लोकदर्शन.👉 शिवाजी सेलोकर
मोदी सरकारने हिवाळी अधिवेशनापूर्वीच संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून पाच दिवसांचे हे अधिवेशन असणार आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यासंदर्भातील माहिती ट्विटद्वारे दिली आहे.
हिवाळी अधिवेशनापूर्वीच मोदी सरकारने हे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या अधिवेशनात नेमकं मोदी सरकार काय मोठे निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या पाच दिवसांच्या अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा होणार असून या 10 विधेयकं देखील मांडली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याबरोबरच काही महत्वाच्या विधेयकांना मंजूरीही देण्यात येण्याची शक्यता आहे.
संसदेच्या या पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनात पाच बैठका होणार आहेत. 17 व्या लोकसभेचे 13 वे हे अधिवेशन आणि राज्यसभेचे 261 वे हे अधिवेशन असणार आहे. असे असले तरी या अधिवेशनात नेमकी काय चर्चा होणार, कोणते मोठे निर्णय होणार, हे अधिवेशन कशासाठी बोलावण्यात आले, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.