जवान अमोल गोरे चीन सीमेवर शहीद

वाशिम :
अरुणाचल प्रदेशातील कमेंग व्हॅली येथे चीन सीमेवर देशाचे रक्षण करताना 17 एप्रिल रोजी दुपारी 4.30 वाजता वाशिम तालुक्यातील सोनखास येथील भारतीय सैन्यातील जवान अमोल गोरे याला वीरमरण आले. अमोल गोरे आणि त्यांचे दोन सहकारी जवान चीन सिमेवर गस्तीवर असताना कमेंग व्हॅली येथे मुसळधार पाऊस आणि वेगाने वारे वाहत होते. यादरम्यान पाण्याचा मोठा प्रवाह त्यांच्या दिशेने आला. या प्रवाहात अमोल व त्याचे दोन सहकारी जवान वाहून जात असतांना अमोलने आपल्या जिवाची पर्वा न करता त्यांना पाण्याच्या प्रवाहातून वाचवत असतांना अमोलच्या डोक्याला पाण्याच्या प्रवाहातील एक मोठा दगड लागला आणि यातच अमोल शहिद झाला. आपल्या दोन सहकारी जवानांना वाचविण्यात अमोलला यश आले. मात्र अमोलला देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असतांना वीरमरण पत्कारावे लागले.

सन 2010 मध्ये अमोल भारतीय सैन्यात भरती झाला होता. शेतकरी कुटूंबात जन्माला आलेल्या अमोलचे लग्न वैशाली यांच्याशी सन 2016 मध्ये झाले. अमोलने सैन्यात असतांना पोहण्याचे प्रशिक्षणसुध्दा घेतले होते. तो पोहण्यात तरबेज होता. अमोलच्या पश्चात पत्नी वैशाली, दोन मुले, शेतकरी असलेले वडील तानाजी गोरे, आई, एक भाऊ आणि एक बहिण असा परिवार आहे. अमोलचे पार्थिव आज रात्री 2 वाजताच्या सुमारास विमानाने गुवाहाटी येथून पुणे येथे पोहोचणार आहे. पुणे येथे पोहोचताच त्याला सैन्याच्या वतीने मानवंदना दिल्यानंतर लष्कराच्या वाहनाने अमोलचे पार्थिव वाशिम तालुक्यातील सोनखास येथे 19 एप्रिल रोजी सकाळी पोहचले. अमोल गोरेवर त्यांच्या सोनखास या मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतमातेच्या वीर पुत्राला शतशः नमन 🙏

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here