लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे
उरण दि २२जुलै खालापूर तालुक्यातील मोरबे धरणाच्या वरच्या बाजूला इर्शाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या इर्शाळवाडीवर बुधवारी १९ जुलैच्या कालरात्री अस्मानी संकट कोसळलं.अतिवृष्टी मुळे डोंगराचा कडा कोसळला आणि त्या रात्री त्या वाडीतील तीस ते चाळीस घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली.आपल्या मुलां – बाळांसोबत गाढ झोपेत असणाऱ्या अनेक परिवारानां त्या चिखल – मातीच्या ढीगाऱ्याने अक्षरशः गिळंकृत केलं.आणि एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं.
इर्शाळवाडी या आदिवासीं ठाकूरवाडीवर आदिवासीं बांधवांवर उद्भवलेल्या अस्मानी संकटाच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे आणि त्यातच पुरते हळहळले, व्यथित झाले. ते आदिवासीं समाजा बद्दल विशेष प्रेम असणारे,आदिवासीं बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव झटणारं व्यक्तिमत्व आदिवासीं मित्र राजू मुंबईकर यांना मात्र त्या संकटग्रस्त आदिवासीं बांधवांच्या दुःखद काळात त्यांना धीर देण्याकरिता ,त्यांना मदत करण्याकरिता कधी एकदा जातो आणि त्याची विचारपूस करून सांत्वन करतो त्यांना मदतीचा हात देतो असं झालं होतं.लागलीच त्या संकटग्रस्त बांधवांकरिता त्यांना लागणारे अत्यावश्यक सामान म्हणजे महिला भगिनींकरिता कपडे, गाऊन, सैनेटरीपॅड,टॉवेल,नॅपकिन, पुरुष बांधवांना शॉर्ट ट्रॅक पँट, अंडर गारमेंट्स,टॉवेल, टीशर्ट,नॅपकिन लहान मुलांकरिता खाऊ ह्या सामानाचे किट तयार करून लगेचच त्यांनी आपले रानसई येथील आदिवासी सामाजिक कार्यकर्ते श्याम लेंडे आणि आपले सहकारी अनिल घरत,विलास ठाकूर यांना सोबतीला घेऊन थेट खालापूर येथील इर्शाळवाडी गाठली.आणि ह्या भयानक संकटातून सुरक्षित बचावलेल्या आणि . सध्या नानिवली प्राथमिक शाळेतील निवारा केंद्रात वास्तव्यास असलेल्या त्या संकटग्रस्त आदिवासीं बांधवांना त्यांच्या संकट समयी मदतीचा हात देत त्यांच्या व्यथा जाणल्या आणि त्यांचं सांत्वन करून त्यांना पुन्हा आयुष्यात नव्यानं उभ राहण्या करिता धीर दिला.
निसर्गरम्य डोंगर दाऱ्यांच्या कुशीत वसलेली ही छोटीशी वाडी आणि त्या वाडीतील ते डोंगरचे राजे आदिवासीं बांधव आणि त्यांची चिमुकली रानपाखरं जी आयुष्यभर ह्या डोंगर दऱ्यांच्या अंगा – खांद्यावर खेळली – बागडलली.त्याच डोंगर – दऱ्यां त्यांचा काळ बनून त्यांना गिळंकृत करतील असं कधी त्या बांधवांनी स्वप्नात देखील पाहिलं नसेल पण आज अनेकांनी त्यांच्या नातेवाईकांना गमावलं आहे ,अनेकांनी आपली लेकरं गमावली आहेत.तर कुणी आपल्या आई – वडिलांना गमावलं आहे.कुणी आपल्या संपूर्ण कुटुंबाला गमावलं आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झालेत , माणसं कोलमडली आहेत. ह्या भयानक संकटातून चमत्कारिक रित्या बाचावलेल्या आणि सध्या चौक येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनीषा यशवंत डोरे ह्या माऊलीची बारावी शिकलेली एकुलती एक मुलगी कु.कांचन डोरे ही मात्र ढिगाऱ्याा खालीच अडकून पडली.त्या माऊलीची व्यथा ऐकून आणि तिने फोडलेला हंबरडा पाहून अक्षरशः राजू मुंबईकर आणि त्यांचे टीमच्या डोळ्यांतून अश्रूचां बांध फुटला. इर्शाळवाडीवरच हे मृत्यूच तांडव पाहून आज संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
जीवाचा थरकाप उडवणाऱ्या ह्या संकट समयी मात्र माणुसकीचं दर्शन सुद्धा पाहायला मिळतयं. ते आज ह्या संकटग्रस्त बांधवांच्या मदतीकरिता आजूबाजूच्या महानगर पालिका, नगरग्रामपंचायती,पालिका, स्वयंसेवी संस्था,सामाजिक संस्था,मित्र मंडळ, ट्रेकर्स ग्रुप,सामाजिक कार्यकर्ते, एन. डी. आर. एफ.ची तज्ञ रिस्क्यू टीम,आपत्कालीन व्यवस्थापन विभाग, पोलिस यंत्रणा, अग्नीशामक दल,आरोग्य सेवा,रुग्णवाहिका,वैद्यकीय विभाग युद्ध पातळीवर काम करत आहेत.