मालेगाव तालुक्यात हॉस्पिटलवर छापा, बोगस डॉक्टरला अटक

by : Ajay Gayakwad

मालेगाव  : समाजामध्ये वैद्यकीय पेशातील लोकांना देवाच्या बरोबरीचा दर्जा दिला जातो. कारण दुखण्याने त्रस्त झालेल्या जीवाला डॉक्टरच त्याच्या वैद्यकीय उपचाराने बरे करू शकतात, त्यांच्या वेदना बंद करतात. परंतु काही लोक मात्र कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय शिक्षण न घेता स्वतः डॉक्टर असल्याचे भासवतात व रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळतात. या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील ग्राम मारसूळ येथील एका बनावट डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे.
मालेगाव तालुक्यातील मारसूळ या गावात बनावट डॉक्टर असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाल्यावरून परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमर मोहिते यांच्या पथकाने आरोग्य विभागाच्या समन्वयाने दि.०७ जून, २०२३ रोजी दवाखान्यावर छापा टाकला. सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात औषध साठा ज्यामध्ये IV Fluid, Anti Cold Tablet, Steroid Injection, Broncho Dialator Injection, Anti Pyretic Injection/Tablets, Antacid, Pain Killer, Injection/Tablet, IV Set, Scalp Vein Set, Dressing material व इतर वैद्यकीय वस्तू मिळून आल्या. कोणत्याही प्रकारची वैद्यकीय शिक्षण पदवी व परवाना नसताना सदर व्यक्ती हा स्वतः डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांच्या आरोग्याशी खेळत होता.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक बच्चन सिंह(IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री.अमर मोहिते यांचे पथक पोउपनि.चौधरी, सपोउपनि.लाभांडे, पोहवा.मिसार, पोशि.घुगे, मपोशि.बेंगाळ यांच्यासह वैद्यकीय पथकातील डॉ.संतोष बोरसे, डॉ.किशोर काळबांडे, दिलीप देवकते यांनी छापा टाकून ही कारवाई केली. मालेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष प्रल्हादराव बोरसे यांच्या फिर्यादीवरून पो.स्टे.मालेगाव येथे अप.क्र.२५७/२३, कलम ३३ महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम १९६१ अन्वये प्रमोद सुभाषराव घुगे, वय ३९ वर्षे, रा.मारसूळ, ता.मालेगाव, जि.वाशिम या बनावट डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
श्री.बच्चन सिंह (IPS) पोलीस अधीक्षक, वाशिम यांनी सर्व जनतेस सुजाण नागरिक या नात्याने अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती द्यावी त्या इसमाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *