चंद्रपूरचा दीपक ठरला ब्रिटीश सरकारचा ‘गोल्ड मॅन’

by : Avinash Poinkar

चंद्रपूर :

युनायटेड किंग्डम येथे जगभरातून उच्च शिक्षणासाठी जाणा-या तरुणांना शिक्षणासह ज्यांच्या कामाचा सामाजिक प्रभाव तेथील सरकारवर पडतो, त्यांना ब्रिटीश सरकारच्या फॉरेन काॅमनवेल्थ डेवलपमेंट विभागाकडून गौरवण्यात येते. यंदा जगभरातील १६८ देशातील १६०० स्काॅलर्समधून चंद्रपूरचा दीपक ब्रिटिश सरकारचा ‘गोल्ड’मॅन ठरला आहे. जिल्ह्यातील गडचांदूर येथील लंडन येथे कायद्याचे उच्चशिक्षण घेणाऱ्या ॲड.दीपक यादवराव चटप या केवळ २६ वर्षीय भारतीय तरुण वकिलाला आंतरराष्ट्रीय संस्थांतील सामाजिक योगदानासाठी चेव्हनिंग गोल्ड व्हालंटरिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लंडनमधील आंतरराष्ट्रीय संस्थांतील प्रभावशाली शैक्षणिक स्वयंसेवा योगदानाची जागतिक स्तरावर दखल झाल्याने देशाच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला आहे.

ॲड.दीपक चटप यांनी लंडनमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमादरम्यान सामाजिक न्याय, शांतता आणि मानवी हक्कांसाठी समर्पित आंतरराष्ट्रीय संस्थांसाठी स्वेच्छेने सुमारे १६२ तास काम केले. ब्रिटन सरकारच्या फॉरेन कॉमनवेल्थ डेव्हलपमेंट विभागातर्फे वर्षभर स्वयंसेवेसाठी असाधारण बांधिलकी दाखविणाऱ्या जगभरातील स्कॉलर्सतून हा पुरस्कार दिला जातो. नुकताच त्यांना हा सन्मान लंडन येथे प्रदान करण्यात आला. ॲड.दीपक चटप यांना गेल्या वर्षी ब्रिटीश सरकारने प्रतिष्ठेची ‘चेवनिंग’ शिष्यवृत्ती दिली होती, ज्यामुळे त्यांना लंडनमधील सोएस या जागतिक नामांकित विद्यापीठात कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. या संधीचे सोने करत दीपकने जगभरातील स्काॅलर्सतून आपली छाप सोडली.

आदिवासीबहुल चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील ॲड.दीपक चटप यांनी चंद्रपूर-गडचिरोलीसह राज्यातील सामाजिक प्रश्नांवर केलेले कायदेविषयक रचनात्मक काम समाजाला प्रेरणादायी ठरले आहे. संविधानिक मुल्ये, विधायक धोरणे, ग्रामीण युवकांची शैक्षणिक क्षमता बांधणी, हक्क व अधिकाराविषयी कृती युक्त भुमीका दिशादर्शक ठरली आहे. लंडन येथे उच्चशिक्षणानंतर देश-विदेशात मोठ्या पगाराच्या संधी असूनही शिक्षणाचा उपयोग समाजहितासाठी व्हावा, या हेतूने चंद्रपूर जिल्ह्यात परत येवून रचनात्मक काम उभे करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

•••

• ॲड.दीपक चटप यांची लंडनवर छाप

वर्षभरात युनायटेड किंग्डम येथील ग्लासगो, बर्मीगम, कार्डीफ आदी ठिकाणी झालेल्या जागतिक परिषदेतील ॲड.दीपक चटप यांचा सहभाग महत्वपूर्ण ठरला. विशेषतः लंडन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी झालेल्या जागतिक परिषदेत विशेष वक्ता म्हणून ॲड.दीपकने भूमीका मांडली. जगभरातील स्काॅलर्सचे नेतृत्व करत लंडनच्या संसदेत लोकप्रतिनिधी-स्काॅलर्स संवाद घडवून आणला. लंडनमध्ये भारतीय लोकशाही व आजची आव्हाने यावर परिसंवाद घडवून आणत जगभरातील स्काॅलर्सचे भारताविषयी लक्ष वेधले. अमेरिकेतील अनुदान, जागतिक व्यापार संघटनेची धोरणे व भारतातील कायद्यांचा कापूस उत्पादक शेतक-यांवर होणारा परिणाम या विषयावर दीपकने संशोधन केले असून लवकरच ते प्रसिद्ध होणार आहे.

•••

• कोण आहेत ॲड.दीपक चटप ?

ॲड.दीपक हेमलता यादवराव चटप. चंद्रपूरातील गडचांदूर या सिंमेट कारखाण्याच्या पट्ट्यातील हा २६ वर्षांचा अभ्यासू तरुण. पुण्यातील आयएलएस विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेतलेला. शेतकरी नेते ॲड.वामनराव चटप व मानवाधिकार कार्यकर्ते ॲड.असीम सरोदे यांच्या मुशीत घडलेला कार्यकर्ता वकील. लंडनच्या जागतिक क्रमवारीत प्रथम असलेल्या ‘सोएस’ विद्यापीठात कायद्याचे उच्चशिक्षण त्याने नुकतेच पुर्ण केले. त्यासाठी ब्रिटीश सरकारची नामांकित ४५ लाख रुपयांची ‘चेव्हनिंग शिष्यवृती’ मिळवली.

समाजात विधायक कार्यात सातत्यपूर्ण योगदानातून बदल घडवू पाहणारी जी मोजकी तरुणाई आहे, त्यात दीपकचे नाव सार्वजनिक क्षेत्रात ठळक दिसते. शेतकरी कुटुंबातला दीपक बालवयापासून शेतकरी हितासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन आंदोलन करणारा. ‘मुर्ती लहान पण किर्ती महान’ याचा बुद्धीमत्तेने परिचय देणारा. राज्यातील नामांकित वकृत्व, वादविवाद स्पर्धा जिंकणारा. वयाच्या १८ व्या वर्षी ‘लढण्याची वेळ आलीय’ हा कवितासंग्रह, ‘पाणी विषयक कायदे’ या पुस्तकाचे सहसंपादन आणि नुकतेच ‘कृषी कायदे : चिकित्सा व न्यायाधिकरणाची गरज’ हे त्याचे प्रकाशित पुस्तके चर्चेत राहिले. पुर्व विदर्भातील राजूरा, कोरपना, जिवती या आदिवासीबहुल भागात अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानचा तो संस्थात्मक कार्यकर्ता. याद्वारे तीन राज्यस्तरीय अभंग साहित्य संमेलने झाली, त्यात त्याचा पुढाकार महत्त्वाचा ठरला. दीपकच्या कार्यशैलीने अनेक युवक लिहीते, बोलते झाले, हा त्याच्यातील प्रेरणेचा झरा कायम वाहता आहे.

दीपकची वकीली समाजाभिमुख. फार पैसा जमवण्याच्या काळात तो कमावलेल्यातून दायीत्व जपतो‌. कोरोना काळात चंद्रपूरातील ४५० कंत्राटी आरोग्य कामगारांना सात महिन्याचे वेतन मिळाले नाही. त्यांनी डेरा आंदोलन केले. दीपकने केवळ १ रुपया फिस घेत मानवाधिकार आयोगात त्यांचा न्यायालयीन लढा लढला. कामगारांना वेतन मिळवून दिले. मुंबईतील अरबी समुद्र प्रदुषणाबाबत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल केली. तत्काळ सरकार व हाजी अली दर्गाह ट्रष्टने जलप्रदुषणावर उपाययोजना केली. धर्मा पाटील या अन्यारग्रस्त शेतक-याने मंत्रालयात आत्महत्या केली. या प्रकरणावर लढा देवून शेतक-यांना मोबदला मिळवून देत संबंधितांवर कारवाई करण्यास भाग पाडले. देशातील शेतक-यांचे प्रश्न सोडवण्याकरिता विशेष न्यायाधिकरण अस्तित्वात यावे म्हणून कृषी न्यायाधिकरण कायद्याचा मसूदा २०१८ साली सहकाऱ्यांसह तयार केला. लोकसभेत तत्कालीन खासदार राजीव सातव यांच्यामार्फत अशासकीय विधेयक मांडले. २०१७ साली महाराष्ट्राच्या विधानसभेत हिवाळी, पावसाळी व अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधीमंडळ सहाय्यक म्हणून दीपकने काम केले. विद्यमान जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमाने राज्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडली. दरम्यान देशातील नामांकित कोरो इंडियाची समता फेलोशिप दीपकला मिळाली. यातून संविधानिक मुल्यांचा जागर केला. न्यायमुर्ती गिरटकर यांचेसोबत मुंबई उच्च न्यायालयातही काम केले.

शिक्षणाचा उपयोग सामाजिक बदलांसाठी व्हावा या हेतूने बोधी रामटेके, वैष्णव इंगोले या समविचारी मित्रांना घेवून दीपकने २०१९ साली पाथ फाउंडेशनची स्थापना केली. मागील वर्षी संविधान नैतिकता अभ्यासक्रम सुरु करुन राज्यातील ६५९ युवकांना संविधानाचे धडे दिले. कोरपना तालुक्यातील ६० कुषोषित बालकांसाठी ‘जाणीव माणुसकीची’ अभियान राबवून पोषण आहार किट व मोफत आरोग्य तपासणीची उपलब्धता करून दिली. शेकडो कोलाम कुटुंबियांना कोरोना काळात अन्नधान्य पुरवले. अतिदुर्गम भामरागड तालुक्यात पुरग्रस्तांना लोकसहभागातून लाखोंचा जीवनावश्यक साहित्य पुरवठा केला. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिम कोलाम व माडिया समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर, पीडितांच्या बाजूने नि:शुल्क राज्य मानवाधिकार आयोगात प्रकरणे दाखल करुन न्यायासाठी तो लढतो आहे.

समाजसेवक डॉ.गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी रक्तदान शिबीर, गुणवंत विद्यार्थी सत्कार, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन, राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात दीपकची भूमीका समाजशील आहे. कवी,लेखक, वक्ता, सामाजिक प्रश्नांचा अभ्यासक, अन्यायाविरुद्ध लढणारा वकिल, कार्यकर्ता म्हणून दीपक लोकपरिचित असला तरी त्याची दुसरी बाजू शेतकरी हितासाठी राजकिय नेतृत्वाची आहे. अशा सामाजिक जाणीवांची स्पंदने प्रत्यक्ष विधिमंडळ सभागृहात गेली तर लोकशाहीच्या अंधारात आशेचा दीपक प्रज्वलीत होईल. उच्च न्यायालय किंवा उच्च पदस्थ नेत्यांसोबत काम करण्याची संधी असतांना जिथे गरज आहे, तिथे काम करण्याची तयारी ठेवून कर्तृत्वाने उपेक्षीतांसाठी रचनात्मक काम उभे करण्याचा ध्यास बाळगणारा ॲड.दीपक चटप आजच्या तरुणाईचा आयडाॅल आहे.

•••

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *