*“नाथपंथी डवरी गोसावी”!* *समाजाची, दिशा, दशा!* *आयु, विलास खरात* —————————————–

लोकदर्शन 👉राहुल खरात

महाराष्ट्र राज्यातील भटक्या जमातीतील भराडी या जातीतील नाथपंथी डवरी गोसावी ही एक उपजमात आहे. सदरचे नाथपंथी डवरी गोसावी हा समाज सांगली, सातारा,सोलापूर,कोल्हापूर या जिल्ह्यात प्रामुख्याने आढळून येतो. पूर्वीच्या काळी गांव खेड्यात सुगीच्या हंगामात भटक्या जातीतील भराडी, गोंधळी, मुरळ्या, वाघे इत्यादी दहा- पाच कुटुंबे गावच्या माळरानावर उतरून पालात राहत असत. त्यांच्या सोबत गाई, बैल, म्हशी,टोणगे, बकऱ्या, कोंबड्या असत. गावातील गरजू लोकांना जनावरे विकत असत. खंडोबा, भैरोबा, ज्योतिबा, नाथबाबा या देवी- देवतांची गाणे व कथा सांगत असत. नाथपंथी डवरी गोसावी हे गांवात भिक्षा मागताना ते डमरू वाजवित असलेमुळे त्यांना डावरे गोसावी असेही म्हणतात. त्यावेळी लोक त्यांना पैसे अगर भाकरीसाठी पीठ देत असत. त्याच बरोबर भरड्यांच्या बायका गांवातील लोकांना वाकळा शिवून देत असत, हाच त्यांचा जीवन चरितार्थ असे.
पूर्वीच्या कालखंडात एकच असलेल्या नाथ संप्रदायाचे गुरु प्रमाणे विभागवार गट पडलेले होते. कालांतराने सदर गटाच्या जाती, जमाती, उपजमाती पडलेल्याचे सांगितले जाते. जंबुदीपाच्या भारत भूमीच्या उत्तर भागातील गोरखपूर व महाराष्ट्रातील ‘मढी’ येथील गोरक्षनाथाला मानणारे हे “नाथ जोगी” होते. तर धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील सोनारी येथील भैरवनाथाची गादी (गुरुला गादी म्हटले जाते) आणि नाथाचा आखाडा मानणारे हे “नाथपंथी डवरी गोसावी” होत. अशा या दोन गटाच्या जमाती महाराष्ट्रात आहेत असे सांगतात.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी या गावात “नाथपंथी डवरी गोसावी” हा समाज आढळून येतो. त्याबाबत असे सांगितले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील रत्नागिरीवाडी जवळ असणारे जोतिबाच्या देवाच्या दर्शनासाठी व यात्रेसाठी सोलापूर जिल्ह्यातून नाथपंथी डवरी गोसावी हे नेहमी जात- येत असत. त्यांचा चालत जाणे- येणेचा मार्ग आटपाडी गांवावरून असलेमुळे त्यांचा मुक्काम आटपाडी येथील धर्म शाळेत होत असत. सदरचे नाथपंथी डवरी गोसावी या समाज्याचे लोक हे महादेव, ज्योतिबा, काळभैरव, दत्तात्रेय, नाथबाबा यांचे भक्त असलेमुळे आटपाडी गांवातील जुन्या जाणत्या कारभारी मंडळीनी औंध संस्थांनच्या राजेना सांगितले होते की, आटपाडी गांवातील देव- देवताच्या पूजेसाठी, लग्न कार्यात जागरण गोंधळा साठी गांवास नाथपंथी डवरी गोसावी समाज्यातील माणसांची गरज आहे. त्यामुळे औंध संस्थाने व गांवच्या प्रमुख मंडळीनी सदर समाजातील काही लोकांना आटपाडी गावात राहणेची विनंती केलेमुळे नाथपंथी डवरी गोसावी समाजातील काही मंडळी राहणेस तयार झाली. त्यामुळे त्यांना गांवात घरासाठी जागा देण्यात आली होती व गांवच्या देवी-देवतांची सेवा पूजा करतात म्हणून संस्थान कडून त्यांना जमीन ही देण्यात आलेली होती. त्यामुळे सदरचा समाज आटपाडी गांवात स्थायिक झालेला आहे. इतर जिल्हातून सुद्धा नाथपंथी डवरी गोसावी हे खरसुंडी, दिघंची, करगणी येथे येऊन राहिलेले आहेत.
पूर्वी आटपाडी येथे आलेल्या नाथपंथी डवरी गोसावी समाज्याचे मूळ गांव हे सोलापूर जिल्ह्यातील साधापूर ‘मद्रुप’ आहे. काहीचे वैराग-बार्शी आहे. सदरचे लोक ज्योतिबा,नाथबाबा व इतर देव-देवतांची पूजा-अर्चा करणे,डवरपत्र,त्रिसूळ यांची पूजा करणे. लग्न कार्यात जागरण गोंधळ घालणे. नाथबाबाचा गुलाल लावणे, पैसे व झोळीत पीठ मागून आणून त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्वीच्या काळी करीत असत.
पूर्वीच्या काळी गांवातील चौकात राजा हरिश्चंद्राची भैरवनाथाची कथा सांगणे, चांगल्या आवाजात सती अनुसूया, श्रावणबाळ यांचेवरचे कवने करून गीत गाणे, काळजाला भिडणारे,मनाचा ठाव घेणारे, मनाला चटका लागणारी गाणी गाऊन लोकांचे मनोरंजन व प्रबोधन करीत असत. सदरचे लोक गाणे म्हणताना सारंगी,डमरू,कोका हे वाद्य वाजवीत असत. त्यामुळे वातावरण भारून जात असे. त्यावेळी सदरच्या लोकांची वेशभूषा भगव्या रंगाचा पोशाख, डोक्याला मोठा रुमाल, अंगात सदरा त्यावर जॅकेट, धोतर घातलेले आणि काखेत झोळी, कपाळावर विभूती, कानात मुद्रा, गळ्यात चांदीच्या शृंगी घालत असत. काही लोक गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, हातात त्रिशूल, पायात खडावा घालतात. चालणे रुबाबदार, भाषा स्वोजळ, बोली भाषा मराठी बोलतात. सदरचे लोक त्या काळी आपसात व इतरांना न समजेल अशा “पारुषी ” भाषेत बोलत असत. सदर लोकांचे कुलदैवत भैरवनाथ “भैरोबा”आहे.
आटपाडी गावातील नाथपंथी डवरी गोसावी समाज्यातील मुलांचे वय सात वर्षापर्यंत झालेवर मुलांस “कानचीरा” ची नाथ दीक्षा देण्याचा विधी करणेत येत असतो. “कानचीरा” चा विधी हा सोहळ्या प्रमाणे करणेत येतो. ज्या मुलांचा कानचीराचा विधी करायच्या वेळी त्यास अंघोळ घालून भगवे वस्त्र परिधान करून त्यास लाकडी पाठावर बसविणेत येते. त्यानंतर गुरु मार्फत धारधार लहान चाकूने त्यांच्या दोन्ही कानात होल पाडून त्यामध्ये सोन्याची अथवा चांदीची गोल रिंग घालणेत येते. वेदना होऊ नये म्हणून,भज्यात गांजा मिसळून खायला देत असत.विधीच्या वेळी श्री गोरख, श्री गोरख असा गुरु मंत्र म्हणत असत. त्यावेळी वाद्य वाजविले जात असत. “कानचीरा” चा विधी झालेवर मुलांच्या काखेत कापडी झोळी बांधून त्यास “आलख निरंजन” असे बोलायास लावून गांवात माघुगिरी मागायला पाठवित असत. त्यावेळी भराड घालून भिक्षा मागून उदरनिर्वाह करणेसाठी गावोगावी भटकंती करणेचे आहे. असे पूर्वीच्या काळी दीक्षा देताना सांगणेत येत असे.
