by : Shankar Tadas
कोरपना : १७ जून २०१५ ला नगर पंचायत कोरपनाची स्थापना झाली. नगर पंचायत कोरपना क्षेत्रातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व अंगणवाड्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असून शाळेची अवस्था अत्यंत दैयनिय आहे. त्यामुळे सदरील शाळांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने व मुलांचे शैक्षणिक भविष्य सुधारण्यासाठी सदर जि.प. शाळा व अंगणवाड्या नगरपंचायतीकडे हस्तांतरीत करण्यासाठी नगराध्यक्षा नंदा बावने यांनी नगरपंचायतीकडून ठराव पारित करून घेतला.
नगर पंचायत अंतर्गत शाळा सुरू झाल्यास झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेला भौतिक व शैक्षणिक सुधारणा करणे शक्य होईल. त्यामुळे चांगले शिक्षण मिळून गरीब मुलांचे शैक्षणिक भविष्य सुधारण्यास मदत होईल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन नगराध्यक्षांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात येणार असून जिल्हा परिषद यावर काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठरावाच्या बाजूने
नगर पंचायतचे उपाध्यक्ष इस्माईल शेख, आरोग्य व शिक्षण सभापती निसार एजाज शेख, महिला व बालकल्याण सभापती देविका रामदास पंधरे, म.बा.क. उपसभापती ज्योत्स्ना कवडु खोबरकर, नगरसेवक नितीन विजयराव बावणे, नगरसेविका मनिषा प्रशांत लोडे, आरीफा रमजान शेख, राधीका कवडु मडावी, लक्ष्मन पंधरे, मोहमद शेख इत्यादी नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले.
ठरावाच्या विरोधात
विरोधी बाकावर बसलेल्या नगरसेविका गिता अशोक डोहे, वर्षा राजु लेडांगे, आशा झाडे, सविता तुमराम, सुभाष हरबडे, स्वीकृत नगरसेवक किशोर बावने यांनी सदर विषयाचा विरोध केला.
शाळेची इमारत धोकादायक व जीर्ण झाली असल्याने नैसर्गिक आपत्तीमुळे शाळा बाधित झाल्या आहे. अपुऱ्या भौतिक सुविधा, विद्यार्थीसंख्येत दिवसेंदिवस घट होत असल्याने शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून येणाऱ्या दिवसांत जर नगरपंचायतीला शाळा हस्तांतर झाल्यास शाळेचा कायापालट होईल.
– नितीन विजयराव बावणे, नगरसेवक