By : Shankar Tadas
कोरपना : कोरपना हे तेलंगणा राज्य व यवतमाळ जिल्हा सीमेवरील शेवटचे तालुक्याचे ठिकाण व महत्त्वाचे शहर आहे. परंतु येथून एकही थेट राज्याची उपराजधानी व विभागाचे मुख्यालय असलेल्या नागपूर व वरोरासाठी बस फेरी नाही. परिणामी व्यापारिक खरेददारी, कार्यालयीन , वैद्यकीय, शैक्षणिक व इतर कामासाठी जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते आहे. गडचादुर येथून नागपूर व वरोरा साठी तीन ते चार थेट बस फेऱ्या धावतात. या बस फेऱ्या कोरपना पर्यंत वाढवण्यात याव्या अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होते आहे.
बसेसच्या संपापूर्वी राजुरा – नागपूर ही कोरपना – वणी मार्गे थेट बस सेवा सुरू होती. बसेसचा संप मिटला मात्र अद्याप ही बस सेवा पूर्ववत करण्यात आली नाही. त्यामुळे कोरपना सह परिसरातील तेलगणा राज्य , यवतमाळ जिल्ह्यातील शंभरहून अधिक गावातील ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे. कोरपना हे मध्यवर्ती स्थान असल्याने येथे अनेक शासकीय निमशासकीय कार्यालय , बँका , शैक्षणिक संस्था , मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे येथील रेलचेल मोठ्या प्रमाणात आहे.शिवाय येथून विदर्भातील दुसरे मोठे शहर असलेले अमरावती , मराठवाड्यातील किनवट, तेलंगणातील आदिलाबाद , उटनुर , बेला ,यवतमाळ जिल्ह्यातील वणी , जिल्ह्यातील चंद्रपूर, राजुरा , वरोरा , गडचांदूर व ग्रामीण भागातील परसोडा ,पारडी , कोडशी बू आदी ठिकाणी साठी बस फेऱ्या धावतात. गडचादूर वरून जाणाऱ्या बस फेऱ्या वीस किलोमीटर अंतर असलेल्या कोरपना पर्यंत अतिरिक्त वाढविल्यास परिसरातील नागरिकाची अडचण दूर होईल. या अनुषंगाने राज्य परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर विभाग नियंत्रक व राजुरा येथील आगार व्यवस्थापकांनी लक्ष देऊन नियोजन करणे आवश्यक आहे.
भोयगाव मार्गे बसफेरी बंदच
चंद्रपूर – भोयगाव – कोरपना ही कोरोना पूर्वी थेट बस फेरी होती. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना जाण्या- येण्यासाठी अत्यंत सोयीस्कर होते. परंतु ही बस रस्ता नादुरुस्तीचे कारण देत बंद ठेऊन आहे. मात्र आता हा रस्ता पूर्णत पुलाच्या बांधकामासह सुस्थितीत झाला. त्यामुळे ही बस फेरी पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी अपेक्षा या भागातील ग्रामस्थ कडून होते आहे. ही बस फेरी सुरू झाल्यास चंद्रपूर व कोरपना तालुक्यातील गावातील प्रवाशांना जिल्हा मुख्यालय व तालुका स्थळी जाण्या – येण्याची अडचण दूर होईल. ही बस फेरी चंद्रपूर व कोरपना येथून सकाळी आठ , सायंकाळी पाच वाजता सुरू करावी.
ही बस फेरी आठवडाभरात सुरू न केल्यास जन आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.