” मैत्री वाचकांशी, मैत्री पुस्तकांशी ” हा उपक्रम वाचन संस्कृतीला उभारी देणारा : योगेश रांजनकर

by : Rajendra Mardane

वरोरा :  लोकांची पुस्तके वाचण्याची आवड वाढण्यासाठी त्यांना पुस्तकांशी जोडून देणे अतिशय महत्त्वाचे असल्याने ” मैत्री वाचकांशी, मैत्री पुस्तकांशी ” हा उपक्रम वाचन संस्कृतीला उभारी देणारा ठरेल , असे गौरवोद्गार वरोरा पोलीस स्टेशनमधील परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक तथा प्रभारी अधिकारी योगेश रांजनकर यांनी येथे काढले. येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात वरोऱ्यातील आनंदवन मित्र मंडळ, ओशनिक बहुउद्देशीय संस्था व सृजनशील पत्रकार मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी ( भा.पो.से.) यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ह्या अभिनव उपक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू हे होते.
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी, प्रमुख अतिथी म्हणून प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय आध्यात्मिक केंद्र वरोऱ्याच्या सेवा केंद्र प्रमुख ब्र. कु. सीमा बहेन, आनंदवनाचे कार्यकर्ते दीपक शिव उपस्थित होते.
रांजनकर पुढे म्हणाले की, वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी, हा उद्देश या उपक्रमामागे आहे. ‘ वाचन संस्कृती बळावणारी एक पायवाट ‘ म्हणून आयोजकांच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले .
नोपानी म्हणाले की, सद्यस्थितीत उपलब्ध असणाऱ्या मनोरंजनाच्या विविध माध्यमांमुळे वाचन संस्कृतीस आहोटी लागल्याचे चित्र दिसत असले तरी ते बदलता येते. लोकांमध्ये विशेषतः युवकांमध्ये पुस्तके वाचण्याची आवड निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने ” मैत्री पुस्तकांशी, मैत्री वाचकांशी ” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे,असे त्यांनी नमूद केले. या उपक्रमासाठी स्वतंत्र ग्रुपही तयार करण्यात आला असून आपल्या आवडीच्या पुस्तकांची पुस्तकंप्रेमींमध्ये देवाणघेवाण करणारा हा प्रयोग आहे. प्रत्येक वाचक एक पुस्तकाच्या किंमतीत अनेक पुस्तके वाचू शकतो. त्यामुळे निश्चितच पैशाची बचत होईल. उपक्रमात सहभागी प्रत्येक वाचकाने आपल्याकडील वाचून झालेली पुस्तके सोबत आणावी व या पद्धतीने जमलेल्या पुस्तकांमधून आपल्या पसंतीचे एक पुस्तक घेऊन जावे. वाचल्यानंतर परत करावे. पुस्तकांच्या देवाणघेवाणसह वाचन संस्कृती घट्ट रुजावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी सोबत आणलेल्या ” भारत विभाजन के गुनहगार ” ( ले. राम मनोहर लोहिया ) तथा ” Why I am an Atheist “( ले. भगतसिंग) या दोन पुस्तकांबद्दल विस्तृत माहिती दिली.
ते म्हणाले की, पत्रकार टीम ने एक नवीन उपक्रमाबाबत विचारणा केली असता, सध्या लोप पावत चाललेल्या वाचन संस्कृती वर काही तरी केले पाहिजे, यादृष्टीने पत्रकार बंधू राजेंद्र मर्दाने आणि प्रवीण गंधारे यांना सदर उपक्रमाची माहिती शेअर केली. ‘ शुभस्य शीघ्रम् ‘ म्हणून त्यांनीही या संकल्पनेला मूर्त रुपात साकार करीत अभिनव उपक्रमास चालना दिली हे कौतुकास्पद आहे. शासकीय सेवेत अधिकाऱ्यांच्या बदल्या होतच असतात. त्यामुळे माझ्या बदलीनंतरही हा उपक्रम असाच सुरू राहावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या ग्रुपशी जुळून असल्याने मी कुठेही असलो तरीही उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करणार, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
ब्र. सीमा बहेन म्हणाल्या की, समाजाचा वैचारिक स्तर उंचावयाचा असेल तर वाचन संस्कृती, आध्यात्मिकता जोपासणे गरजेचे आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी सेवा केंद्राचे कार्य, त्यामाध्यमातून चालणारे ध्यानधारणा शिबीर सर्वांसाठी कसे फायदेशीर आहे, हे त्यांनी पटवून दिले.
अध्यक्षीय मार्गदर्शनात सुधाकर कडू म्हणाले की, पुस्तके वाचणे, ही चळवळ झाली पाहिजे. ” मैत्री पुस्तकांशी, मैत्री वाचकांशी ” या उपक्रमाच्या माध्यमातून सदर चळवळीला निश्चितच गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी आनंदवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. पर्यावरणावर चळवळीच्या माध्यमातून कार्य होणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी मांडले.
प्रास्ताविकात दीपक शिव म्हणाले की, माणसांच्या जडणघडणीत पुस्तकांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. पुस्तके ही मानव जीवन आनंदी व अर्थपूर्ण करतात. उपक्रमाचा उद्देश विचारांसोबत पुस्तकाची आदानप्रदान होत राहणे आहे. यावेळी त्यांनी सदर उपक्रमाची माहिती देत आपले अनुभव कथन केले.
कार्यक्रमात आंनदवन प्रयोगवन, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, पंचायत राज, ऋणानुबंध कुष्ठमुक्तांशी, सटरफटर, मी एक आनंदयात्री, वळण, आपण जिंकू शकतो, माझी जीवन कथा, मेरी जीवन कथा ( म.गांधी), प्रेमचंद की चर्चित कहानिया, गांधी विचार और पर्यावरण, विचार संवाद आणि महाअनुवामद, ज्ञानामृत व अमृतकुंभ मासिक अशा विविध प्रकारच्या पुस्तकांचा आदानप्रदान सोहळा पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार, ओशनिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा आनंदवन मित्र मंडळाचे सचिव राजेंद्र मर्दाने यांनी केले.
कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वरोरा अध्यक्ष प्रवीण गंधारे, ज्येष्ठ पत्रकार शाम ठेंगडी, खेमचंद नेरकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे मारोतराव मगरे, संधीनिकेतन अपगांची कर्मशाळेचे अधीक्षक रवींद्र नलगिंटवार, आनंदवन मित्र मंडळाचे पदाधिकारी बळवंतराव शेलवटकर, राहुल देवडे, संजय गांधी, ओकेश्वर टिपले, विवेक बर्वे, आनंदम् मैत्री संघ वरोऱ्याच्या संगीता गोल्हर, भास्कर गोल्हर, सचिन जाधव, प्रशांत गोगटे, संध्या माटे, वनिता ढवस, राम टोंगे, मिलिंद वालनकर, लालचंद तिडके, प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या भगिनी, महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थीनी, शहरातील गणमान्य पुस्तक प्रेमींची लक्षणीय उपस्थिती होती.

.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *