लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि ६.डिसेंबर शिवडी (मुंबई )ते न्हावा (उरण) या दरम्यान अटल सेतूचे काम पूर्ण झाले असून या लिंकचे उदघाटन शुक्रवार दि १२ जानेवारी २०२४ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.सागरी मार्गावर प्रवास करण्यासाठी सिंगल टोल २५० रुपये व रिटर्न टोल ३७५, दैनिक पास ६२५ रुपये टोल, मासिक पास १२,५०० इतके रुपये टोल नाका आकारले जाणार आहे.यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला खूप मोठा भुर्दंड बसणार आहे.सर्वसामान्य व्यक्त्ती एवढे रुपये भरून अटल सागरी सेतू वरून प्रवास करू शकत नाही. शिवाय अटल सेतू हा सागरी महामार्ग प्रकल्प उरण व पनवेल तालुक्यातील नागरिकांच्या जमिनीतून गेल्याने उरण पनवेल तालुक्यातील स्थानिक नागरिकांना अटल सेतू मार्गावर टोलमाफी मिळावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, एमएमआरडिएचे मुख्य आयुक्त संजय मुखर्जी, रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे केली आहे.
न्हावा शिवडी हा २२ ते २४ किलोमीटरचा एम. एम. आर. डी.ए चा महत्वकांक्षी सागरीमहामार्ग प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. या प्रकल्पासाठी उरण व पनवेल तालुक्यातील स्थानिकांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. तसेच हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी स्थानिकांचा मोलाचा हातभार लागला आहे. ह्या सेतूमुळे उरण पनवेल वासीयां सोबत रायगड तसेच कोकणवासीयांचा प्रवास हा सुखकर तसेच वेळेची बचत करणार असेल. एम एम आर डी ए तसेच सिडकोचे अनेक प्रकल्प उरण पनवेल तालुक्यातील स्थानिकांच्या जमिनीवर झाले आहेत.आणि यापुढे अनेक प्रकल्प होणार आहेत. या सेतूमुळे होणारे अपघात, प्रदूषण, गर्दी यांचा परिणाम स्थानिक जनतेलाच सहन करावा लागणार आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या म्हणण्यानुसार स्थानिकांना त्यांच्या आधारकार्डच्या आधारे टोलमुक्ती करण्यात यावी त्या अनुषंगाने उरण पनवेल तालुक्यातील स्थानिकांना या सागरी सेतूवर टोलमुक्ती देण्यात यावी अशी मागणी पत्रव्यवहाराच्या माध्यमातून संदेश ठाकूर यांनी प्रशासनाकडे केली आहे. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संदेश ठाकूर यांनी प्रशासनाला दिला आहे.