by : Shankar Tadas
गडचांदूर : ग्रामीण युवकांमध्ये अभिनय व कला क्षेत्रात काम करण्याची इच्छा खूप प्रमाणात वाढू लागली आहे. पण नेमकं या क्षेत्रात दाखल कसे होतात, येथे काम करायची संधी कशी शोधायची, मानधन किती असतात, या क्षेत्रातील शिक्षण कुठे मिळतात याबाबत योग्य मार्गदर्शन मिळत नाही. अपूर्ण मार्गदर्शनामुळे कित्येक ग्रामीण युवा कलाकारांची दिशाभूल होते. युवा कलाकारांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि त्यांचे कला क्षेत्रात भविष्य घडावे या हेतूने महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर, व्यंकटेश चिटफंड प्रा. लि. गडचांदूर व कॅलीबर फाऊंडेशन गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच दोन दिवसीय फिल्म व थिएटर कार्यशाळा पार पडली.
युवा दिग्दर्शक तसेच लेखक व कवी अनिकेत परसावार यांच्या उपस्थितीत कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्या स्मिता चिताडे, व्यंकटेश बलसनीवार व प्रा. आशिष देरकर यांनी केले.
या कार्यशाळेमध्ये दिग्दर्शक अनिकेत परसावार यांनी चित्रपट व नाटक लिखाण, कॅरेक्टर ऑब्झर्वेशन, ऑडिशन कसे द्यायचे, अभिनय कसा करायचा, अभिनयाचे ९ रस, गोंड संस्कृती, न्यू इंडियन सिनेमा, नाट्य शास्त्र ही सर्व माहिती त्यांनी दिली. या कार्यशाळेमध्ये एकुण १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दिग्दर्शक अनिकेत परसावार सध्या त्यांच्या आगमनी चित्रपट डफ वर काम करीत आहे. चित्रपटाची कथा विदर्भीय लोकांच्या जीवनावर आधारित आहे. सोबतच याच वर्षी त्यांनी लिहलेला ‘ख़्वाबों के कमरे में’ हा हिन्दी-उर्दू भाषेचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे.