गडचांदूरमधील ‘त्या’ अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी

by : Shankar Tadas

गडचांदूर : शिवाजी चौक ते ज्योतिबा फुले व्यापार संकुलपर्यंत मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणामुळे सतत वाहतुकीची कोंडी होत असते. सदर अतिक्रमण तात्काळ हटविण्याची मागणी गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धनंजय गोरे यांनी उपविभागीय कार्यकारी अभियंता
बांधकाम विभाग, गडचांदूर व नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शिवाजी चौक ते ज्योतिबा फुले व्यापार संकुलाच्या मधोमध गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर संचालित महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, महात्मा गांधी स्कॉलर्स अकॅडमी, महात्मा गांधी विद्यामंदिर अशा विविध शाळा असून या शाळेची एकूण विद्यार्थी संख्या ४ हजारावर आहे.
या मुख्य रस्त्यावर अतिक्रमण असल्याने विद्यार्थी व पालकांना शाळेमध्ये ये-जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच दर मंगळवारी आठवडी बाजारादरम्यान तर या ठिकाणी पाय ठेवायला सुद्धा जागा नसते. भविष्यात कोणताही अपघात होऊन या ठिकाणी जीवितहानी होऊन विपरीत काहीतरी घडू शकते. असे निवेदनात नमूद आहे.
या रस्त्यावर पक्क्या अतिक्रमणासह त्यापुढे पुन्हा भाजी मार्केट बसते. त्यामुळे ये-जा करण्यासाठी केवळ दहा ते बारा फुटाचा रस्ता शिल्लक असतो. त्यामुळे भाजीपाला मार्केट हटविणे आवश्यक आहे.
यावर उपाययोजना आखून रहदारीकरिता रस्ता पूर्णपणे खुला करून द्यावा व अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी संस्थेचे सचिव धनंजय गोरे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here