by : Rajendra Mardane
१ ली ते ६ वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पास
वरोरा : जीवन कलहात होरपळून निघालेल्यांना सुखाचा विरंगुळा मिळण्यासाठी रोटरी क्लबच्या वतीने परंपरेप्रमाणे यंदाही रोटरी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ७ वर्षांपासून हा उत्सव घेण्यात येत असून मागील वर्षी गर्दीने प्रचंड उच्चांक गाठला होता. यावर्षी येथील तालुका क्रीडा संकुलाच्या विशाल मैदानावर २४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान ६ दिवसीय ” रोटरी उत्सव २०२३ ” चे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवात सायंकाळी ५ ते रात्रौ १०.३० वाजताच्या दरम्यान मनोरंजनासोबत विविध वस्तू आणि खाद्य पदार्थांची रेलचेल राहणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा १ ली ते ६ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पासची सुविधा देण्यात येणार आहे. ६ दिवसीय उत्सवात शहरवासीयांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. सागर वझे यांनी आनंदवन चौक परिसरातील बघेले लॉन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
डॉ. वझे पुढे बोलताना म्हणाले की, या उत्सवाचे उद्घाटन २४ नोव्हेंबरला नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष व गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय आईंचवार यांच्या हस्ते आणि रोटरीचे प्रांतपाल नितेश जयस्वाल व आनंदवनातील मूक बधिर विद्यार्थ्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.
तालुका क्रीडा संकुलाच्या १ लाख ५० हजार वर्ग फुटात हा भव्य उत्सव आयोजित केला जाणार आहे. सर्वांसाठी सर्व काही म्हणून उत्सवात विविध प्रकारचे जवळपास १७० स्टाल्स असणार आहेत. सामुहिक तुळसी विवाह सोहळा, फायर शो यासह शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा संघटनांतील कर्तबगार व्यक्तींचा सत्कार सोहळा, हे या उत्सवाचे प्रमुख आकर्षण राहणार आहे, अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. पत्रकार परिषदेत रोटरीचे सचिव अधिवक्ता मधुकर फुलझेले, रोटरी पदाधिकारी हुजेफा अली, नितेश जयस्वाल, योगेश डोंगरवार, पराग पत्तीवार, हिरालाल बघेले, बंडू देऊळकर, अनंत सहारे, सचिन जीवतोडे, मनोज कोहळे उपस्थित होते.
*उत्सवाची तयारी जोरात*
तालुका क्रीडा संकुलात २४ नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या ६ दिवसीय उत्सवाची तयारी जोरात असून उत्सवाच्या आकर्षक प्रवेशद्वाराचे कार्य सुरू आहे. फूड झोन व अन्य झोनसाठी जागा आरक्षित करून स्टॉल वितरित करण्यात आले आहे,किड्स झोनसाठी आरक्षित जागेवर विविध पाळणे लावणे सुरू आहे.
*फूड झोन मध्ये ४० स्टाल्स*
फूड झोनमध्ये जवळपास ४० स्टाल्ससाठी जागा चिन्हित करण्यात आली असून तंबू लावण्याचे काम सुरू आहे. स्टाल्समध्ये साऊथ इंडियन गुजराती, महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी अशा विविध प्रसिद्ध व्यंजनाची रेलचेल राहणार असून खवय्यांना या मेजवानीच्या निमित्ताने आवडत्या पदार्थांवर येथेच्छ ताव मारता येणार आहे.
*डान्स, फॅन्सी ड्रेस, गायन स्पर्धा आयोजित*
उत्सवात सहभागी दर्शकासाठी डान्स, फॅन्सी ड्रेस, गीत गायन इ. स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून स्पर्धेत अव्वल येणाऱ्यांना आकर्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
*विविध प्रकारचे पाळणे देणार आनंद*
सर्वांना आकर्षित करण्यासाठी देशाच्या विविध क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे (झुले) उत्सवात असणार आहेत. यामुळे बच्चेकंपनींचा उत्सवातील आनंद द्विगुणित होणार आहे.
*पार्किंगसाठी यावेळी मोठी जागा राखीव*
उत्सवाचा आनंद घेण्यासाठी उत्सवप्रेमी मोठ्या संख्येने, सहपरिवार व इष्टमित्रांसोबत विविध वाहनांनी घटनास्थळी पोहचतात. वाहन ठेवण्यासाठी खाजगी व्यक्ती पार्किंगसाठी मनमानी पैसे उकळतात. ही गैरसोय टाळण्यासाठी संकुलाच्या ठिकाणी पार्किंगसाठी मोठी जागा राखीव ठेवण्याची जबाबदारी रोटरी क्लब ने उचलली आहे.