लोकदर्शन 👉 प्रा. गजानन राऊत
केंद्र शासनाच्या ‘उन्नत भारत’ अभियाना अंतर्गत “विद्यापीठ आपल्या गावात” या उपक्रमा अंतर्गत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली द्वारे सुरू करण्यात येत असलेल्या केंद्राच्या उदघाटनिय प्रसंगी सन्माननीय कुलगुरूंनी मार्गदर्शन केलेत. विद्यापीठाने उच्च शिक्षण घेण्यापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी ‘विद्यापीठ आपल्या गावात ‘ हा उपक्रम राबवित आहे. या अंतर्गत उच्च शिक्षणापासून वंचित राहिलेल्या, शिक्षणात खंड पडलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. यासाठी मॉडेल डिग्री कॉलेज ची स्थापना गडचिरोली येथे करण्यात आली आहे. या मॉडेल डिग्री कॉलेज चे अभ्यास केंद्र अती दुर्गम, डोंगराळ, व आदिवासी बहुल जिवती तालुक्यातील नगराळा येथे सुरू करण्यात आले आहे. यासाठी विदर्भ महाविद्यालय जिवती, गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली आणि ग्रामपंचायत खडकी रायपूर (नगराळा) असा त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे.
मॉडेल डिग्री कॉलेज गडचिरोली च्या अभ्यास केंद्राचे उदघाटन आज दिनांक १९ आक्टो. २०२३ रोजी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय डॉ. प्रशांत बोकरे सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विदर्भ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्य यांनी या परिसरातील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक समस्यावर प्रकाश टाकला. मॉडेल डिग्री कॉलेज चे प्राचार्य डॉ. शशिकांत आस्वले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर इतिहास विभागातील प्रमुख प्रा डॉ. नरेश मडावी यांनी अभ्यासक्रमाचे स्वरूप समजावले. विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ. संजय गोरे यांनी ही पदवी घेण्याबरोबरच रोजगाराच्या नविन संधी कशा मिळतील या विषयी मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. कुलगुरु महोदयांनी विद्यापीठ क्षेत्रात अशी किमान १०० अभ्याकेंद्र सुरू करण्याचा संकल्प केला.
पाश्चिमात्यांचे अनुकरण करण्यापेक्षा आपल्या अस्सल भारतीय संस्कृतीचे जतन युवकांनी करावे असा मोलाचा सल्ला दिला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन पदव्युत्तर विभागाचे प्रा. डॉ. मने सर, मुख्याध्यापक श्री. चुक्कलवार , गावच्या सरपंच सौ. कोटनाके ताई तसेच मॉडेल डिग्री कॉलेज मध्ये प्रवेशित विद्यार्थी, विदर्भ महाविद्यालय चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, अंब्रू नाईक माध्यमिक आश्रम शाळेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा.संजय देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. गजानन राऊत यांनी मानले.