लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– राजुरा येथे आयोजित महसूल दिन व गुणवंतांच्या सत्कार समारंभानंतर तहसील कार्यालय राजुरा येथे आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा, कोरपना, जिवती च्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन सध्याचे मुसळधार पाऊस, अतिवृष्टी तसेच अन्य अनेक बाबींचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी आ. धोटे यांनी सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, यांनी पुरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतीची, घरांचे व इतर बाबींची तातडीने पाहणी करावी, पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने शासकीय मदत पोहचवावी, पशु वैद्यकीय चिकित्सालय यांनी लम्पी आजारावर व अन्य आजारावर तातडीने उपचार करावे, शिक्षण विभाग, आरोग्य विभागाने आरोग्यविषयक अहवाल पाठवावे, जलयुक्तशिवार योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या फुटलेल्या बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्यात यावी, गोवरी रस्त्याचे डायव्हरशन तातडीने करावे असे निर्देश संबधित विभागांना दिले तर सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी जनतेच्या समस्या पोटतिडकीने सोडविण्याला प्राधान्य द्यावे अशा सुचना केल्या.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, राजुरा चे तहसिलदार ओमप्रकाश गौड, कोरपना चे तहसीलदार प्रकाश वऱ्हाटकर, जिवती चे तहसीलदार सेमटकर, गटविकास अधिकारी राजुराचे हेमंत भिंगारदेवे, जिवतीचे भागवत रेजीवाड, कोरपनाचे पेंदाम यासह महसूल विभाग, महावितरण विभाग , कृषी विभाग, पाणीपुरवठा, बांधकाम, आरोग्य विभाग, शिक्षण अशा विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.