सांगली जिल्ह्यातील आटपाडी इनाम जमिनीवरील मधील साधे कुळ ! .विलास खरात

लोकदर्शन आटपाडी ;👉 राहुल खरात

साधारण वैशाख महिन्यात सकाळी-सकाळी दौलत आबाच्या शेतातील वस्तीवरती सैदा व तुकाराम पोहचले होते. त्या वेळास दौलत आबा शेतात नांगरायला जाणेसाठी बैलगाडीत नांगर व इतर सामान ठेवीत असताना दौलत आबाची नजर सैदा व तुकाराम वर पडली त्या वेळीस आबा म्हणाले, अरे गड्यांनो सकाळी का येणे केले आहे ? त्यावर सैदाने व तुकारामने नमस्कार घालून म्हणाले, आबा आमची म्हारकी या वर्षी नांगरुण पेरायची आहे ? त्यावर दौलत आबा म्हणाले, त्यात काय एवढे आहे, नांगरुण व पेरुण देतो. त्यावर सैदा आबा कडे पहात म्हणाला आबा आमचेकडे पैसे नाहीत. दोन वर्षे झाली म्हारकी पडीक आहे ? काळ्या आईची ओटी तुमच्याच हाताने भरा. आता तरी जोंधळ्याच्या भाकरी खाऊ द्या की,त्यावर आबा म्हणाले आर जमीन नांगरूण पेरायची कशी ? सांगा तुम्हीच त्यावर तुकाराम म्हणाला धान्य आम्ही घेतो, कडबा तुमच्या जनावराला घ्या आणि राहिलेले किती रुपये द्यायचे तेवढे सांगा ? जमीन एकरभर आहे. त्यावर दौलत आबा म्हणाले, ठिक आहे. दोन दिवसानी तुमची जमीन नांगरून देतो. तो पर्यंत तुम्ही पडीक जमीनीतील झाडे झुडपे असतील तर तोडून घ्या असे म्हणून दौलत आबा बैलगाडी घेवून शेताकडे जाऊ लागले.
दुसऱ्या दिवशी सैदा व तुकारामने कुऱ्हाडीस दांडे बसवून म्हारकीतील जमीनीतील उगविलेल्या बाभळी ,लिंब, तरवड ,रुईची झाडे कुऱ्हाडीने तोडून टाकली व तोडलेली लहान झाडे पडीक विहिरीच्या धावे जवळील मोकळ्या जागेत टाकली. नांगरण्यासाठी रान मोकळे केले त्यानंतर दोन दिवसानी दौलत आबानी म्हारकीतील एक एकर जमीन चार बैल जोडी लावून नांगरूण दिली. बऱ्याच दिवसानी जमीन नांगरले मुळे मोठ-मोठी ढेकळे निघाली होती. दौलत आबा म्हणाले, सैदा झाले का तुझे समाधान. आर येणाऱ्या गौरी गणपतीचा सण झालेवर पेरणी करून देतो, त्यावर सैदा व तुकारामने समाधानाने होकार दिला. दौलत आबा हे हाडाचे शेतकरी होते पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त असलेमुळे गळ्यात तुळशीची माळ होती, पंढरीची वारी नियमाने करीत असत. स्वभावाने स्वच्छ व निर्मळ मनाचे असलेमुळे पोटात एक ओठात एक नसणारे होते. त्यामुळे पंचक्रोशित दौलत आबाला सर्वजण ओळखत होते.
सैदा व तुकाराम हे सख्ये भाऊ होते.गावगाड्यातील हरेक प्रकारची पडेल ती कामे करून जगत असत. वडील वारलेवर सुद्धा वेगवेगळे न राहता एकत्रच तीन खणाच्या धाब्याच्या व सोप्याच्या वडिलार्जित घरात बायका पोरासह राहत होते. परंपरागत असलेल्या वडिलार्जित म्हारकीतील एक एकर जमीन होती. तिची वाटणी न करता दोघे मिळूनच जमीन करीत होते. त्यामुळे घरात एकच चुल होती. त्यामुळे एकोप्याने राहून कामे करीत असत. नांगरलेल्या जमीनीतील मोठ-मोठी ढेकळे टिकावाच्या व खोऱ्याच्या उलट्या दांड्याने फोडून त्यांची माती केली होती. त्यानंतर विहिरी जवळ टाकलेल्या झाडा-झुडपाच्या फांद्या,लाकडे सरपणासाठी फोडीत असताना जयसिंग आण्णा हे सैदा व तुकारामच्या जवळ आले व म्हणाले, काय करताय गड्यानो त्यावर सैदाने व तुकारामने आण्णा कडे पाहत नमस्कार घातला व म्हणाले आण्णा गरीबाकडे का येणे केले आहे ? त्यावर जयसिंगराव म्हणाले मागील वर्षाच्या पावसाळ्यात “बारवतील” जमीनीतील मोठी ताल फुटलेली आहे. तेवढी ताल घालून द्या, तुम्हाला दोन पायली ज्वारी देतो व दुपारच्या जेवणासाठी भाकरी व ताक आणून देतो , त्यावर सैदाने व तुकारामने लगेच होकार देवून टाकला व म्हणाले अण्णा , बरेच दिवस झाले ज्वारीच्या भाकऱ्या खाल्या नाहीत. व्हंडीच्या भाकरी खाऊन वैताग आला आहे. त्यावर जयसिंग आण्णा म्हणाले उद्या सकाळी लवकरच कामाला या , त्यावर सैदा व तुकाराम म्हणाले उद्या सकाळीच कामाला येतो काळजी नसावी. त्यानंतर जयसिंगराव घराकडे निघून गेले. सैदा व तुकारामने तोडलेल्या झाडाची सरपणाची मोळी बांधून डोक्यावर घेवून घराकडे चालू लागले.
सैदा व तुकारामने जयसिंग आण्णाची फुटलेली ताल दोन दिवसात मातीने भरून दिली. त्यानंतर गावातील अनेक लोकांची घरे गव्हाच्या काडानी शेकरून देत असत. गांवातील लोकांच्या घरातील लाकडे सरपणासाठी फोडून देत असत. त्यांच्याकडून आलेल्या भाकरी व ज्वारी पासून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत. गांवातील कोणाच्या घरात लग्न कार्य असेल तर सैदा व तुकाराम कार्य पडस्तो पर्यंत लाकडे फोडून देत असत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील लोकांना लग्नातील गोडधोड पदार्थ खायला मिळत असत. त्यामुळे लग्न कार्यातील पडेल ती कामे करीत असत.
गौरी गणपतीच्या सणा नंतर म्हारकीतील जमिनीत पेरणी करून घेतली. पाऊस काळ चांगला झालेमुळे ज्वारीचे पीक चांगले आले होते. त्यामुळे दोघाच्याही कुटुंबाने मेहनत करून ज्वारीची काढणी, मोडणी करून घेतली. सुगीच्या हंगामात बऱ्याच दिवसांनी जोंधळ्याचे धान्य घरात आले होते. त्यामुळे सैदा व तुकारामच्या कुटुंबात अत्यंत आनंद झाला होता. होळीच्या सणादिवशी करीच्या वेळी समाज्यातील मंडळींनी बोकड आणले होते. त्यातील एक मटणाचा वाटा सैदाने आपल्या कुटुंबासाठी घेतलेला होता. सैदा व तुकारामच्या मुलांनी ओळखले की, आज करीच्या दिवशी घरात मटणाचा वाटा आणला आहे, त्यामुळे बऱ्याच दिवसांनी मटन खायला मिळणार म्हटल्यावर पोरांनी जेवनाच्या अगोदर चुलीतील राखेने दात घासून घेतले होते. संध्याकाळी कुटुंबानी ज्वारीच्या भाकऱ्या व मटणाच्या कालवणावर पोटभरून ताव मारून समाधानानी जेवण करून झोपी गेले होते.
परगांवी गेलेले भावकीतील मंडळी आपल्या कुटुंबासह श्री सिद्धनाथाच्या यात्रेसाठी गांवी येत असतात. त्यामुळे शहरातून विठ्ठल, गणा, सखाराम, सुखदेव एकनाथ ,दगडू, संपत्ती गांवी आलेले असलेमुळे भावकीत उत्साहाचे वातावरण होते. यात्रेसाठी आलेले भावकीतील मंडळी घरात जागा अपुरी पडते म्हणून संध्याकाळी समाज मंदिरात झोपणेसाठी आलेनंतर समाज्यातील लोकांची ख्याली खुशाली आस्तेवाईक पणे विचारना करीत असत. त्यावेळी सैदाने शहरातून आलेल्या भावकीतील मंडळींना गांवच्या परिस्थितीची सर्व माहिती सांगितली व म्हणाले गाव गाड्यातील कामाचा वैताग आलेला आहे. मजूरीवर नीट पोट ही भरत नाही, रोज काय काम नसते. म्हारकीतील जमीन थोडीशी आहे, त्यातही भाऊ हिस्सामुळे वाटणी झालीमुळे वितभर जमिनीत किती पेरायचे, त्यात पाऊस काळ बरा असेल तर, पीक येते नाही तर पेरलेल्या पिकाचे बाटूक काडून आणावे लागते. त्यामुळे गावात समाज्यात घरात आम्ही जिवंत राहणेसाठी आम्ही जगतूया. तुम्हा शहरातील मंडळींना आमची कणव येत असेल तर, शहरात कुठेतरी आम्हाला कामधंद्याला लावा, त्यावर विठ्ठल म्हणाला,आर सैदा आम्ही काय शहरात सुखात राहत नाही. लहान झोपड्याच्या घरात कसे राहतोय ते आमचे आम्हालाच माहित आहे. दिवसभर काम करावे लागते तवा कुठे पोटात घास जातोय, त्यावर लगेच एकनाथ म्हणाला शुगर फॅक्टरीत मरणाचे काम करावे लागते, परगांवी काम केले शिवाय पर्याय आम्हाला नाही. परंतु काय तरी मार्ग काढूया तुमचे म्हणणे बरोबर आहे,त्यावर विठ्ठल म्हणाला सैदा मी तुला मुंबईच्या गिरणीत कामाला लावतो. परंतु माझ्या झोपडीत अगोदरच पाहुण्याचे बिऱ्हाड आहे. त्यात तुझी दोन बिऱ्हाड सोय कशी करायची हाच विचार करतोय. त्यावर लगेचच एकनाथ म्हणाला, विठ्ठल दादा तुम्ही मुंबईला सैदाला घेऊन जावा. मी तुकारामला वालचंद नगरच्या शुगर फॅक्टरीत कामाला लावतो. त्यावर गणा म्हणाला विठ्ठल व एकनाथने जो मार्ग काढला आहे तो मार्ग योग्य आहे. त्यावर सैदाने व तुकारामने सहमती दर्शवली. त्यानंतर समाज मंदिरात रात्री सविस्तर विचार विनिमय भावकीतील मंडळीशी केले नंतर सैदास मुंबईस घेऊन जाणेचे निश्चित केले व तुकारामास वालचंदनगर येथे जाणेचे निश्चित ठरविणेत आले. त्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा झालेवर समाज मंदिरात झोपी गेले. सैदा व तुकाराम हे विचाराच्या गर्तेत विचार करीत डोळा कधी लागला त्यांना समजले सुद्धा नाही.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सैदा व तुकाराम दौलत आबाच्या घरी पोहोचले, आबास नमस्कार घालून जमिनीवर बसले व म्हणाले आबा आम्ही रोजगारासाठी शहरात जातोय. आमची म्हारकीतील जमीन पडीक राहणे पेक्षा जमीन तुम्ही कसत जाऊन पिकपाणी घेत जावा. आमची दोघांचीही सहमती आहे. आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यावर आबा म्हणाले, अरे गड्यांनो माझी जमीन करताना मलाच नाकीनऊ येतय. तुमची जमीन कसनेस मला जमणार नाही. तुम्ही दुसरा कोणीतरी बघा. त्यावर सैदा म्हणाला तुम्हीच सांगा ? दुसरा कोणता इसम आहे ? त्यावर आबा म्हणाले, तुमच्या जमीनीच्या सर्व्हे नंबरच्या बांधाला लागूनच संपतरावची जमीन आहे, त्यास विचारून बघा. त्यावर आबाचा निरोप घेवून सैदा व तुकाराम संपतरावच्या घरी गेले. त्यांना पाहून नमस्कार घातला व म्हणाले, आम्ही शहरात कामधंद्यासाठी जात आहे, आमची जमीन पडीक ठेवू नका, तुम्ही आमची जमीन कसत जावा. आम्ही गावी आलेनंतर आमची जमीन आम्ही कसत जाऊ. आम्हाला जमीन कसणेच्या बदल्यात धान्य अगर पैसे नको आहेत. फक्त पडीक ठेवू नका एवढीच विनंती आहे. त्याबाबत दौलत आबांनी तुमचेच नाव आम्हाला सांगितले आहे. त्यानंतर संपतरावने सैदा व तुकाराम याना सांगितले की, तुमची जमीन माझ्या शेताजवळ आहे. काहीच काळजी करू नका. तुमची जमीन पड ठेवीत नाही. तुम्ही गावी आलेनंतर तुमची जमीन तुम्हाला परत देईन. काहीही काळजी करू नका माझेवर विश्वास ठेवा, बिनघोर तुम्ही शहरात जावा असे म्हटल्यावर सैदा व तुकाराम घराकडे निघून आले.
श्री सिद्धनाथाची यात्रा झालेवर विठ्ठलने सैदास व त्याच्या कुटुंबास मुंबईस घेऊन गेले. आपल्याच झोपडीत त्यांच्या कुटुंबाची राहण्याची व्यवस्था केली. काही दिवसानंतर विठ्ठलने ओळखीने सैदास गिरणीत गिरणी कामगार म्हणून लावणेत आले. एकनाथने तुकारामच्या कुटुंबासह वालचंदनगर येथे घेऊन येऊन तुकारामास शुगर फॅक्टरीत लेबर म्हणून कामास लावले. शुगर फॅक्टरीने बांधलेल्या लेबर्सच्या घरामध्ये राहण्याची सोय केली होती. गाव सोडताना सैदा व तुकारामास वाईट वाटले. डोळ्यातून पाणी येऊ लागले होते, नियतीने दोघा भावाला पोटासाठी वेगळे-वेगळे केले होते. जगणेसाठी व जिवंत राहणेसाठी त्यांनी शहराचा रस्ता धरला होता. त्यामुळे शहरात आले नंतर सैदा व तुकारामला गांवातील व शहरातील जगण्याचा फरक समजायला लागला होता. दोघेही शहरात आपल्या कुटुंबासाठी मजूर म्हणून काम करू लागले होते. सैदा मुंबईत गिरणी कामगार म्हणून काम करून लागला, गिरणी जवळील झोपडपट्टीत आपल्या कुटुंबासह राहु लागला. तुकाराम शुगर फॅक्टरीत लेबर म्हणून काम करू लागला. दोघांची मुले शाळेत जावू लागले होते. सैदा व तुकाराम एकमेकांना पत्र पाठवून खुशाली विचारत असत. दिवसा मागून दिवस जाऊ लागले. सैदा व तुकाराम अनेक वर्ष काम करीत होते.दोघाचीही मुले मोठी झाली होती.मुलांनी कॉलेजचे शिक्षण पूर्ण करून शहरातच कंपनीत काम करु लागले होते. सैदाचे गिरणीतील काम बंद झालेमुळे तो दुसऱ्या कंपनीत काम करीत होता. तुकाराम ची मुले शुगर फॅक्टरीत लागलेमुळे तुकारामने राजीनामा देऊन किराणा मालाचे छोटेसे दुकान सुरू केले होते. दोघांचेही कुटुंब खाऊन पिऊन सुखी होते. जगण्याचा मार्ग त्यांना सापडलेला असलेमुळे आनंदात होते. प्रपंच्याच्या चक्र व्युव्हात गुरफटलेमुळे गावाकडे जाणे येणे होत नव्हते. परंतु गावाकडून आलेल्या पत्रातून गावची माहिती मिळत असत.
एके दिवशी गांवाहून येसानाना चे पत्र आले होते, त्या पत्रामध्ये येसानानाच्या मुलाचे लग्न गावी असलेचे म्हटलेले होते. लग्नासाठी येणेचे कळवले असलेमुळे सैदाने लग्नासाठी जाणेसाठी ठरवले होते.त्यात येसानाना दारा आडक्यातील असलेमुळे सैदा आपल्या कुटुंबासह गावी निघाले होते. तुकाराम सुद्धा आपल्या कुटुंबाला घेऊन गावी आला होता. त्यामुळे बरीच भावकीतील शहरातील मंडळी गांवी येसानानाच्या मुलांच्या लग्नासाठी आलेली होती. त्यामुळे गावी येसानानाच्या मुलाचे लग्न समाज्याच्या चाली व प्रथेनुसार धूम धडाक्यात साजरे करणेत आले. दोन-तीन दिवस लग्नाच्या धाम धुमीत कसे गेले ते कळले सुद्धा नाही. सगे सोयरे,पैपाहुणे आपआपल्या गावी निघून गेले. शहरातून आलेली भावकीतील मंडळी सुद्धा परत जाऊ लागली होती. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर येसानाना म्हणाले, अरे सैदा तुमची जमीन कसणेसाठी संपतरावाना दिली आहे काय ? तो भावकीतील कुणालाच तुमच्या जमिनी जवळ येवू देत नाही, काय भानगड आहे ? दामू कोतवाल म्हणतोय, संपतरावने म्हारकीतील जमिनीवर साधे कुळ लावलेले आहे. त्यामुळे उद्या सकाळी तलाठी कार्यालयात जाऊन ७/१२ काडून बघूया मग ठरवूया, काय करायचे आहे ते असे येसानाना म्हणताच सैदा विचारात पडला, तुकारामचा चेहरा उतरला, सैदा व तुकाराम रात्रभर विचार करून बैच्चन झाले होते काय झाले ? कसे झाले ? याच विचारात रात्रभर विचार करत झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी तलाठी कार्यालयात जाऊन तलाठी साहेब यांचे कडून म्हरकीतील जमिनीचा सातबारा उतारा घेतला, तो वाचून पाहिलेवर सातबारा उताऱ्यावर “साधे कुळ” म्हणून संपतरावने आपले नांव लावलेले आहे. त्यामुळे सैदा व तुकारामास राग आला व संतापाने अंग थरथर कापू लागले होते. थोडा वेळ विचार करून येसानाना, निवृत्ती यांना बरोबर घेवून संपतरावच्या घरी गेले. त्यांना नमस्कार घालून म्हणाले आण्णा तुम्ही आमचे जमिनीवर तुमचे नाव कसे काय लावले आहे ? सातबारावर तुम्ही साधे कुळ अशी नोंद घालून घेतली आहे. असे म्हणून सैदाने ७/१२ उतारा संपतरावाना दाखवित असताना संपतराव म्हणाले, उतारा मला दाखवू नको, दहा-बारा वर्षे झाली तुमची जमीन मी कसत आहे. त्यामुळे कायद्याने व नियमाने माझे नांव लावलेले आहे. त्यावर तुकाराम म्हणाला अण्णा आमचे काय चुकले आहे काय ? लगेच संपतराव म्हणाले, जमीन माझ्या वहिवाटीत व कब्जात आहे. तुमच्या जमिनीचा मालक मी आहे. तुम्हाला काय करायचे असेल ते करा, आता मी तुम्हाला तुमची जमीन देणार नाही, कुठे जायचे असेल तिथे जावा, त्या जमिनीत पाय सुद्धा ठेवायचा नाही. नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी देऊन म्हणाले परत जमिनीचा विषय घेऊन माझ्याकडे यायचे नाही, आता माझ्या घरातून चालते व्हा असे संपतराव म्हणताच सर्वजण घराच्या बाहेर निघून आले व दौलत आबाच्या घराकडे निघाले.
सैदा, तुकाराम, येसानाना, निवृत्ती हे सर्वजण मिळून दौलत आबाच्या घरी आले, सर्वांनी दौलत आबाला नमस्कार घालून खाली बसले, त्यानंतर येसानाना म्हणाले, आबा संपतरावानी वाईट काम केलेले आहे. सैदा व तुकारामचे जमिनीवर आपल्या नावाने त्यांनी साधे कुळ म्हणून नोंद केलेली आहे असे म्हणून ७/१२ उतारा आबाकडे दिला. आबांनी ७/१२ उतारा पाहून घेतला व म्हणाले संपतरावांनी अशी चूक करायला नाही पाहिजे होती. सैदा आबाकडे पाहत म्हणाले ,आम्ही गरीब माणसे पोटापाण्यासाठी शहरात गेलो. विश्वासाने संपतरावाकडे जमीन करणेसाठी दिली होती. आमचे काय चुकले आहे. विश्वास,माणुसकी राहिलेले नाही असे म्हणून उदास चेहऱ्यांनी आबाकडे पहात राहिले.त्यानंतर येसानानाने संपतरावाचा घरातील घडलेल्या प्रसंग दौलत आबांना सांगितला व म्हणाले, आबा आम्ही सर्वांनी त्यांच्याकडे जाऊन जमिनीचा विषय काडला, गयावया केली परंतु त्यांना पाझर काय फुटला नाही. उलट आम्हालाच धमकी दिली आहे, त्यावर आबा यावर आता तुम्हीच काय तो मार्ग काढा व सैदा व तुकारामला न्याय द्या ही विनंती करतो आहे. त्यावर आबा म्हणाले, मला तुम्ही दोन दिवस द्या, संपतरावाना बोलावून विचारतो, काय मार्ग निघतोय काय ते बघूया त्यानंतर पुढे काय करायचे ते नंतर ठरवू असे म्हणून त्यांना सांगितले, तुम्ही आता घरी जावा, दोन दिवसानंतर या असे म्हटल्यावर सर्वजन घराकडे निघून आले.
दोन दिवसानंतर सैदा,तुकाराम,येसानाना, निवृत्ती हे दौलत आबाच्या घरी आले नंतर नमस्कार घातला, त्यानंतर घरापुढे मोठ्या आंब्याच्या झाडाच्या सावलीखाली पारावर सर्वजन बसलेनंतर आबा म्हणाले, संपतराव माझे सुद्धा ऐकत नाही. गावातील चार माणसे जमून त्यांचा काहीही उपयोग होणार नाही, अरे, गड्यांनो घरच्या भावांना जमिनीतून सुद्धा रस्ता देईना, चुलत भावाची जमीन बळकावली आहे. तो तुम्हाला काय जमीन देणार आहे.त्यावर येसानाना म्हणाले, आपल्या शेजारच्या गांवातील महादेव आण्णाची जमीन मुलाच्या शिक्षणासाठी वीस हजार रूपयच्या मोबदल्यात सव्वा एकर जमीन महीपतरावाकडे गहाण ठेवली होती, सदरच्या गहाण ठेवलेल्या जमिनीचे पैसे वेळेवर देता न आल्यामुळे महीपतरावने महादेव आण्णाची जमीन आपल्या नावावर ७/१२ उताऱ्यावर लावून घेतली आहे, काही वर्षानंतर महादेव आण्णाच्या मुलाला नोकरी लागल्यानंतर महादेव आण्णाच्या मुलांनी व्याजासहित सर्व रक्कम महीपतरावांना देणेसाठी घेवून गेले होते, परंतु रुपये घेतले नाहीत व जमीनही परत दिली नाही हे आपल्या समोरचे उदाहरण आहे,त्यावर दौलत आबा म्हणाले तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, परंतु पूर्वी संपतराव असा वागत राहत नव्हता, माझेच चुकले आहे,संपतरावास तुमची जमीन कसणेस सांगितल्यामुळे हा घोळ झालेला आहे, आता माझे पण वय झालेले आहे. संपतराव बरोबर भांडण वाद करून उपयोग नाही. त्यावर सैदा म्हणाला आता आम्ही काय करायला पाहिजे म्हणजे आमची जमीन आम्हाला परत मिळेल . आहे त्यावर आबा विचारपूर्वक म्हणाले, सर्वांनी लक्ष देऊन ऐका,माझा भाचा वसंता हा तालुक्याच्या ठिकाणी वकिली करतोय तुम्ही त्याच्याकडे जावा, त्याला सर्व हकीगत सांगा ? माझा निरोप त्याला सांगा, यावर कायदेशीर मार्ग काड म्हणावे, जाताना सर्व कागदपत्रे बरोबर घेऊन जावा ? उद्याच तुम्ही तालुक्याला जावा म्हणून सांगितले,त्यावर सैदाने नमस्कार घालून वसंत वकिलाचा पत्ता घेऊन घरी आले.
तालुक्याच्या ठिकाणी वसंत वकिलीच्या घरी आबाने सांगितलेल्या पत्यावर पोहचले. त्यामध्ये सैदा,तुकाराम,येसानाना,निवृत्ती,पांडा हे सर्वजन वसंत वकिलाच्या घरी पोहचले नंतर वसंत वकिलाना नमस्कार घालून म्हणाले, आम्हाला दौलत आबाने तुमच्याकडे पाठवले आहे. त्यानंतर वकिलांनी सर्वांना सतरंजीवर बसण्यास सांगून त्यांना पिण्यासाठी पाणी देऊन चहापाणी झाले नंतर सर्वांकडे पहात वसंत वकील म्हणाले, बोला आता माझ्याकडे काय काम काढले आहे. असे म्हणताच सैदाने पिशवीतील सर्व कागदपत्रे काढून वकिलाच्या हातात दिली व म्हणाले आमचे गांवच्या संपतरावानी आमच्या जमिनीवर “साधे कुळ” अशी नोंद करून घेतली आहे. आणि जमिनीवरचा कब्जा सोडत नाही, बरे वाईट करेल अशी धमकी दिली आहे. दौलत आबाने तुमच्याकडे मार्ग निघेल असे सांगितल्यामुळे तुमच्याकडे आलो आहे. यावर काय तो मार्ग काढा व आम्हा गरिबांना न्याय द्या आम्ही फार अपेक्षाने तुमच्याकडे आलो आहे, त्यावर वसंत वकिलांनी सर्व कागदपत्रे पाहिली व इतर माहिती विचारून घेतली व वसंत वकील म्हणाले, आबांनी सांगितले आहे, म्हणजे नक्कीच तुमच्या कामाबाबत मला विचार करावा लागेल त्यानंतर येसानाना म्हणाले, वकील साहेब तुम्ही आमचे सर्व ऐकून घेतले आहे, परंतु पुढे काय करायचे आम्हाला दाव्याबाबत माहिती द्या, त्यावर वकील म्हणाले, सदरची बाब ही कुळ कायद्याची आहे, याबाबत आपल्याला मे.मामलेदार यांचे कोर्टात दावा दाखल करावा लागेल तुम्ही काहीही काळजी करू नका, मी सर्व पाहतो. तुम्ही एक आठवड्यानंतर या, तोपर्यंत दावा तयार करून घेतो आता तुम्ही निश्चितपणे घरी जावा, आबाला म्हणावे, काही काळजी नसावी असे सांगावे.
त्यानंतर सैदा म्हणाला, वकील साहेब आमची सहमती अथवा परवानगी न घेता, संपतरावानी “साधे कुळ” असे काय लावले आहे ? साधे कुळ म्हणजे नेमकी काय भानगड आहे याबाबतची आम्हाला माहिती द्यावी ? त्यावर वसंत वकील म्हणाले, शासनाने जमिनी बाबत कायदे व नियम केलेले आहेत. त्या कायद्याबाबत तुम्हाला थोडक्यात माहिती देतो, ती अशी जमिनीला कुळ कसे काय लागते ? कुळ म्हणजे काय ? शेतजमीन व कुळ याचे कायदेशीर संबंध काय असतात याची तुम्हाला माहिती देतो. सरकारने “कसेल त्याची जमीन”असे तत्व घेऊन कुळ कायदा अस्तित्वात आणला. दुसऱ्याची जमीन कायदेशीर रित्या करणाऱ्या व प्रत्यक्ष कष्ट जमिनीत करणारा जो इसम आहे त्याला कुळ म्हटले गेले आहे.पूर्वी कुळ कायद्यानुसार सर्वप्रथम जमिनीत असणाऱ्या कायदेशीर कुळाची नावे ७/१२ च्या इतर हक्कात नोंदली गेली होती. त्यानंतर सन १९४८ चा कुळ कायदा अस्तित्वात आला. त्यामध्ये कुळाना जादा अधिकार दिलेले आहेत. सुधारित कायद्यानुसार कलम ३२ ग नुसार दुसऱ्याच्या मालकीची जमीन कायदेशीर रित्या कसणाऱ्या व्यक्ती या जमीन मालक म्हणून जाहीर करणेत आलेले आहेत त्यामुळे सदरच्या जमीनी कुळाच्या मालकीच्या झालेल्या आहेत. त्यामुळे कुळ कायद्याचा आधार घेऊन संपतरावने तुमच्या जमिनीवर साधे कुळ लावलेले आहे.
वकिलाचे ऐकून सैदा व तुकाराम आवाक झाले ? एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. त्यानंतर वसंत वकील म्हणाले ,तुमची जमीन संपतराव कसत होता का ? त्यास खंडाने दिली होती का ? तुमची जमीन कसण्याच्या मोबदल्यात पिकातील हिस्सा अगर वाटा घेत होता का ? तुमची जमीन “अर्धेलिने” दिली होती का ? त्यावर तुकाराम म्हणाला , वकील साहेब आम्ही जमीन कसणेबाबत दौलत आबांना सांगितले होते. परंतु त्यांनी नकार दिला. त्यांनीच संपतरावचे नाव सुचवले होते, त्यामुळे जमीन कसणे साठी संपतरावांना सांगितले होते व म्हणालो होतो की आम्ही पोटासाठी शहरात गेलो होतो आम्ही परत आल्यावर आमची जमीन परत द्या, फक्त जमीन पडीक ठेवू नका, आम्हाला धान्य अगर पैसे नको आहेत, असे सांगून शहरात गेलो होतो. परंतु गावी आले नंतर पाहिले तर संपतरावांनी ही भानगड करून ठेवलेली आहे.
त्यानंतर सैदा म्हणाला, वकील साहेब गाव खेड्यात पोटापाण्याची आबदा होत होती, म्हणून जगण्यासाठी आम्ही शहरात गेलो होतो. परंतु संपतरावांनी आमचा घात केलेला आहे. सदरची जमीन वडिलोपार्जित इनामी आहे. आमच्या कुटुंबाचा आधार आहे. आम्ही अडाणी माणसे आहोत आम्हाला कागदातील व कोर्ट कचेरीतील काही कळत नाही. आमची जमीन आम्हाला परत मिळवून द्या तुमच्या पाया पडतो. तुम्ही सांगाल तसे करतो. वकील साहेब, संपतराव आम्हाला आमच्या जमिनीत सुद्धा येऊ देत नाही, त्यावर वसंत वकील म्हणाले, आता काही कागदपत्रावर सह्या करा, मी मे. मामलेदार यांच्या न्यायालयात केस दाखल करतो तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही पुढील आठवड्यात परत या असे सांगितल्यावर सर्वजण वकिलांना नमस्कार घालून गावी निघून आले .
गांवच्या भावकीतील मंडळीची जमिनीबाबत सविस्तर चर्चा करून सगे सोयरे व भावकीतील काही लोकांकडून हात उसने पैसे घेऊन पुढील आठवड्यात वसंत वकिलांची भेट घेऊन त्यांची फी दिली त्यानंतर वसंत वकिलांनी रितसर मे.मामलेदार यांच्याकडे संपतरावाच्या विरुद्ध रितसर दावा दाखल केला. त्यानंतर संबंधितांना नोटीसा बजाविनेत आले. संपतरावाना नोटीस मिळाले नंतर त्यांनी ही तालुक्यातील वकील देऊन कागदपत्रे सादर केली. संपतरावच्या वकिलाने लेखी म्हणणे मांडले की, सैदा व तुकारामची जमीन संपतराव १२ वर्षांपासून कसत आहे ,सदर जमिनीचा खंड म्हणून दर वर्षे धान्य व रोख रक्कम देत असतो. त्याबाबतच्या पावत्या जमा केले आहेत. सदरची जमीन संपतरावच्या ताब्यात व वहिवाटीस आहे. त्यामुळे सदरची जमीन कुळ कायद्याने संपतरावची झालेले आहे. सैदा व तुकारामचा आता या जमिनीशी काहीही संबंध नाही. त्यामुळे सदरची जमिनीवर साधे कुळ म्हणून संपतरावचे नावास मान्यता द्यावी,असे म्हणणे सादर केले.
सैदा व तुकारामच्या बाजूने वसंत वकिलांनी पुन्हा लेखी म्हणणे सादर केले की, सदरची जमीन इनाम वर्ग ६ ब ची असलेमुळे सदरच्या जमिनी ह्या इनाम म्हणून मिळालेल्या आहेत. त्यामुळे महारवतनाच्या जमिनीस साधे कुळ लागत नाही. सैदा व तुकारामने कसलाही खंड रुपी धान्य व रुपये घेतलेले नाहीत. खंडाच्या पावत्यावरील अंगठे घेतलेले खोटे आहेत.त्यामुळे सैदा व तुकारामच्या जमिनीवर लागलेले “साधे कुळ’ कमी करून मिळावे, असे लेखी म्हणणे सादर केले होते.
जमिनीच्या दाव्याच्या तारखा मे.मामलेदार साहेब यांचे समोर सुरू झाला होत्या. सैदा व तुकाराम प्रत्येक तारखेस हजर राहू लागले होते. दोन्ही वकील आप -आपल्या अशिलांची बाजू प्रभावीपणे कायद्याच्या नियमाने मांडत होते.संपतराव प्रत्येक तारखेला विजयी मुद्रेने येत जात असे.सैदा व तुकाराम जमिनीच्या दाव्यासाठी चिंताग्रस्त काळजी ने येवून मामलेदार कचेरीत बसत असत. तारका वर तारखा पडत होत्या, दिवसा मागून दिवस जात होते.
