आर सुंदरेसन यांना बाबा आमटे जीवनगौरव तर राजकुमार सिन्हा यांना सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार घोषित

by : Shahid Akhtar

वरोरा : बाबा आमटे एकता अभियान ट्रस्टच्या वतीने यावर्षीचा ” बाबा आमटे जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार ” तामिळनाडूच्या मदुराई येथील समाजसेवी आर. सुंदरेसन ( वय ८३ वर्षे ) यांना तर ” बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार ” राजकुमार सिन्हा यांना जाहीर झाला आहे. कोलकता येथील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते व भारत जोडो सायकल अभियान ( पूर्वांचल विभाग) चे राष्ट्रीय समन्वयक ओ. पी. शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण समारोह शनिवार,१० फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वाजता आनंदवनातील मुख्यमंत्री सभागृहात होणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विकास आमटे, सचिव डॉ. अशोक बेलखोडे, पदाधिकारी गिरीश पदमावार, शकील पटेल यांनी आनंदवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेत डॉ. बेलखोडे म्हणाले की, थोर समाजसेवक श्रद्धेय बाबा आमटे यांनी राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी युवक – युवतींना सोबत घेऊन ३६ वर्षांपूर्वी ‘ कन्याकुमारी ते काश्मीर ‘ व ‘ अरुणाचल प्रदेश ते गुजरात ‘ अशा दोन ” भारत जोडो” सायकल यात्रा काढल्या होत्या. नंतर पंजाब मध्ये ‘ पीस बाय पीस मिशन ‘ अभियान राबविले व इतिहास घडला. बाबा आमटे यांचे कार्य पुढे नेण्यासाठी दोन्ही भारत जोडो अभियानातील सायकल यात्रींनी एकत्र येऊन ‘ बाबा आमटे एकता अभियान ट्रस्ट ‘ ची स्थापना केली. बाबा आमटे यांच्या नावाने राष्ट्रीय स्तरावर मागील वर्षी “बाबा आमटे जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार” व या वर्षीपासून ‘बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार ” देण्याचे निश्चित केले. सन २०२३ साठी ट्रस्ट तर्फे आर. सुंदरेसन व राजकुमार सिन्हा यांची निवड करण्यात आली.
बाबा आमटे जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे तामिळनाडूच्या मदुराई येथील आर. सुंदरेसन यांनी लहानपणापासून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विशेष करून अन्न सुरक्षेसाठी, राष्ट्रीय एकात्मता व आपातकालीन व्यवस्थापन, पर्यावरण रक्षण इत्यादी क्षेत्रात अतुलनीय अशी कामगिरी केली आहे. सोबतच बाबा आमटे यांच्या संकल्पनेतील ‘ भारत जोडो ‘ सायकल यात्रा अभियान यशस्वी करण्यासाठी ‘ राष्ट्रीय समन्वयक ‘ म्हणून अत्यंत मोलाचे योगदान दिले. एक लाख रुपये,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे मध्यप्रदेश येथील वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ता राजकुमार सिन्हा हे मागील ३५ वर्षांपासून मध्यप्रदेशच्या जबलपूर परिसरातील बरगी धरणामुळे प्रभावित व विस्थापित झालेल्यांच्या पुनर्वसनासाठी रचनात्मक कार्य करीत आहेत. बाबांच्या ‘भारत जोडो ‘ अभियानात त्यांनी पूर्णवेळ सहभागी होऊन प्रवास केला होता. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रथमतः बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे. ५१ हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा महारोगी सेवा समितीचे कार्यकारी विश्वस्त डॉ. विकास आमटे हे भूषविणार आहेत. नागपूरचे मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम, गतवर्षी बाबा आमटे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व सामाजिक कार्यकर्ते सत्यपाल ग्रोवर , देशभरातील भारत जोडो अभियान सायकल यात्री, सामाजिक कार्यकर्ते व परिसरातील युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला जास्तीत जास्त आनंदवन प्रेमी जनतेनी उपस्थित राहावे, असे आवाहन बाबा आमटे एकता अभियान ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *