गडंचादुर : तालुक्यातील महाराष्ट्र- तेलंगाना सीमावर्ती भागातील ग्रा.पं. देवाडा क्षेत्रातील श्री सिद्धेश्वर देवस्थान मंदिराच्या जतन दुरुस्ती व पुनरनिर्माण कामाकरीता राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ गुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार 14 कोटी 93 लक्ष 99 हजार 753 रु. निधी 13 जून 2023 रोजी प्रशासकीय मान्यतेसह मंजूर केला होता. सदर काम सुरू करण्यासंबंधी निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यारंभ आदेश दिलेला असुन प्रत्यक्ष या कामाचा शुभारंभ सुद्धा लवकर होणार आहे. या मंदिराचे काम दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून व बांधकामात येणाऱ्या अडचणी व समस्या सोडविण्याकरिता शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शा.नि.क्रमांक 2023 प्रकरण क्रमांक 276/सां.का. 3, दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी च्या शासन निर्णयानुसार समिती गठित करून माजी आमदार तथा श्री तिरुपती बालाजी देवस्थान चुनाळा चे अध्यक्ष सुदर्शन निमकर यांची प्रमूख निमंत्रकपदी नियुक्ती करण्यात आली असून, या समितीवर अशासकीय सदस्य म्हणून श्री सिद्धेश्वर देवस्थान विश्वस्त कमेटीचे सचिव श्री किरण चेनवेनवार, ग्रामपंचायत देवाडा चे सरपंच श्री शंकर मडावी यांची निवड करण्यात आली आहे. समितीवर केलेल्या निवडीचे श्री सिद्धेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ डेवाडा तथा परिसरातील जनतेनी ना.सुधीरभाऊ यांचे अभिनंदन केले आहे.
जागृत व प्रसिध्द अशा या श्री महादेवाच्या मंदिराचा जिर्णोध्दार व्हावा व या तीर्थस्थळी उत्तम पर्यटन स्थळ निर्माण व्हावे याकरिता माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार व पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता हे विशेष. या समितीच्या पदसिध्द अध्यक्षपदी राजुरा चे उपविभागीय अधिकारी राहाणार आहे. तसेच या समितीमध्ये पदसिध्द सदस्य म्हणून तहसीलदार राजुरा, वनपरिक्षेत्र अधिकारी विरुर स्टेशन, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजुरा व तसेच पदसिध्द सचिव म्हणून सहाय्यक संचालक, पुरातत्त्व विभाग, नागपूर यांची निवड करण्यात आली आहे. या ऐतिहासिक अशा पवित्र मंदिराचे भूमिपूजन भव्य स्वरूपात व्हावे अशी जनतेची ईच्छा असल्यामुळे त्वरित भूमिपूजनाची तारीख निश्चित करण्याची विनंती ना. सुधीरभाऊ गुनगंटीवार यांचेकडे करण्यात आली आहे. महाशिवरात्री च्या पावन पर्वावर हजारो भाविक दर्शनासाठी या मंदिरात येत असतात. आता गेल्या अनेक वर्षापासून भग्नावस्थेत व दुर्लक्षित असलेल्या या ऐतिहासिक अशा पवित्र धार्मिक स्थळाचा कायापालट ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टी मुळे होऊन, उत्तम असे पर्यटन स्थळ निर्माण होणार आहे. या कामाकरिता 15 कोटी रु. मंजूर करून निधी वितरित केल्याबद्दल परिसरातील जनतेनी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.