लोकदर्शन 👉 सौ भारती वसंत वाघमारे
बाप माझा राबतो
काळ्याआईच्या कुशीत .
खातो कष्टाची भाकर
घेऊन हातरुपी बशीत.
बाप कष्टाचा पहाड
रात्रंदिवस राबतो .
जगाचा पोशिंदा बाप
संकटाशी दोन हात करतो .
वरून असला कठीण
मन त्यांच मऊ लई
उन्हा तान्हात राबताना
अंगाची होते लाही
अदृश्य त्याचे अश्रू
नाही कुणास दिसले.
सावरताना आमचा तोल
दुःख सावरून हसले .
बाप माझा जणू
सावली वटवृक्षाची .
संकटाच्या सागरात
भाकरी खातो कष्टाची.
भर उन्हातान्हात
घाम गळतो टपा टप .
कधीच ऋण फिटणार नाही
आधारस्तंभ माझा बाप.
रखरखत्या उन्हात
बाप चालतो अनवाणी.
तहानलेल्या घशाला
झऱ्याचं थंडगार पाणी.
बापाची तुलना हिरा
मोत्यात नाही होणार .
संकटाच्या निखाऱ्यावरून
चालत जाणार
कष्टकरी बाप माझा
वरून टनक दिसतो .
एकच सांगते सर्वांना
बाप हा बाप असतो .
सौ भारती वसंत वाघमारे
राहणार मंचर
तालुका आंबेगाव
जिल्हा पुणे