दिल्लीतील ‘पत्थरदिल’

दिल्लीतील ‘पत्थरदिल’
by : Shankar Tadas
आमच्या महान देशाची राजधानी दिल्लीत लोकांसमोर एका अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या होते. चाकूचे सपासप वार केले जातात. नंतर दगडाने ठेचले जाते. आमचे ‘सज्जन ‘ लोक हे सैतानी कृत्य पाहत रस्त्याने निघून जातात. तिथे महिला व मुलीही दिसतात. त्यापैकी एक तरुण आरोपीला रोखण्याचा प्रयत्न करतो. त्याला इतर कोणाची साथ मिळत नाही. चार-पाच तरुण अगदीच जवळून पाहत असतात. तिथे एक कुत्रा जवळ येतो. तोही घटनेने अस्वस्थ दिसतो. त्याच्याही हृदयात काहीतरी हालचाल होते. कोणीतरी ही घटना रोखू शकले असते, असे या घटनेचे वायरल व्हिडिओ पाहून नक्कीच वाटते. मात्र तसे झाले नाही. ही दुर्दैवी आणि आपल्या ‘विश्वगुरू ‘ देशाकरिता अत्यंत लज्जास्पद घटना CCTV मध्ये रेकार्ड झाल्याने आपल्या महान देशवासीयांनी हा थरार पाहिला. अशी सैतानी कृत्ये कित्येक प्रश्न निर्माण करतात. समाजमन सुन्न करतात. मीडिया आपल्या सोयीनुसार ‘अँगल’ शोधतात. राजकीय पुढारी एकमेकांना दोष देतात. अधिकारी चौकशी करीत राहतात. टीव्हीवरीत चर्चेत धर्ममार्तंड तावातावाने एकमेकांवर तुटून पडतात. कोणत्या धर्माचे लोक वाईट यावर वादळ उठते. खूप वर्षांनी न्यायालय आपली जबाबदारी पार पाडते. तोवर ही घटना लोक विसरलेले असतात. पुन्हा सगळे कसे शांत होतात. काहीही न झाल्यासारखे. आमच्या सरकारी यंत्रणा पुन्हा अशाच एखाद्या दुर्दैवी घटनेच्या स्वागताला सज्ज असतात. याच घटना राजकारणाचे पौष्टिक ‘खाद्य’ होतात. सामान्य माणूस मात्र आपल्या मुलीला वाचविण्यासाठी तिला घरातच कोंडण्याचा विचार करू लागतो. तिच्या सुरक्षिततेविषयी कमालीचा अस्वस्थ होतो. सर्वच उपाय त्याच्या आवाक्याबाहेर असल्याची जाणीव करून देतात. मित्रहो, आपलं काय चुकतंय…!! निव्वळ हिंदू.. मुस्लिम म्हणून आपण जबाबदारी झटकू शकतो काय?? अशी एखादी अमानवी घटना आपल्यासमोर घडत असताना माझ्या महान देशाच्या नागरिकांनी काय केले पाहिजे याविषयी आमच्या शाळेत काहीच शिकविले जात नसावे काय? ज्या धर्माच्या नावाने एकमेकांचा जीव घ्यायला आणि द्यायला तयार असतो त्या धर्माची कोणतीच शिकवण येथे आपल्याला कर्तव्यतत्पर करीत नाही ? ही मुर्दाड माणसे जिथे किड्यामुंग्यासारखी पैदा होत आहेत… मरत आहेत… त्या देशाला उज्ज्वल भविष्याचा काय अधिकार ? देशाविषयीचे कर्तव्य फक्त सीमेवर लढणाऱ्या पगारी सैनिकांपुरतेच मर्यादित असावे ? एखादी ‘मन की बात’ यावरही का होऊ नये? आपापल्या धर्मापासून भरकटलेल्या लोकांना जबाबदार मानावे..?? भ्रष्टाचारी, बेजबाबदार, नामर्द नागरिकांचा देश म्हणून आपली ओळख निर्माण करू पाहणारी आमची टाकावू शिक्षण पद्धती आणि सरकारी यंत्रणा तर अशा घटनेला जबाबदार नाही ना ?? जगात असेही काही देश आहेत जिथे साधे रस्त्यात थुंकण्याची कोणाची हिम्मत होत नाही.
🙏🙏

संपादक : शंकर तडस : 9850232854

 

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *