रविकुमार बंडीवार नांदा फाटा : स्वराज्याला दोन दोन छत्रपती देणाऱ्या स्वराज्य जननी माँ जिजाऊ यांची काल १२ जानेवारीला जयंती होती. त्यानिमित्य आवाळपूर येथे राजमाता जिजाऊ महिला मंडळ आवाळपूर च्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी जिजाऊंची पालखी काढण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने माऊली भजन मंडळ आवाळपुर,सद्गुरु नामदेव महाराज महिला भजन मंडळ आवळपुर,गावातील महिला व राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या सदस्यांनी सहभाग घेतला. गावातील महिलांनी घरासमोर स्वच्छता करत वेगवेगळ्या जुन्या काळातील देखावे सादर केले. कुणी जात्यावर दळण दळण्याचा, कुणी चुलीवर भाकरी बनविण्याचा तर कुणी ठेचून मसाले तयार करण्याचे देखावे सादर केले. गावातील प्रत्येक घरासमोर रांगोळी काढून महिलांचे व पालखीचे स्वागत करण्यात आले.
सायंकाळी कनिष्ठ गट व वरिष्ठ गट अशा दोन गटात रंगभूषा, वेशभूषा स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, एकलनृत्य स्पर्धा, एकांकिका, अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या. महिलांनी साकारलेल्या शिवाजी राजांच्या जीवनावरील आधारित नृत्याने सर्वांना भारावून सोडले. गावातील चिमुकल्यांनी एकापेक्षा एक सरस नृत्ये सादर करून मने जिंकली. महिलांनी सादर केलेल्या नाटीकेला लोकांनी भरभरून दाद दिली. पहिल्यांदाच आवाळपुरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला एकत्रित येत जिजाऊ जयंतीचे आयोजन होत असल्यानी गावात आनंदाचे वातावरण होते.
कार्यक्रमाला उदघाटक म्हणून आवाळपूर गावाच्या सरपंच्या प्रियंका दिवे, अध्यक्ष म्हणून ह.भ.प गोहकार महाराज, माजी सरपंच लटारी ताजणे, जेष्ठ शिक्षिका शोभा शेंडे, शिक्षक बादल दिवे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुरेश धोटे, ग्रामपंचायत सदस्य कल्पतरू कन्नाके, ग्रामपंचायत सदस्या स्वाती नगराळे, मनीषा कोट्टे, शारदा मोहुर्ले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अवंती लांडे तर प्रस्ताविक नेहा लांडे आणि आभार प्रदर्शन संध्या येलेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला गावातील प्रेक्षकांचा मोठा पाठींबा लाभला.