- by : Shankar Tadas
कोरपना : ग्राम विकासाची धुरा सरपंचाच्या खांद्यावर असते. गावातील नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन बालगोपालांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाची काळजी सरपंचाने घेणे आवश्यक आहे. कारण सरपंच हा गावाचा श्वास आहे असे प्रतिपादन पाटोदा येथील आदर्श सरपंच भास्कर पेरे यांनी केले.
जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी, अल्ट्राटेक कम्युनिटी वेल्फेअर फाउंडेशन आवारपूर व कॅलिबर फाउंडेशन गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने बिबी येथे आयोजित ग्रामसंवाद या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक बावणे यांच्या हस्ते पार पडले तर अध्यक्षस्थानी सरपंच माधुरी टेकाम उपस्थित होत्या. स्वागताध्यक्षपदी उपसरपंच आशिष देरकर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामविकास अधिकारी धनंजय डुकरे, मुख्याध्यापक अनंत रासेकर उपस्थित होते. यावेळी राज्याचा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथील प्राचार्या स्मिता अनिल चिताडे, राष्ट्रीय सेवा योजनेचा गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रा. डॉ. शरद बेलोरकर, सामाजिक कार्यकर्ता छोटुलाल सोमलकर, पत्रकार तथा पोलिस पाटील राहुल आसुटकर, सामाजिक कार्यकर्ता धनंजय छाजेड, राष्ट्रसंत सेवा पुरस्कार साईनाथ ठाकरे आदींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील १६ सरपंच व गावातील दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा भास्कर पेरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी छोटुलाल सोमलकर यांच्या माध्यमातून तंबोला खेळाचे आयोजन पार पडले. गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव बापुजी पिंपळकर यांच्या माध्यमातून सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे संचालन शामकांत पिंपळकर यांनी केले. प्रास्ताविक उपसरपंच आशिष देरकर यांनी केले तर आभार विठ्ठल टोंगे यांनी मानले यशस्वीतेकरिता गावातील सर्व नागरिकांनी सहकार्य केले.