लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
राजुरा, दि. २२ नोव्हेंबर
भाजपाचे राजुरा विधानसभा निवडणुक प्रमुख, माजी जिल्हाध्यक्ष तथा जि. प. चे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या ४५ व्या वाढदिवसानिमित्त काल (दि. २१) जिल्ह्यात विविध ठिकाणी महारक्तदान शिबीरांसह अनेक सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये घुग्घुस, राजुरा, बिबी, कोरपना, जिवती, विरूर स्टे., तोहोगांव, गोंडपिपरी, पोंभुर्णा, बंगाली कॅम्प चंद्रपूर, इंदिरानगर चंद्रपूर, वरोरा, चंदनखेडा व भद्रावती येथे महारक्तदान शिबीरे संपन्न झाली; तर चंद्रपूर, नकोडा, पालगांव येथेही विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मागील १९ वर्षांपासून अखंडितपणे सुरू असलेल्या या रक्तदान शिबीरांच्या माध्यमातून घुग्घुस व राजुरासह अनेक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळाला. यामध्ये एकाच दिवशी ३०२६ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून राष्ट्रसेवेत आपले योगदान दिले.
याचसोबत नकोडा येथील चर्च येथे शाळकरी मुलांना साहित्यांचे वाटप, पालगांव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसुर्य बिरसामुंडा यांच्या पुतळ्यांना अभिवादन, लालपेठ येथील शिवमंदिरात रुद्राभिषेक, चंद्रपूरातील बबूतउल्लाशहा दर्ग्यावर गोरगरिबांना ब्लँकेटचे वाटप, बाबुपेठ येथे योग मार्गदर्शन शिबीर तर सिद्धेश्वर मंदिरात पुजाअर्चनाही करण्यात आली.
याप्रसंगी आभार मानताना देवराव भोंगळे म्हणाले की,
मागील १९ वर्षांपासून या महारक्तदान शिबीरांचे आयोजन मित्रपरिवाराच्या माध्यमातून होते आणि आबालवृद्धांकडून विक्रमी संख्येने स्वेच्छा रक्तदान केल्या जाते, या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला खरंतर शब्द थिटे पडतात. दरवर्षी रक्तदात्यांच्या आकड्यांत आणि उत्साहात वाढच होत जाते. हे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला भारावणारे आहे. सर्वात कठिण सामाजिक कार्यक्रमांपैकी रक्तदान शिबीराचे आयोजन असते आणि गेल्या कित्येक वर्षांपासून माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी आपण ते अविरतपणे करत आहात आणि या प्रेमात तसुभर ही कमतरता जाणवली नाही; त्यामुळे तुमच्या प्रेमातून उतराई होणे अशक्य आहे.
पुढे बोलताना, आज सकाळी सात वाजताच मतदानाचे पोलींग बुथ लागावे तसे रक्तदान शिबीरं सुरू झालीत, अनेक ठिकाणी उशीरा सायंकाळपर्यंत रक्तदात्यांची रीघ होती. हे ही निश्चितच नमुद करण्यासारखे आहे. माझ्याप्रती आपला स्नेह असाच वृद्धिंगत होत राहो, खरंतर यातूनच मलाही जनसेवेसाठी उर्जा मिळते. असेही ते म्हणाले.
ठिकठिकाणी पार पडलेल्या रक्तदान शिबीरांच्या यशस्वीतेसाठी भाजपचे पदाधिकारी, सर्वपक्षीय मित्रपरिवार आणि सरकारी रक्तपेढी चंद्रपूर, हेडगेवार रक्तपेढी नागपुर, जवाहरलाल नेहरू रक्तपेढी सावंगी मेघे, जिवनज्योती रक्तपेढी नागपुर, शा.वै.महाविद्यालय चंद्रपूर, लाइफलाइन रक्तपेढी आणि अमन रक्तपेढी चंद्रपूर यांनी परीश्रम घेतले.
*दादांचा वाढदिवस म्हणजे रक्तपेढ्यांसाठी दिवाळी – डॉ. हनुमान चौधरी*
देवरावदादा भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त मागील १९ वर्षांपासून रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात येते. या माध्यमातून हजारो रक्तपिशव्यांचे संकलन होत असून त्यातून शेकडो गोरगरीब गरजूंचे प्राण वाचतात. अनेकांना नवजिवन मिळते. त्यामुळे कित्येकांच्या चेहर्यावर आनंद संचारते. जसा दिवाळी सण आपल्या आयुष्यात आनंदाची पर्वणी घेऊन येतो अगदी त्याचप्रमाणे देवरावदादा भोंगळे यांचा वाढदिवस २१ नोव्हेंबर हा दिवस आमच्या रक्तपेढ्यांसाठी दिवाळी पेक्षा कमी नसते. अशी भावना चंद्रपूर शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीचे रक्तदान शिबीर संयोजक डॉ. हनुमान चौधरी यांनी व्यक्त केली.