लोकदर्शन पुणे प्रतिनिधी👉 स्नेहा उत्तम मडावी
कवी विचार मंच शेगाव या संस्थेच्या वतीने दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते यावर्षीचे साहित्य संमेलन २५ नोव्हेंबर २०२३ व २६ नोव्हेंबर २०२३ रोजी संत ज्ञानेश्वर महाराज जन्मभूमी श्रीक्षेत्र आपेगाव, जिल्हा संभाजी नगर येथे होणार आहे. या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष संत ज्ञानेश्वर महाराज जन्मसंस्थानचे अध्यक्ष आध्यात्म विवेकी ज्ञानेश्वर दादा कोल्हापूरकर हे भूषविणार आहेत. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन देवगड संस्थानचे सर्वोसर्वा भास्करगिरी महाराज यांच्या शुभहस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून अनेक दिग्गज साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. अशी घोषणा साहित्य संमेलनाचे आयोजक शब्द महर्षी विजय पोहनेरकर, कवी हरिदास कोष्टी, कवी शिवशंकर चिकटे, कवयित्री अलका बोर्डे व लेखक संदीप राक्षे यांनी केली आहे. या साहित्य संमेलनात कवी संमेलन, गझल मुशायरा, स्वरसंध्या, हास्य मैफिल, चर्चासत्र असे विविध कार्यक्रम असणार आहेत तसेच २६ नोव्हेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ७:०० वाजता भजन सम्राट सदानंद मगर यांचा अभंगवाणीचा कार्यक्रम होणार आहे. कवी विचार मंच शेगाव या संस्थेच्या वतीने दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात तसेच सहलीचे आयोजन करण्यात येते. या संस्थेत तीनशे सभासद कार्यरत आहेत. श्रीक्षेत्र आपेगाव येथील साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून कवी कवयित्री सहभागी होणार आहेत.