लोकदर्शन 👉 प्रा.गजानन राऊत
जिवती- स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती म्हणून ख्याती असलेले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते, आणि याच शिक्षक दिनाचे औचित्य साधून विदर्भ महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभाग, समाजशास्त्र विभाग आणि इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात “स्वयंशासन उपक्रम” आयोजित केला गेला.
स्वयंशासन उपक्रम घेण्यामागे विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त लागून शिक्षकांच्या भूमिकेचं आणि विद्यार्थ्यांच्या जीवनातील योगदानाचं महत्त्व यथोचित कळावं, हा उद्देश ठेवून विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवत प्राचार्य, शिक्षक, लिपिक आणि शिपाई अशा भूमिका या दिवसाच्या निमित्ताने अत्यंत शिताफीने पार पाडल्या.
विद्यार्थ्यांचा असा सक्रिय सहभाग असणारा उपक्रम घेण्याची प्रेरणा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्य यांच्याकडून मिळाली. शिक्षकांनी त्यांच्या भूमिकेचे परीक्षण करून त्यांना उज्वल भवितव्याचा पाया घालण्यासाठी प्रेरित केले.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य लाभले.