- लोकदर्शन जिल्हा प्रतिनिधि 👉 प्रा. अशोक. डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर.दिनांक ,५ जुलै२०२३
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
– माणिकगड पहाडातून कोरपना – जिवती तालुकयातील गावांना व पुढे तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या, सावलहिरा ते येल्लापुर मार्गाचा अग्नीदिव्य प्रवास आता सुखकर झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक व वाहतूकदारांना सोयीचे झाले आहे. कोरपना ते येल्लापुरचे अंतर तसे वास्तविक पाहता अवघे पंधरा किलोमीटरचेच. परंतु माणिकगड पहाडातील सावलहिरा ते येल्लापुर दरम्यानच्या घाटात सुयोग्य रस्ताच नव्हता. संपूर्ण रस्ता दगडधोंड्यांचा होता. त्याकारणाने धनकदेवी – जिवती – कोदेपुर मार्गे अधिकचे अंतर मोजून उलट फेरा घेत चाळीस किलोमीटरचे अंतर मोजावे लागत होते. स्वातंत्र्याची ७७ वर्ष लोटल्यानंतर आता हा मार्ग झाल्याने कोरपनापासून गादिगुडा, आदिलाबाद , नारनूर , उटनुर शहरासह जिवती तालुक्यातील अतिदुर्गम गावात जाण्या – येण्यासाठी थेट मार्ग उपलब्ध झाला आहे. पूर्वी हा मार्ग संपूर्णतः दगडधोंड्याचा असल्याने बऱ्याच अडचणी यायच्या. या रस्त्याच्या माध्यमातून दुर्गम भागात जलदगतीने वैद्यकीय सुविधा ही पोहोचण्यास मदत झाली आहे. सदर मार्ग बांधकाम विभागाच्या नियोजनानुसार कन्हाळगाव – सावलहिरा – येल्लापुर् – रोडगुडा – टेकामांडवा – माराई पाटण -भारी -बाबापुर – राज्यसीमा असा जिल्हा महामार्ग क्रमांक ४५ म्हणून अस्तित्वात आला आहे. या मार्गाचे नव्वद टक्के काम पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी छोटे पूल, रोड , नाली बांधकाम , घाट रस्ता सुयोग्यकरण आदी कामे प्रगतीपथावर आहे. त्यामुळे या अतिदुर्गम परिसराच्या विकासाला गती मिळाली आहे.
असे असणार अंतर
सावलहिरा – येल्लापुर घाट रस्त्याचे काम पूर्णत्वास आल्याने कोरपना पासून येल्लापुर १५ किलोमीटर , वणी बू २९ किमी ,
गादीगुडा २५ किलोमीटर , उटनुर ७३ किमी , जिवती ( येल्लापुर – कोदेपूर मार्गे) ३२ किमी तर आदिलाबादचे गादीगुडा – लोकारी सातनाला मार्गे ७९ किलोमीटर असणार आहे. या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाने कोरपना ते गादीगुडा दरम्यान बस फेरी सुरू करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
घाट व रस्त्याचे काम दर्जात्मक व्हावे
सावलहिरा – येल्लापुर मार्गाचे काम वेगाने करण्यात येत आहे. मात्र कामाचा दर्जा योग्यरितीचा पाळला जात नाही. त्यामुळे अल्पावधीतच हा मार्ग उखडला जात आहे. तसेच घाट कडा , पुलाच्या कडा खचल्या जात आहे.या दृष्टीने बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामाचे गुणपरीक्षण करून सुयोग्यता राखली जावी यासाठी प्रयत्न करावे असे मत परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
पर्यटन स्थळांना जाणे झाले सोयीचे
माणिकगड पहाडातून जाणाऱ्या सावलहिरा – येल्लापुर मार्गावर भिमलकुंड धबधबा , भस्मनागाच्या खोरीतील धबधबे अशी अनेक निसर्गरम्य व धार्मिक स्थळे आहे. पूर्वी या ठिकाणी जाण्यासाठी बऱ्याच अडचणी यायच्या. आता यातील लाल पहाडी पर्यंत अर्ध्या रस्त्याची अडचण दूर झाली आहे. त्यामुळे पर्यटकाचा ही ओघ वाढला आहे
बायपास मार्गाची गरज
सदर मार्गावर कन्हाळगाव , खैरगाव, सावलहिरा ही लोकवस्ती असलेली गावे येतात. या गावातून जाणारा रस्ता हा अरुंद आहे. त्यामुळे गावाच्या बाहेरून रस्ता काढण्यात यावा. तसेच खैरगाव गावापासून हा मार्ग कोरपना येथील तलाव जवळ थेट मार्ग जोडण्यात यावा. यामुळे या मार्गातील अंतरही कमी होऊन परिसरातील ग्रामस्थांना बाजारपेठेत थेट पोहचता येईल.
.