लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबादे
उरण दि 17 शालेय जीवनातील मित्र मैत्रिनींना जीवन प्रवासात विसरता येत नाही आणि येणारही नाही याचा प्रत्यय क.भा.पाटील विद्यालय पिरकोनच्या एस एस सी बॅच 1982 च्या स्नेहमीलन मेळाव्यात आला. उरण तालुक्यातील चिरनेर येथील मानसी फार्म हाऊस मध्ये झालेल्या या मेळाव्यात ज्यांचे आज अंगा-खांद्यावर नातवंडे खेळविण्याचे वय आहे अश्या साठीच्या आसपास असलेल्या वर्ग मित्र मैत्रिणींच्या मेळाव्यास तब्बल 49 मित्र मैत्रिणी एकत्र आल्या होत्या.तब्बल 41 वर्षानंतर पहिल्यांदाच मित्र मैत्रिणी एकमेकांना भेटल्याने सर्व मित्र वर्गांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते.
मेळाव्याची सुरुवात सुप्रसिद्ध मेल फिमेल सिंगर मोहन फुंडेकर यांच्या सुमधुर आवाजातून साकारलेल्या गणेश स्तवनाने झाली, तद्नंतर ज्याचे चेहरे बदलले तरी ओळख, स्वभाव तेच असल्याचे प्रत्येकाने आपल्या ओळखीतून दाखवून दिले.
शाकाहारी, मांसाहारी भोजन, नास्ता, शीतपेय, आईस्क्रीम च्या चवीने आणि फुंडेकरांच्या रंगीबिरंगी गीतांनी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
जवळपास सात तासांची ही भेट मनाला सात जन्म आठवणीत राहील अशी अविस्मरणीय भेट घडवून आणण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणाऱ्या राजन म्हात्रे, सुनिल वर्तक, प्रविण वर्तक, विलास पाटील, भानुदास म्हात्रे, प्रकाश म्हात्रे आणि रवींद्र गावंड यांनी हे सर्व मित्र मैत्रिणी एकत्र आल्याने केलेल्या श्रमाचे चीज झाले अश्या भावना व्यक्त केल्या, अनेक मित्र मैत्रिणींनी आपल्या शालेय जीवनातील काही गोड आणि विनोदी आठवणींना उजाळा दिला आणि परत दहावी च्या वर्गाचे वातावरण निर्माण केले, काहींनी विनोदी किस्से तर काहींनी कविता सादर करून तर शेवटी मित्र मैत्रिणींनी गौरी गणपतीच्या गाण्यावर फेर ही धरला.
काही मित्र मैत्रिणींनी सर्वांसाठी स्वतः स्वीट आणले तर काहींनी भेटवस्तू दिल्या चारपाच प्रश्नांची प्रश्न मंजुषा आणि त्याबरोबरच लकी ड्रॉ च्या पद्धतीने भाग्यवान वर्गमित्र आणि भाग्यवान वर्गमैत्रिणीची निवड ही केली, शेवटी ग्रुप फोटो सेशन आणि प्रत्येक मित्र मैत्रिणींनी एकमेकांसमवेत सेल्फीचा आनंदही घेतला. विशेष म्हणजे 49 मित्रांमध्ये 20 हुन अधिक मैत्रिणींचा समावेश हा लक्षणीय होता.
कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध निवेदक आणि याच बॅच चे वर्गमित्र सुनिल वर्तक यांनी केले.”कुछ रिशते मुनाफा नही देते, मगर जिंदगीको अमीर बनाते है और वो रिशता दोस्तीका होता है” असे सांगून कार्यक्रमास सुरुवात केली, आयोजनाची आणि नियोजनाची मोठी जबाबदारी सुनिल वर्तक व प्रकाश म्हात्रे यांनी पार पाडली असली तरी सुनिल वर्तक यांनी या गोष्टीचे श्रेय इतर पाच जणांनी ठेवलेल्या विश्वासाला आणि सर्वांच्या विशेष उपस्थिती शिवाय हे शक्य नसते असे सांगून उपस्थित सर्व मित्र मैत्रिनींना ही दिले.
पुढील गेट टू गेदर आधी ग्रुप च्या माध्यमातून सामाजिक कार्य ही व्हावे ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवूनच करावे असा सर्वांनी निश्चय केला.शेवटी मित्रांच्या मैफिलीतून पाय निघत नसतानाही लवकरच भेटू या आशेने एकमेकांचा सर्वांनी निरोप घेतला.