे यांनी केले.

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आयोजित स्थानिक सुमानंद सभागृहात दोन दिवसीय युवा साहित्य संमेलनाचे नुकतेच उद्घाटन पार पडले. सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात झाली. उद्घाटन सत्राला संमेलनाध्यक्ष साहित्यिक डॉ.किशोर कवठे, स्वागताध्यक्ष कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, उद्घाटक व सत्कारमूर्ती ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ समाजसेवक डॉ अभय बंग, प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, जागतिक साहित्याचे अभ्यासक प्रा. ज्ञानेश्वर गटकर, बांबू प्रशिक्षक मीनाक्षी वाळके, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

उद्घाटनानंतर पहिल्या सत्रात दास्तांगोईचे सादरीकरण मुंबईचे अक्षय शिंपी व नेहा कुळकर्णी यांनी केले. ‘माडिया व गोंडी भाषा साहित्याचे संवर्धन’ या विषयावर सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद पार पडला. पत्रकार राजेश मडावी, माडीया व गोंडी भाषेचे अभ्यासक नंदकिशोर नैताम, सोनाली मडावी यांनी भाषा संवर्धनाच्या अंगाने मांडणी केली. तिस-या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन पार पडले. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक समन्वयक डॉ.सविता गोविंदवार, संचालन संशोधक करीश्मा राखुंडे तर आभार सहायक प्रा.अमोल चव्हाण यांनी मानले.

•••

 

जीवनवादी साहित्याची निर्मिती आणि विचारांची गरज

आजच्या युवकांपुढे बरीच आव्हाने आहेत. काळ झपाट्याने बदलत आहे. रंजनवादी साहित्यापलीकडे आता जीवनवादी साहित्याची निर्मिती आणि विचारांची गरज असल्याचे मत जेष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग यांनी केले. परंपरा आणि नवतेची सांगड नवलेखकांनी घालणे, समजून घेणे व त्यातून साहित्य निमीत्ती करण्याचे आवाहन ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा संमेलनाचे उद्घाटक डॉ.रवींद्र शोभणे यांनी केले.

•••

युवा साहित्यिकांना व्यासपीठ देण्यासाठी विद्यापीठ कटीबद्ध

युवा साहित्य संमेलन गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत आयोजित करणे हा नवा अनुभव आहे. पुढील काळात युवा साहित्य संमेलनाची परंपरा कायम ठेवली जाईल. गोंडवना परिसरातील नव्या पिढीतील लेखक, साहित्यिकांना प्रोत्साहन देणार असून विद्यापीठ यासाठी कटीबद्ध राहील असे मत स्वागताध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी व्यक्त केले.

•••

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *