लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोरपना – केवळ शिक्षण असून चालणार नाही. शिक्षणाला सामाजिकतेची जोड नसेल तर समाजाची प्रगती होऊ शकत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षणातून सामाजिकता निर्माण व्हावी असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ती यिशिता काळे हिने केले.
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्सच्या वतीने आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात मुख्य वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. यिशिता काळे ह्या माहिती तंत्रज्ञानात अभियांत्रिकीची पदवी घेऊनही दुर्गम भागातल्या आदिवासी मुलांमुलींसाठी शिक्षण प्रसारचे अविरत काम करत आहे. पर्यावरण संरक्षणासाठी जागृती निर्माण करत आहे. आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजाच्या उत्थानासाठी लावणाऱ्या यिशिता काळे हिचा यावेळी महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव उपस्थित होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देशात वाढणाऱ्या बेरोजगारीला सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असावा. सकारात्मक दृष्टिकोनच विद्यार्थ्यांना यशाच्या मार्गाने नेऊ शकतात असे प्रतिपादन प्रमुख वक्ते तथा संस्थेचे संचालक विठ्ठल थिपे यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य शैलेंद्र देव यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्याचा मूलमंत्र समजावून सांगितला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.