लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे )
उरण दि. 2 ऑक्टोंबर भारत देशाची राष्ट्रीय एकता व अखंडता टिकून राहावी,भारतीय संविधानाचे रक्षण व्हावे या दृष्टी कोणातून महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून भारताचा कम्यूनिस्ट पक्ष (मार्क्सवादी ) व पुरोगामी धर्मनिरपेक्ष जन संघटनेच्या वतीने 02 ऑक्टोबर 2023 रोजी उरण शहरातील बाजारपेठेमधील गांधी चौकात उपोषण करण्यात आले.यावेळी कॉम्रेड भूषण पाटील, रामचंद्र म्हात्रे, संजय ठाकूर, हेमलता पाटील,संतोष पवार, दिलीप पाटील, संचित घरत यांच्यासह अखिल भारतीय किसान सभा,सी आय.टी. यू, जनवादी महिला संघटना,डि. वाय. एफ आय संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज आपल्या देशात महागाई, भ्रष्टाचार हा अगदी शिगेला पोहोचला आहे. सर्व सार्वजनिक व सरकारी आस्थापनाचे खाजगीकरणाच्या नावाखाली देशाची संपत्ती कवडीमोल किंमतीने आपल्या दोस्त भांडवलदारांना विकली जात आहे. शिक्षण व आरोग्याचे खाजगीकरण केले जात आहे. त्यामुळे ते प्रचंड महाग झाले आहे. सरकारी नोकऱ्या ठेकेदारांमार्फत दिल्या जात आहेत. बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. या सर्व परिणामांमुळे जनता मेटाकुटीला आलेली आहे.त्यांनी या प्रश्नांवर आवाज उठवू नये यासाठी जनतेमध्ये धर्माच्या, जातीच्या, भाषेच्या नावावर भेद निर्माण करून देशाच्या एकात्मतेला सुरुंग लावला जात आहे. जम्मू कश्मीर राज्य देशाच्या नकाशावरुन गायब केले आहे. मणिपूर मध्ये महिलांच्या नग्नधिंडी काढल्या जात आहेत. माणसाला माणसापासून दूर केले जात आहे. या सर्व परिस्थितीत देशाचे संविधान बदलण्याचे षडयंत्र आखले जात आहे. तेव्हां या देशाचे सार्वभौम व धर्मनिरपेक्ष लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण सर्व देशप्रेमींनी एक होवू या असे आवाहन यावेळी कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील यांनी आपल्या भाषणातून केले.