by : Avinash Poinkar
कोरपना (चंद्रपूर) :
देशाला लुटण्याचे, संविधान आणि कायदे बदलण्याचे धोरण सत्ताधारी व उद्योगपती मिळून करत आहेत. विकासाच्या नावावर आदिवासींचे विस्थापन होत आहे. ३९ कायदे संपवून ग्रामसभा व लोकशाहीविरोधी ४ नवीन कायदे कंपण्या व पैशाची गुंतवणूक करणा-यांसाठी सरकारने आणले. याविरुद्ध लढा देणा-यांना विकासविरोधी, अर्बन नक्षल ठरवले जात आहेत. जल-जंगल-जमीन बचावासाठी देशभर जनआंदोलने करणारे आंदोलक हे संसाधन रक्षणाचे खरे अहिंसक सत्याग्रही आहेत. मात्र राज्यकर्ते हे जनतेचा विचार करणारे राहिले नाहीत, ते कमीशनखोरी करुन केवळ निवडणूकींचा विचार करतात. त्याचे परिणाम सर्वसामान्य जनता भोगत आहेत, असे घणाघाती प्रतिपादन नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या, प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केले. समाजसेवक डॉ.गिरीधरभाऊ काळे सामाजिक प्रतिष्ठान व सेवार्थ ग्रुप बिबी आयोजित दिव्यग्राम २०२३ महोत्सवात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते, माजी आमदार ॲड.वामनराव चटप, स्वागताध्यक्ष ॲड.स्नेहल संतोष उपरे, प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ.अनिल मुसळे, समाजसेवक डॉ.गिरीधर काळे, सामाजिक कार्यकर्ते ॲड.लालसू नोगोटी, नर्मदानगरचे सरपंच पुण्या वसावे, राहूल आसूटकर, अनंता रासेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजसेवक डॉ.गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठान व सेवार्थ गृपतर्फे यंदाचा राज्यातील सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना दिला जाणारा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर व आश्वासक युवा सामाजिक कार्यकर्त्यांना प्रदान करण्यात येणारा नामांकित सेवार्थ पुरस्कार देशात सामाजिक कार्य व पिढीतांच्या सक्षमीकरणासाठी २५० कोटींहून अधिक रक्कम समाजाला थेट मदत करणा-या ‘डोनेटकार्ट’ कंपणीचे संस्थापक, फोर्ब्स यादीतील प्रभावशील तरुण ठरलेला चंद्रपूर येथील सारंग कालीदास बोबडे यांना सन्मानाने प्रदान करण्यात आला. दहा हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, ग्रामगिता असे पुरस्काराचे स्वरुप होते.
मागील १२ वर्षांपासून बिबी येथे दिवाळी ही फटाकेमुक्त, ग्रामस्वच्छता व प्रबोधनात्मक दिव्यग्राम महोत्सवाने साजरी करण्यात येते. यावेळी ब्रिटीश सरकारचा चेव्हनिंग गोल्ड व्हालंटरिंग पुरस्कार प्राप्त ॲड.दीपक यादवराव चटप व महाराष्ट्र पोलीस सेवेत निवड झालेले विशाल नारायण उपरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष ॲड.स्नेहल संतोष उपरे यांनी केले. संचालन अविनाश पोईनकर, तर आभार सचिन आस्वले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विठ्ठल अहिरकर, संदिप पिंगे, गणपत तुम्हाणे, संतोष बावणे, अनिल हिंगाणे, इराणा तुम्हाणे, सुरज मडावी, प्रमोद विरूटकर, राकेश बोबडे, सुरेंद्र मुसळे यासह युवक मित्रमंडळींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला जिल्हा व परिसरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
••
कृतीशील युवकांच्या पाठीशी उभे रहावे – ॲड.वामनराव चटप
मेधाताईंचे कार्य सर्वश्रूत आहे. सारंग बोबडे या २६ वर्षीय तरुणाने पिढीतांच्या मदतीसाठी उभे केलेले काम प्रेरणादायी आहे. रम-रमा-रमी या तीन व्यसनांपासून दूर राहता आले तर आपल्याला प्रगतीपासून कुणीही रोखू शकत नाही. या तत्वाने ॲड.दीपक चटपची वाटचाल आश्वासक आहे. चार दशकांपासून डॉ.गिरीधर काळे यांनी यांनी लाखो अस्थिरुग्नांवर मोफत उपचार करुन बरे केले. ही कर्मयोगी माणसे समाजाचे भूषण आहे. बिबी येथील सेवार्थ गृपच्या युवकांनी १२ वर्षांपासून प्रबोधनाचा हा वसा घेतला. अशा कृतीशील युवकांच्या पाठीशी समाजाने भक्कम उभे रहावे, असे मत शेतकरी नेते व माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांनी केले.
चंद्रपूर – गडचिरोलीतील प्रश्नांवर वेधले लक्ष
मेधा पाटकर यांनी गडचिरोलीतील सुरजागड लोह प्रकल्पाविरोधात २५० दिवसांपासून सुरू असलेल्या आदिवासी आंदोलनाकडे लक्ष वेधून सरकार कंपण्यांची बाजू घेवून आदिवासींना विस्थापीत करण्याचे षडयंत्र करत आहे. अल्ट्राटेक कंपणीविरोधात सरपंच संघटना कामगारांच्या हितासाठी आंदोलन करत असूनही कंपणीचे दुर्लक्ष करत आहे. एकेकाळी जंगलांनी व्यापलेला चंद्रपूर जिल्हा आता ३० हून अधिक कोळसा खाणी, ५ सिमेंट कारखाने आणि ७ औष्णिक विद्युत युनिटचे केंद्र झाले आहे. यातून आर्थिक संपन्नता व पायाभूत विकास होत असला तरी गावं ओसाड होताना दिसतात. स्थानिकांना नोकऱ्या नाही. शेती क्षेत्र लयाला गेले आहे. प्रदूषण, तापमानवाढ व आरोग्याचे महाभयंकर प्रश्न आवासून उभे आहेत. या परिस्थितीत सजग नागरिकांनी एकत्रित येत लोकशाही मार्गाने प्रश्न विचारले पाहीजे. आपल्या हक्कांसाठी आपण लढा दिला पाहीजे, असे मत ही मेधा पाटकर यांनी यावेळी व्यक्त केले.