लोकदर्शन मुबई 👉.शिवाजी सेलोकर
मुंबई, ता. १० : छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे, प्रत्येक मराठी माणसाचा श्वास आहे. येणारे वर्ष शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष आहे; यानिमित्त २ जून रोजी रायगडावर राज्य सरकारकडून आयोजित कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन करुन शिवप्रेमीना सोबत घेऊन हा सोहळा भव्यदिव्य आणि देखणा व्हावा यासाठी शिस्तबद्ध तयारी करा अशा सूचना राज्याचे सांस्कृतिक कार्य, वन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या. संपूर्ण जगातील लोक या सोहळ्याकडे कुतुहलाने बघत आहेत असेही ते म्हणाले.
ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दि. १० मे रोजी शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या तयारीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला आमदार भारत गोगावले, आ. महेंद्र थोरवे,आ. गोपीचंद पडळकर, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, चित्रपट महामंडळाचे व्यवस्थपकिय संचालक अविनाश ढाकणे, उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती रायगडचे अध्यक्ष सुनील पवार यांच्यासह रायगडावर दरवर्षी हा सोहळा आयोजित करणारे शिवप्रेमी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, कार्यक्रमाच्या संदर्भात एका समितीची स्थापना करण्यात यावी या समितीमध्ये प्रामुख्याने सांस्कृतिक विभागाचे अधिकारी, पर्यटन विभागाचे अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी, सर्व प्रमुख विभागाचे अधिकारी असावेत. समिती तयार केल्यानंतर समितीची उपसमिती तयार करुन जबाबदाऱ्या निश्चित करण्यात याव्यात.
कामाचे योग्य पध्दतीने वाटप करुन पूर्ण कार्यक्रमाचे फ्लो कसा असेल याचे डिटेलींग तयार करण्यात यावे अश्या सूचनादेखील त्यांनी दिल्या.
हवामान खात्याच्या माध्यमातून ०१ ते ०७ जूनपर्यंत हवामानाबद्दल माहिती घेउन तसे नियोजन व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आवश्यक असल्यास गडावर बॅटरी ऑपरेटेड वाहने, समाधीची उत्कृष्ठ सजावट आरोग्यविषयक सर्व सोयी-सुविधा व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता योग्य प्रमाणात करावी अश्या सूचना दिल्या.
प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी पसोहळा कसा असेल याचे सादरीकरण केले. राज्याभिषेक करण्यासाठी १००८ जल कलश पूजनाचे आणि रथाचे नियोजन या बाबत देखील बैठकीत चर्चा झाली.