by : Shankar Tadas
कोरपना – अल्ट्राटेकच्या आर्थिक उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्याप्रमाणात कंपनी विकास कामावर खर्च करत नसल्याचे दिसून येते. सामाजिक ऋण निधी म्हणून कंपनीला उत्पन्नावरील दोन टक्के रक्कम दत्तक गावांच्या विकास कामांवर खर्च करावे लागतात. मात्र कंपनी मनमानीने वागत असून त्यामुळे दत्तक गावातील विकास कामांवर विपरीत परिणाम झाला आहे.
या मनमानीच्या विरोधात व विविध लोकोपयोगी मागण्या घेऊन आज (दि. १३) पासून अल्ट्राटेक सिमेंट कंपनी विरोधात दत्तक गावातील सरपंच संघटनेचे धरणे आंदोलन व बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
प्रदूषण विषयक समस्येमुळे परिसरातील नागरिकांना विविध रोगाची लागण झाली आहे. कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी, आवारपूर अंतर्गत येत असलेल्या नांदा, बिबी, आवारपूर, हिरापूर, सांगोडा, नोकारी, पालगाव, तळोधी, बाखर्डी व भोयेगाव अशा १० दत्तक गावातील ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी कंपनी विरोधात धरणे आंदोलन व बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. कंपनीच्या सामाजिक ऋण (सीएसआर) निधीमधून ग्रामपंचायतींना पाहिजे त्याप्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येत नसल्याचा फटका ग्रामविकासाला बसत आहे. सोबतच ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात न घेता निधी परस्पर खर्च केला जात असल्याचा आरोप सरपंच संघटनेचा आहे.
कंत्राटी कामगारांचया बोनसमध्ये वाढ करावी, स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्यावा, कंपनीने माणिकगड येथे होणारी लाईमस्टोनची वाहतूक तात्काळ थांबवावी, आय.टी.आय. झालेल्या स्थानिक विद्यार्थ्यांची अप्रेंटिस भरती करावी. टाकाऊ खनिज वापरून गाव शिवारातील पाणंद रस्त्याची दुरुस्ती कंपनीमार्फत करण्यात यावी. इतर राज्यातील शिक्षित युवकांना आणून कारखान्याच्या माध्यमातून प्रशिक्षित केल्या जाते. मात्र दत्तक घेतलेल्या गावांमध्ये अनेक युवक सुशिक्षित आहे. अशा प्रशिक्षण झालेल्या युवकांना कुवतीनुसार कामावर घेण्यात यावे. वाढते प्रदूषण बंद करावे. दिवसेंदिवस कारखान्याच्या माध्यमातून वाढत्या प्रदूषणामुळे आजूबाजूच्या दत्तक गावामध्ये राहणाऱ्या अनेक नागरिकांना कॅन्सर, अपेंडिक्स, हर्निया, त्वचेचे रोग असे विविध आजार होत आहे. यामुळे अनेकांना जीव सुद्धा गमवावे लागले.
ही समस्या त्वरित निकाली काढावी सीएसआर फंडच्या नावाखाली कंपनी इतर जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठानांना व अधिकारी लोकांना यातील फंडाचा हिस्सा वाटप करीत असल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे.
प्रभावित क्षेत्रांना खनिज विकास निधी मिळावा
कोरपना तालुका औद्योगिक क्षेत्र असून या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात खनिजाचे उत्खनन होते. मात्र खनिज विकास निधी येथील ग्रामपंचायतींना मिळत नसल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे. गेल्या पंचवीस-तीस वर्षात काही गावात खनिज विकास निधी शून्य असून या विरोधात सरपंचांनी रोष व्यक्त केला. तसेच जल, वायू, ध्वनी प्रदूषण औद्योगिक क्षेत्रातील नागरिकांनी सहन करायचे आणि निधी मात्र बाहेर क्षेत्रात वळवला जातो. जिल्हाधिकाऱ्याच्या या धोरणाचा सुद्धा सरपंचांनी निषेध केला.
या आंदोलनाला अखिल भारतीय सरपंच परिषदेचा पाठिंबा असून जिल्ह्यातील ९०० ग्रामपंचायतींमध्ये सरपंच गावकऱ्यांसह अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचा निषेध करणार आहे.
– नंदू वाढई, महासचिव, अखिल भारतीय सरपंच परिषद, विदर्भ प्रांत