या भटक्या जमातीमध्ये नाथ जोगी भराडी, नाथपंथी डवरी गोसावी, गिरीपुरी भारती इत्यादी जमाती आहेत. हे लोक महादेव,जोतीबा,काळभैरव, दत्तात्रेय, नाथबाबा यांचे भक्त मानले जातात. नाथपंथी डवरी गोसावी या जमातीचा इतर भटक्या जमातीतील लोकांशी रोटी बेटीचा व्यवहार होत नसत. गोत्र पाहून लग्ने जमिवतात, नाथपंथी डवरी गोसावी जमातीत बारा कुळ्या आहेत असे सांगतात. मुलींच्या लग्नकार्यात हुंडा देण्याची पद्धत नाही. मुलीच्या लग्नासाठी पूर्वी मुलांकडून जो खर्च द्यावा लागतो त्यास “दयाज” असे म्हणत असत. लग्न सोहळा हा हिंदू धर्म पद्धतीच्या व समाज्याच्या चाली व प्रथेनुसार करणेत येतो. सदर समाजामध्ये मयत झालेल्या व्यक्तीचे स्मरण म्हणून चांदीची मुखवटे तयार करूनते देव्हाऱ्यात ठेवतात, त्यास “टाक” असे म्हणण्यात येते.
महाराष्ट्रातील नाथपंथी डवरी गोसावी समाज्याची जातपंचायत यात्रेनिमित्त सोनारी व कारुंडे येथे दरवर्षी भरत असते. मोठ्या संख्येने लोक यात्रेत जातात, समाजातील अनेक वाद-विवाद, भांडणे, कलह आपस मध्ये सदर जात पंचायतींमध्ये मिटवणेत येत असतात. सदर जातपंचायतीमध्ये “यव्हार” हा नियम, निर्णय महत्त्वपूर्ण असतो. परंतु काही बाबींचा निर्णय मिटत नसेल तर अंतिम निर्णयाचा फैसला “कारुंडे” या गांवच्या यात्रेवेळीच्या जातपंचायत मध्ये निकाल दिला जातो. तो निकाल अंतिम व शेवटचा असतो, तो सर्वांनाच पळावा लागतो.
पूर्वीच्या काळी भटका फिरस्ता हा समाज जगण्यासाठी व पोटाच्या उदरनिर्वाहासाठी गावोगांवी भटकंती करून जीवन जगावे लागत असत. त्यांचा पिढी जात व्यवसाय भिक्षा मागून उदरनिर्वाह करणेचा असलेमुळे त्यांचा नाईलाजाने गांवच्या ओसाड माळ रानावरती पाले टाकावी लागत असत. सदर गांवात फक्त तीनच दिवस मुक्काम करणेची मुभा असत. येणाऱ्या भिक्षेतून कुटुंबांचा उदरनिर्वाह करावा लागत असे. काही जमाती दत्तगुरुचे, साई बाबाचे,इतर देवी देवतांच्या मूर्ती व प्रतिमा लहान गाडा बनवून त्यामध्ये ठेवतात. बैलगाडी किंवा चार चाकी गाड्यामध्ये सदर देव देवतांच्या मुर्त्या व प्रतिमा ठेवून भक्तिभावाने गांवोगावी घेऊन जातात व लोकांच्या सहानभूतीने दक्षिणा गोळा करतात, हेच त्यांचे उत्पन्नाचे साधन असत. काही जमाती उपजत पाच किंवा सहा पायाची गोमाता व नंदीस घेऊन फिरतात. गांवचे लोक त्यांचे भक्तिभावाने दर्शन घेऊन दान दक्षिणा देत असतात. त्या दानावरच सदर जमातीचा उदरनिर्वाह चालत असे. त्यांना भटकंती फिरस्ती करून गांवोगावी पोटासाठी व जगण्यासाठी फिरावे लागत असत.
पूर्वीच्या काळी सदरच्या भटक्या जाती- जमाती, उपजमाती मधील भराडी, नाथपंथी, दरवेशी, कोल्हाटी,घिसाडी, बेलदार,पांचाळ, वडर, कैकाडी, वंजारी, लमाण, गौंड, वैदू, गोपाळ,बंदरवाले, गारोडी, माकडवाले, कुंचेवाले, नंदीबैलवाले, फासेपारधी, बहुरूपी, भगत, भुत्ये,आराधी, वाघे मुरळ्या,जोगी, वासुदेव, कुडमुडे जोशी अशा अनेक भटक्या फिरस्ती जमाती येत असतात. यांचेकडे पूर्वीच्या काळी स्वतःचे गाव, घर, हक्काची जमीन नसलेमुळे काही जमाती हे आलुतेदार होते. त्यांना तहहयात फिरस्ती ,भटकंती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत असत. त्यामुळे भटक्या जमातीतील मुला- मुलींमध्ये शिक्षणाचा अभाव निर्माण झालेला होता ते गांवचे वतनदार व बलुतेदार नव्हते. भटकंती हेच जीवन त्यांच्या पाचवीला पुजलेले होते.
नागपंथी डवरी गोसावी हा समाज पूर्वीच्या काळी गांवाच्या बाहेर राहणारा भटका असणारा समाज हा इंग्रज राजवटीत अगर संस्थान काळात सदरच्या जमाती हया लाडी लबाडी,फसवेगिरी,दगलबाजी, चोरी चपाटी केलेचे कुठेही पोलीस रेकॉर्ड वर आढळून येत नाहीत. महाराष्ट्रातील काही जिल्हात या जमातीतील काही लोक भिक्षा मागणेसाठी फिरत होते. त्यावेळीस मुले पकडणारी टोळी आहे असे समजून काही गांवातील लोकांनी भिक्षा मागणाऱ्या लोकांची हत्या केलेली होती. त्यामुळे सदरचा नाथपंथी डवरी गोसावी हा समाज यांनी गांवोगावी भिक्षा मागण्याचे सोडून दिलेले आहे. व स्वाभिमानाने ज्या गावात राहतात त्या गांवात मेहनतीचे कामे किंवा व्यापार, धंदा करून जगतात. काही लोक जागरण गोंधळ करून उदरनिर्वाह करतात. तेव्हा परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानानुसार स्वातंत्र्याचा उपभोग घेऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीत जीवन जगत आहेत. परंतु आज ही सदरचा समाज दुर्लक्षित व उपेक्षित आहे. विकास योजनेपासून दूर असून समाज्यात शिक्षणाचा अभाव दिसून येत आहे. सदर भटक्या जाती-जमाती, उपजाती मधील नाथपंथी डवरी गोसावी या जमातीचा तंतोतंत जमात निहाय सर्वे होणे गरजेचे आहे. त्यांची सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगतीचा स्तर उंचावणेसाठी सदर समाज्यासाठी विकास मंडळ स्थापनेत यावे आणि सदर समाज्याचा एस.टी. प्रवर्गामध्ये समावेश करून त्यांना सामाजिक न्याय मिळणे अत्यंत गरजेचे आहे.
आभार :- विठ्ठल चव्हाण, रवी चव्हाण- आटपाडी, राहुल खरात-पुणे,संजय सावंत- बीड

*आयु.विलास खरात*
*आटपाडी*
*मो.नं. ९२८४०७३२७७*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

One thought on “*“नाथपंथी डवरी गोसावी”!* *समाजाची, दिशा, दशा!* *आयु, विलास खरात* —————————————–

  1. ” Images of Kabir ” या पुस्तकात वेगळी माहिती दिली आहे. नाथपंथी लोक भिक्षा मागून जगतात ही माहिती म्हणजे अर्धसत्य होय. पूर्वी नाथ संप्रदायाच्या लोकाना स्वतःच्या गांवात, राज्यात बोलावण्याची स्पर्धा लागत असे. कारण त्यांच्याकडे ” सुपर नॅचरल पाॅवर ” आहे असे समजले जात होते. उदाहरणार्थ….१. माणसाला साप चावल्यास विष उतरवणे….२. विदर्भात गारांचा पाऊस पडून पिकांचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी गारपगारी लोकाना बोलावलेय जात असे. ते गांवावर पडणार्या गारा , गांवाच्या बाहेर माळावर किंवा विहीरीत पाडत असतात. पाकिस्तान व उत्तर भारतात टोळ धाड येऊन पिके नष्ट होत. ही टोळ धाड थोपविण्याचे/ नष्ट करण्याचे काम नाथपंथी लोक करीत असत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *