लोकदर्शन 👉 मोहन.भारती
कोरपना – सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. एमपीएससी व यूपीएससीच्या माध्यमातून विद्यार्थी जीवनात यशस्वी होऊ शकतो. गरिबीला दोष न देता विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत केल्यास इच्छाशक्तीच्या भरवशावर यश मिळवता येते असे प्रतिपादन गडचांदूर येथील पोलीस निरीक्षक राजकमल वाघमारे यांनी केले.
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून एमसीव्हीसी विभागाच्या प्रमुख प्रा. आरजु आगलावे, प्रा. नंदा भोयर उपस्थित होत्या. यावेळी बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. विवेक पाल यांनी केले. प्रास्ताविक प्रा. आशिष देरकर यांनी केले तर आभार प्रा. माधुरी पेटकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व प्राध्यापक विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.