by : Shankar Tadas
गडचांदूर :
बिबी – सृष्टी बहुउद्देशीय संस्था, गडचांदूर द्वारा संचालित एकलव्य इंग्लिश स्कूल नांदाफाटा या शाळेचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. उपक्रमशील शाळा असल्याने एकलव्य शाळेच्या पुढाकाराने सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडतील असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे अधिष्ठाता डॉ. अनिल चिताडे यांनी केले.
रविवारी एकलव्य शाळेत आयोजित बालदृष्टी – २०२४ या सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. अनिल पोडे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी विद्यालय व उच्च महाविद्यालयाच्या प्राचार्या स्मिता चिताडे, संस्थेचे उपाध्यक्ष अनिल उरकुडे, सचिव प्रा.आशिष देरकर, कोषाध्यक्ष सचिन आस्वले, सदस्या पौर्णिमा पोडे, शाळेच्या व्यवस्थापक स्वाती देरकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत मसे, मुख्याध्यापक नितेश शेंडे उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या वतीने राज्य शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित महात्मा गांधी विद्यालयाच्या प्राचार्या स्मिता चिताडे यांचा सत्कार करण्यात आला. दरवर्षी देण्यात येणाऱ्या शाळेतील सर्वोत्कृष्ठ विद्यार्थी पुरस्कार यावेळी आठव्या वर्गातील विद्यार्थिनी रितिका पंडित पवार हिला सर्व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. सोबत शाळेतील अंतर्गत खेळ, सांस्कृतिक, विज्ञान अशा विविध उपक्रमात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवारांच्या हस्ते सुवर्ण व रौप्य पदक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमामध्ये नर्सरी ते दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी एकापेक्षा सरस नृत्य सादर करीत उपस्थित पालक व प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नितेश शेंडे यांनी केले. संचालन पूजा बर्मन व प्रिया चौधरी यांनी तर आभार रेवती लांडे यांनी मानले. कार्यक्रमाला पालक व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.