by : Shankar Tadas
मुंबई : सध्या मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली सह इतर भागात जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलसेवाही कोल्मडली आहे. कसारा-कल्याण दरम्यान तांत्रिक कारणामुळे लोकल बंद पडली आहे. अनेक लोकल गाड्या स्थानकात उभ्या आहेत तर काही गाड्या या स्थानकांदरम्यान थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासी गाडीतून उतरुन ट्रॅकवरुन प्रवास करत आहेत. तर अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे लोकलसेवा खंडीत झाली आहे. अशातच ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे मार्गावर एक दुखःद घटना घडली आहे.
रेल्वे ट्रॅकवरुन चालत असताना येथे नाल्यावरुन जात असताना चार महिन्यांचे बाळ हातातून निसटून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे. अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याण या दरम्यान सुमारे २ तास उभी होती. त्यामुळे काही प्रवाशी गाडीतून उतरून कल्याणच्या दिशेने चालत जात होते. त्यात एक छोटे बाळ घेऊन एक काका आणि त्या बाळाची आई पण चालत होते. यादरम्यान, अचानक त्या काकांच्या हातून चार महिनाचे बाळ निसटले आणि ते नाल्याच्या पाण्यात जाऊन पडले. नाल्याच्या तीव्र प्रवाहात ते बाळ वाहून गेले. बाळाच्या आईने रेल्वे ट्रॅकवर टाहो फोडला. आपले बाळ डोळ्यांदेखत पाण्यात वाहून गेल्याने या आईला अश्रू अनावर झाले. त्वरित हालचाली करीत NDRF जवानांनी या बाळाला सुखरूप वाचविण्यात यश मिळविले आहे.