वसंतरावांना वारस म्हणून एकच मुलगा होता. त्यांचे नाव यशवंत होते. तो तालुक्याच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करीत होता, तो समजस व समजूतदार असलेमुळे आपले वडील जमिनीच्या केसेस खेळण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी येत असतात असे कळलेमुळे यशवंत हा सुट्टीच्या दिवशी गावी जाऊन आपल्या भावकीतील दौलत आबा,जयसिंग आण्णा, सुभानराव यांची भेट घेऊन आपले वडील गरिबांना जमिनीच्या दाव्याबाबत त्रास देतात सैदा व तुकारामची जमीन त्यांनी बळकावली आहे, तरी आपण सर्वजण मिळून माझे वडिलांना समजून सांगूया, तेव्हा तुम्ही माझे घरी चला असे सांगितल्यामुळे सर्वजण संपतरावच्या घरी आले. सर्वांना बसणेसाठी यशवंतने घोंगडे टाकले, सर्वजण घोंगड्यावर बसल्यावर संपतरावने दौलत आबा कडे पाहत म्हणाले, आबा काय येणे केले आहे ? त्यावर दौलत आबा म्हणाले, यशवंताने सांगितल्यामुळे आलो आहे. संपतराव तुम्ही सैदा व तुकारामची जमीन प्रामाणिकपणे जमीन परत देऊन टाका. तुम्ही त्या जमिनीवर लावलेले “साधे कुळ” कमी करा, व गरिबीची जमीन परत देऊन टाका. त्याच्यावर अन्याय करू नका, तुम्हाला ती जमीन पड ठेवू नका म्हणून कसायला दिली होती. हे सर्व तुम्हाला चांगले माहिती आहे. काय तो योग्य विचार करा ? त्यावर दौलत आबाच्या मताशी जयसिंग आण्णा, सुभानराव नी सहमती दर्शवली. त्यावर संपतराव म्हणाले, मला कायद्याने जमीन मिळालेली आहे. मी जमीन कसत होतो, त्यामुळे मला मिळालेली जमीन मी सोडणार नाही.
त्यानंतर यशवंत म्हणाला तुम्ही माझे वडील आहात म्हणून समजून सांगतोय, मी वकीलाशी चर्चा करून आलोय त्यांनी सांगितले की सदरची जमीन इनाम वर्गातील असल्यामुळे तुम्हाला मी मिळेल याची खात्री नाही , त्यामुळे गरीबाची जमीन परत करा आपल्याला जमीन काय कमी आहे का ? गरीबाच्या जमिनीवर डोळा ठेवू नका, तुम्ही जर आमचे ऐकत नसाल तर मी पुन्हा ह्या घराच्या उंबऱ्याला पाय सुद्धा लावणार नाही, असे म्हणताच घरातील वातावरण गरम झाले. घरातील माणसे दराडून सर्व ऐकत होती. जयसिंग आण्णा म्हणाले, संपतराव हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका, तुमचा मुलगा, यशवंत, दौलत आबा सांगतात त्यांचे ऐका. सैदा व तुकारामची एकर भर जमीन परत दिली म्हणून तुम्हाला काही फरक पडणार नाही, गरीबाची जमीन परत देऊन टाका. यशवंत सांगतो त्याचे ऐका नाहीतर पश्चाताप करीत बसाल, त्यावर यशवंत आपल्या वडिलांना म्हणाला, तुम्हाला मी दोन एकर जमीन विकत घेऊन देतो ,पण तुमचा हट्ट सोडा. वकिलाकडे जाऊन केस मागे घ्या व साधे कुळ कमी करून द्या, मुलगा म्हणून माझे ऐका. त्यानंतर थोड्या वेळाने विचार करून संपतरावने सर्वाकडे पाहत म्हणाले: ठीक आहे, तुम्ही सर्वजण सांगत आहात तर मी सर्वांचे ऐकतो पण यशवंत तू घराचा वारस आहेस घर सोडायची भाषा करू नकोस, आपण उद्याच तालुक्याच्या ठिकाणी जाऊन दावा मागे घेऊया. सैदा व तुकारामची जमीन परत देऊया, त्यानंतर सर्वांनी समाधानाने चहापाणी करून निघून गेले.
दुसऱ्या दिवशी संपतराव, यशवंत, दौलत आबा, जयसिंग आण्णा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन वकिलांना सांगून केस पाठीमागे घेतली. मे.मामलेदार साहेब यांचेकडे वकीलमार्फत साधे कुळ कमी करणेचा अर्ज संपतरावच्या सहीने देऊन गांवी परत आले. दौलत आबांनी सैदा व तुकाराम यांना बोलावून घेतले, संपतरावची सर्व हकिगत सांगितली. आज पासून तुमची जमीन तुम्ही ताब्यात घेऊन कसत जावा, थोड्याच दिवसात तुमच्या जमिनीवर लागलेले साधे कुळ कमी होईल, काही काळजी करू नका, असे बोल आबांचे ऐकले नंतर सैदा व तुकारामला अत्यानंद झाला. त्यांनी दौलता आबाच्या पाया पडून संपतरावचे आभार मानून घरी येऊन भावकीतील मंडळीना हि बातमी सांगून सर्वांना साखर वाटून आनंद साजरा केला.

आयु.विलास खरात
लेखक,आटपाडी
मो.न.९२८४०७३२७७

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *