*लोकदर्शन 👉*डॉ राजेश सोनुने(नागपूर जिल्हा प्रतिनिधी)* *9767355533*
नागपूर :: दिनांक:: 1ऑक्टोबर 2023
देशात कायदा व सुव्यवस्था चांगली रहावी, शांतता असावी व त्यातून जनसामान्यांना स्वतःचा व राष्ट्राचा विकास करता यावा ह्या उद्देशाने शासनाने पोलीसदलाची निर्मिती केली आहे. परंतु प्रत्येक समाजात अनेक कारणांमुळे गुन्हे करणारे, समाजामधे धर्म, जात, प्रांत, भाषा, लिंग अशा अनेक कारणांनी असंतोष निर्माण करणारे, दंगली घडवू आणणारे व त्यातून आपला राजकीय स्वार्थ पूर्ण करणारे अनेकजण असतात. अशा ह्या समाजविघातक, राष्ट्रद्रोही व्यक्तींचा समाजातील सामान्य नागरिक फारसा विरोध करू शकत नाहीत. त्यांना संघटितपणे, कायद्याच्या आधारे, त्यांनी सभ्यपणाचा घातलेला बुरखा दूर करून न्यायालयापुढे सादर करणारे व त्यांना नयायालयामार्फत शिक्षा करणारे पोलीस दल आवश्याक आहे व ते पोलिसांचे आद्य कर्तव्य आहे. परंतु पोलीसांच्या कामामधे ढवळाढवळ करणे, गुन्हेगारांना, समाजविरोधकांना पकडू न देणे, पकडले असल्यास त्यांना सोडायला लावणे, गुन्हेगारांना कायद्यातील पळवाटा शोधून शिक्षा होऊ न देणे ह्यासाठी समाजाील अनेक घटक हे हिरिरीने प्रयत्न करताना दिसतात. पोलीसांचे मनोधर्य खच्ची करणे, त्यांनी केलेल्या कर्तव्याबद्दल त्यांना निलंबित करणे, त्यांना पदोन्नती मिळू न देणे ह्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. स्वतःची मनमानी चालू ठेवता यावी हयासाठी स्वतःच्या हातचे बाहुले होऊन वागणार्या पोलीस अधिकार्यांना आपल्या जवळच्या पोलिस ठाण्याच्या प्रमुखपदी नेमणूक करण्यासाठी स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणणार्या अनेक व्यक्ती काम करत असतात. आपण केलेल्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष व्हावे व आपल्याराजकीय विरोधकांना कायद्याच्या माध्यमातून त्रास देता यावा ह्यासाठी ह्या पोलीस अधिकार्यांचा वापर केला जातो. आपल्या मनाविरुद्ध व कायद्याप्रमाणे वागणार्या अधिकार्यांना वेळोवेळी बदलून त्यांना अकार्यकारी व कमी महत्त्वाच्या पदांवर तडकाफडकी बदलले जाते. पोलीसांचा पाणउतारा करण्यासाठी बदली व निलंबन ही दोन शस्त्रे प्रामुख्याने पाजळली जातात.
ह्याशिवाय समाजातील गुन्हेगार व्यक्ती वाहतुकीचे नियम पाळायला सांगणार्या पोलिसांवर हल्ले करतात. गुन्हेगाराला पकडायला गेलेल्या पोलीस चमूवर जीवघेणा हल्ला करून त्यांना पळवून लावले जाते वा ठार मारले जाते. अनेक गुन्हेगारांनी बेकायदेशीररीत्या जमवलेल्या पैशातून अनेक सिनेमे काढले आहेत; ज्यात पोलीसांचा पांडु हवालदाार, नेभळट, लाचखोर, लाचार अशाप्रकारे वर्णन केले जाते. ह्या सर्व गोष्टींमुळे पोलीसांचे मानसिक खच्चीकरण व्हावे हा उद्देश असतो.
पोलीसांना आवश्यक अशी सर्वसोयींनी युक्त सरकारी घरे निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करुन न देणे, असलेल्या घरांची डागडुजी न करणे ह्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे सारख्या महानगरातील पोलीसांना व त्यांच्या कुटुंबियांना अत्यंत खराब स्थितीत जगावे लागते. रोज 12 तास काम, सुट्टी मिळण्याची कमी शक्यता ह्यामुळे पोलिस कर्मचार्यांचे आरोग्य धोक्यात येते व ते व्यसनाधीन बनतात. वेळच्यावेळी जेवण न मिळणे, शांत झोप न मिळणे, व्यायाम करायला सोयी नसणे ह्याचा परिणाम होऊन पोलिसांना सतत ताणतणावात दिवस काढायला लागतात.
ह्यावरील उपाय म्हणून पोलीसांच्या कामाच्या वेळा कमी करणे, जिथे काम असेल त्या ठिकाणीच त्यांची राहण्याची, व्यायामाची, झोपायची सोय करणे, त्यांच्या कुटुंबियांसाठी सुरक्षित ठिकाणी आवश्यक त्या सोयींनीयुक्त घरे बांधणे गरजेचे आहे. त्याशिवाय पोलीसांची टिंगल टवाळी करणार्या सिनेमांवर समाजाने जाहीर बहिष्कार घालणे, पोलीसांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी प्रत्येक सक्षम स्त्री-पुरुष यांनी पुढे येऊन पोलीस-मित्र म्हणून काम करणे जरुरीचे आहे. येणार्या गणपती, मोहरम, नवरात्र उत्सव ह्यासाठी पोलिसांनीही पोलीस मित्रांना प्रशिक्षण व प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. लोकांनीही त्यात समजूतदारपणा दाखवणे जरूरीचे आाहे. राजकीय नेतृत्त्वानेही पोलीसांच्या कायदेशीर कामामध्ये ढवळाढवळ न करणे, पोलीसांची बदली अथवा निलंबन दबावाखाली न करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पोलीसांनाच मदत होईल असे नव्हे तर समाजाला व राष्ट्रालाही जगात विकसित देश बनविणे शक्य होईल.