By : Devanand Sakharkar
चंद्रपूर/यवतमाळ : राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या विशेष प्रयत्नातून फिलीपाईन्स मधून एमबीबीएस चे वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या सुमारे ३२०० भारतीय विद्यार्थ्यांचे अंध:कारमय जीवन उजळले आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या कार्यालयात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (National Medical Commission) अधिकाऱ्यांना सुनावणीस पाचारण करून या सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला.
देशभरातील अनेक विद्यार्थ्यांनी फिलीपाईन्स येथून एमबीबीएस चे शिक्षण घेतल्यानंतर त्यांना एनएमसी मार्फत पात्रता प्रमाणपत्राची (Eligibility certificate) आवश्यकता असतांना सुध्दा सदर प्रमाणपत्र देण्यापूर्वी या सर्व भारतीय विद्यार्थ्यांनी पुन्हा नीट (NEET) परीक्षा देणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे यासर्व विद्यार्थ्यांपुढे अडचण निर्माण झाल्याने संबंधित वैद्यकीय शिक्षण प्राप्त काही मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या कार्यालयास भेट देवून आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्यापुढे आपली व्यथा मांडली. सदर प्रश्नाची गांभीर्याने दखल घेवून हंसराज अहीर यांनी एनएमसी च्या अधिकाऱ्यांना आयोगापुढे सुनावणीस बोलावून या प्रश्नी तोडगा काढण्याचे आदेश दिले होते.
सदर आदेशानुसार राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा नीट परीक्षा देण्याचा अन्यायकारक आदेश मागे घेत या विद्यार्थ्यांना पात्रता प्रमाणपत्र जारी करून न्याय दिल्याने या सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांना हंसराज अहीर यांच्या पुढाकाराने अखेर न्याय मिळाला. त्यामुळे दि. ०२ फेब्रुवारी रोजी या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने अहीर यांची चंद्रपूर येथील कार्यालयात भेट घेत स्मृतिचिन्ह देवून त्यांचे आभार मानले. या प्रसंगी यवतमाळ भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, खुशाल बोंडे, विजय राऊत, वणीचे माजी नगरसेवक राजु भोंगळे यांची उपस्थिती होती. सदर शिष्टमंडळात निकीता कुटे, रोहीत पोटे, साक्षांत येखंडे, इशांत सोनुले, श्रुती देशमुख, अपूर्व पारटकर, अपुर्वा धंदर व पालकांची उपस्थिती होती.