by : Shankar Tadas
राजुरा :
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था अभियानातील उल्लेखनीय योगदानाबद्दल भारतीय पर्यावास केंद्र, नवी दिल्ली येथे दि. १६ ते १८ फेब्रुवारी २०२४ दरम्यान आंतरराष्ट्रीय आरोग्य व्यवस्थापन आणि संशोधन संस्था (आय.आय. एच.एम.आर.) दिल्ली तर्फे आयोजित ६ व्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मनीष अशोकराव मंगरूळकर, विषय शिक्षक, जि. प. उच्च प्राथमिक शाळा मूर्ती, पंचायत समिती राजुरा, जिल्हा चंद्रपूर यांना रोख रक्कमेचा – नरोतम सेखसरिया फाऊंडेशन Tobacco Free India Award 2023-2025 – तंबाखू मुक्त भारत हा राष्ट्रीय पुरस्कार डॉ अतुल गोयल, डिरेक्टर जनरल, केंद्रिय आरोग्यसेवा, नवी दिल्ली, भारत सरकार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सदर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मान. युतारो सेतोया, टोकियो जपान, टीम प्रमुख, जागतिक आरोग्य संघटनेचे भारतीय कार्यालय , डॉ अक्षय जैन, जाईंट डिरेक्टर, राष्ट्रीय आरोग्यसेवा, भारत सरकार, डॉ मनीष जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी, नरोतम सेखसरिया फाऊंडेशन मुंबई, डॉ प्रकाश गुप्ता, डिरेक्टर, हेलिस इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, डॉ सुतापा बी. नेओगी, डिरेक्टर, आय.आय.एच.एम.आर. दिल्ली यांची मुख्य उपस्थिती होती.
मनीष मंगरूळकर हे मागील १२ वर्षांपासून पोंभुर्णा व राजुरा तालुक्यातील तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्था अभियानात तालुका तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून तंबाखू विरोधी जनजागृती करण्याचे कार्य करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली CBSE बोर्डाने सुचविलेले व केंद्र सरकार ने प्रमाणित केलेले सर्व निकष पूर्ण करून सन २०१४-१५ मध्ये जि. प. उच्च प्राथमिक शाळा डोंगरहळदी नं ३, ही शाळा पोंभुर्णा तालुक्यातील पहिली तंबाखू मुक्त शाळा घोषित करण्यात आली.
आणि त्यानंतर त्यांनी पोंभुर्णा तालुक्यातील शाळांमध्ये तंबाखू मुक्त शाळा निकष पूर्ती करण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य केले.
सध्या मनीष मंगरूळकर हे राजुरा तालुका तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची विद्यमान जि.प.उच्च प्राथमिक शाळा मूर्ती ही शाळा सुद्धा त्यांनी सक्रिय विद्यार्थी, सहकारी शिक्षक, प्रेरक मुख्याध्यापक, सकारात्मक शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व गावकरी यांच्या सहकार्याने केंद्र सरकार द्वारा निश्चित केलेल्या नवीन ९ निकषांची पूर्ती करून शाळेला तंबाखू मुक्त शाळा प्रमाणपत्र मिळविले.
विशेष उल्लेखनीय म्हणजे ३ वर्षांपूर्वी कोरोना रोगाच्या प्रादुर्भाव काळात पहिल्या राज्यस्तरीय ऑनलाईन बालपरिषदेमध्ये मनीष मंगरूळकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची विद्यार्थीनी कु. प्रियानी प्रवेश जुलमे या विद्यार्थीनीने श्री दिनकर टेमकर, शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या सोबत तंबाखू मुक्त अभियान अंतर्गत उपक्रम शाळांमध्ये राबविण्यासाठी आर्थिक अनुदानाच्या उपलब्धतेबाबत आत्मविश्वासाने प्रश्नोत्तर रूपात संवाद साधला. तर मागील वर्षी १० राज्यातील विद्यार्थीवृंद सहभागी असलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेत कु. अस्मिता शिवाजी डाखरे या विद्यार्थीनीने दिल्ली येथील केंद्रीय आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय सल्लागार श्रीमती पुजा गुप्ता यांना मूर्ती शाळेत व गावात राबविण्यात आलेल्या तंबाखू मुक्तीच्या उपक्रमांची माहिती देऊन प्रश्नोत्तर रूपात चर्चा केली. आणि नुकतेच मागील महिन्यात झालेल्या नागपूर, नाशिक व अमरावती विभागीय ऑनलाईन बालपरिषदेचे संयुक्त सुत्रसंचलन श्री मनीष अशोकराव मंगरूळकर यांनी केले व त्यांची विद्यार्थीनी कु. अस्मिता शिवाजी डाखरे हिने वाशिम येथील जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा. राजेंद्र शिंदे यांच्यासह अनुभवकथन करून प्रश्नोत्तर रूपात संवाद साधला, हे विशेष.
डोंगरहळदी नं.३, ता. पोंभुर्णा व मूर्ती, ता. राजुरा या दोन्ही जिल्हा परिषद शाळेचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचवल्या बद्दल व त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतल्या गेल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करून अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या जात आहेत.
मनीष मंगरूळकर यांनी या राष्ट्रीय स्तरावरील यशाचे श्रेय त्यांचे दोन्ही शाळेतील व तालुक्यातील क्रियाशील विद्यार्थीगण, सहकारी शिक्षकवृंद, प्रोत्साहन देणारे मुख्याध्यापकगण, सकारात्मक शाळा व्यवस्थापन समिती तथा गावकरी, प्रेरक अधिकारी वर्ग, मार्गदर्शक सलाम मुंबई फाऊंडेशन, मुंबई, नरोतम सेखसरिया फाऊंडेशन मुंबई आणि कुटुंबातील सर्व सदस्य व मित्र मंडळी या सर्वांना दिले आहे.