चंद्रपूर वन अकादमीला तीन स्टार मानांकन

by : Devanand Sakharkar

चंद्रपूर : वन विभागांतर्गत विविध क्षेत्रात कार्यरत अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या चंद्रपूर वन अकादमीला भारतीय गुणवत्ता परिषदेच्या शिक्षण आणि प्रशिक्षण राष्ट्रीय मान्यता मंडळाद्वारे (एन.ए.बी.ई.टी.) उत्कृष्ट प्रशिक्षण संस्था म्हणून तीन स्टार मानांकन प्राप्त झाले आहे. या मूल्यमापनातून चंद्रपूर वन अकादमीने देशातील पहिल्या 10 संस्थांमध्ये स्थान मिळविण्याचा गौरव प्राप्त केला आहे.
एन.ए.बी.ई.टी. ही स्वायत्त संस्था भारतातील राष्ट्रीय नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांना राष्ट्रीय मानकांनुसार मान्यता देते. संस्थेच्या चमूने चंद्रपूर वन अकादमीची पाहणी करून विविध निर्देशकांच्या आधारे अकादमीचे मूल्यांकन केले. यात प्रशिक्षणाच्या गरजा मूल्यांकन आणि अभ्यासक्रम रचना, प्रशिक्षण मूल्यमापन आणि गुणवत्ता हमी, प्रशिक्षण कार्यक्रमांचे व्यवस्थापन आणि पर्यवेक्षण, संसाधने आणि प्रशिक्षण लक्ष्य, प्रशिक्षणार्थी समर्थन, डिजिटलायझेशन, ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म आणि ई-लर्निंग मॉड्यूल यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर, प्रशिक्षण परिसंस्थेतील विविध भागधारक आणि सरकारी संस्था यांच्यातील सहकार्य आदी बाबींचा समावेश होता.
राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून विकसित झालेल्या चंद्रपूर वन अकादमीत भारतीय वन सेवा, रेंज फॉरेस्ट ऑफिसर्स आणि वन विभागाच्या इतर क्षेत्रीय आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांना वन व्यवस्थापन, वन्यजीव संरक्षण, जैवविविधता, पर्यावरणीय कायदे, समुदाय प्रतिबद्धता आणि प्रशासकीय बाबी यासह विविध विषयांवर सर्वसमावेशक प्रशिक्षण देण्यात येते. वन अकादमी आधुनिक सुविधा आणि संसाधनांनी सुसज्ज असून येथे व्याख्यान कक्ष, प्रशिक्षण क्षेत्र, प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, वाचनालय आणि प्रशिक्षणार्थीसाठी निवास सुविधा उपलब्ध आहे. चंद्रपूर वन अकादमीला मिळालेली ही मान्यता 19 डिसेंबर 2023 ते 18 डिसेंबर 2025 पर्यंत दोन वर्षांसाठी वैध राहणार आहे.
०००००००

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *